शिवसेनेच्या कोंडीवर रंगली चर्चा, विरोधाचे राजकारण भोवल्याचा ठपका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 03:40 AM2017-08-24T03:40:19+5:302017-08-24T03:40:29+5:30

सततच्या विरोधी राजकारणामुळे आणि टोकाच्या विरोधामुळे शिवसेनेला मुख्यमंत्र्यांची भेट घेत आर्थिक मदतीसाठी नाकदुºया काढाव्या लागल्याची खुमासदार चर्चा कल्याण-डोंबिवलीच्या भाजपामध्ये सुरू आहे.

Discussion on Shivsena's move, criticizing the politics of opposition | शिवसेनेच्या कोंडीवर रंगली चर्चा, विरोधाचे राजकारण भोवल्याचा ठपका

शिवसेनेच्या कोंडीवर रंगली चर्चा, विरोधाचे राजकारण भोवल्याचा ठपका

Next

कल्याण : सततच्या विरोधी राजकारणामुळे आणि टोकाच्या विरोधामुळे शिवसेनेला मुख्यमंत्र्यांची भेट घेत आर्थिक मदतीसाठी नाकदुºया काढाव्या लागल्याची खुमासदार चर्चा कल्याण-डोंबिवलीच्या भाजपामध्ये सुरू आहे. त्यावर उघड भाष्य करण्यास भाजपाचे पदाधिकारी किंवा नगरसेवक तयार नाहीत. पण शिवसेनेने घेतलेल्या भेटीनंतर कल्याण-डोंबिवलीची कामे मार्गी लागली असे चित्र निर्माण होऊन त्याचे श्रेय त्या पक्षाला मिळू नये यासाठी भाजपाचे नगरसेवकही मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन थेट निधी मिळवतील आणि प्रकल्प मार्गी लावतील, अशा हालचाली सुरू आहेत.
कल्याण-डोंबिवली महापालिकेपाठोपाठ मुंबई, ठाणे, उल्हासनगर, भिवंडी आणि मीरा-भार्इंदर महापालिका निवडणुकीत स्वबळावर लढताना शिवसेना-भाजपाने विरोधाची भाषा करताना परस्परांवर यथेच्छ चिखलफेक केली. कल्याण-डोंबिवलीत दोन्ही पक्ष सत्तेसाठी एकत्र आले. पण त्यानंतरही त्यांच्यातील विरोधाची धार कमी झालेली नाही. दोन्ही पक्षांत गेल्या साधारण दोन वर्षांत ताळमेळ नाही. सतत एकमेकांवर कुरघोडी करणे, श्रेयवादावर तोंडसुख घेणे, असे प्रकार वारंवार सुरू आहेत. सत्ता काबीज करता न आल्याचे शल्य राहिल्याने मुख्यमंत्री विकास निधी देताना हात आखडता घेतात, असे थेट आरोप स्थानिक सत्ताधारी शिवसेनेकडून होऊ लागले आणि ही घुसमट आयुक्तांच्या दालनाबाहेरील आंदोलनातून समोर आली. मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी विकास निधी तसेच मोठे प्रकल्प मंजूर करूनही शिवसेना खोटे व विरोधाचे राजकारण करीत असल्याचे भाजपाचे म्हणणे आहे. यातून पालिकेची कोंडी होत गेली आणि सततच्या विरोधाच्या राजकारणामुळे शिवसेनेवर पक्षप्रमुखांच्या मध्यस्थीने मुख्यमंत्र्यांची मनधरणी करण्याची वेळ ओढवल्याचे भाजपाच्या स्थानिक नेत्यांचे म्हणणे आहे.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत ११४ कोटींचा निधी महापालिकेला देण्यात आला. स्मार्ट सिटीचे १०० कोटी रुपये आले आहेत, ५५ कोटी सीसीटीव्हीसाठी देण्यात आले आहेत. रिंगरूटसाठी सव्वा दोनशे कोटीची निविदा काढण्यात आली आहे. १८० कोटींचा विकास आराखडा ग्रामीण भागाच्या विकासासाठी तयार करण्यात आला आहे, याकडे लक्ष वेधताना महापालिकेच्या अपयशाचे खापर मुख्यमंत्र्यांवर का फोडता? असा सवाल भाजपा नेत्यांनी केला आहे. याबाबत उघडपणे भाष्य केले जात नसले; तरी मुख्यमंत्री-शिवसेना भेटीमुळे भाजपाचे मनोबल मात्र वाढले आहे. मुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा झाल्याचा दावा शिवसेनेकडून केला जात असला तरी मागण्यांच्या पूर्ततेचे श्रेय लाटण्याची संधी भाजपा त्या पक्षाला मिळवून देणार नाही. तो पक्ष आता स्वत:चा अजेंडा राबवेल हे स्पष्ट आहे.

मनोमिलन की अस्तित्वाचा लढा?
कल्याण-डोंबिवली पालिका निवडणुकीच्या प्रचारापासून शिवसेना-भाजपातील संघर्ष कडवा बनला. शिवसेनेने वाघनखे बाहेर काढली, तर मुख्यमंत्र्यांनी वाघाच्या जबड्यात हात घालून दात मोजण्याची भाषा करत आम्ही सिंह असल्याचे जाहीर केले होते.
आता जिल्ह्यातील महापालिकांच्या निवडणुका संपल्याने उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना भेटत कामे मार्गी लावण्यासाठी केलेले प्रयत्न ही मनोमीलनाची भाषा आहे की पुढील दोन वर्षांसाठीच्या अस्तित्त्वाचा लढा आहे, याबाबात वेगवेगळे तर्क सुरू आहेत.
शिवसेनेला भाजपाच्या ताकदीचा अंदाज आल्याचे हे द्योतक आहे, की येत्या दोन वर्षांत निवडणुकांना सामोरे जायचे असेल तर मतदारांना प्रत्यक्षात दिसतील अशी कामे दाखवावी लागतील, या वस्तुस्थितीची जाणीव झाल्याचे हे लक्षण आहे, असा प्रश्न अधिकाºयांना पडला आहे.

क्लस्टर, पुनर्विकास
ठरणार कळीचा
कल्याण-डोंबिवलीतील प्रकल्पांची कोंडी फोडायची असेल, स्टेशन परिसराचा विकास करायचा असेल आणि पालिकेच्या गंगाजळीत भर घालायची असेल तर आधी जाहीर केल्यानुसार दिवाळीपूर्वी क्लस्टर मार्गी लागणे गरजेचे आहे. तसेच धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाचे धोरणही प्रत्यक्षात येणे गरजेचे असल्याचे मत शङर नियोजनाच्या अभ्यासकांनी मांडले. ते धोरण ठरण्यास जेवढा उशीर होईल, तेवढे प्रश्न बिकट होत जातील, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. या मुद्द्यांवर शिवसेनेने मंगळवारी मुख्यमंत्र्यांकडे मागण्या केल्या होत्या.

पैशांचे सोंग आणणार कसे?
शिवसेनेच्या तक्रारीनंतर आयुक्तांना मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले असले, तरी पालिकेकडे करांचा पुरेसा पैसा नाही. त्यामुळे जोवर राज्य सरकारचा हात सैल सुटत नाही, तोवर आयुक्त तरी काय करणार असा पालिका अधिकाºयांचा प्रश्न आहे.

आता ठेकेदार चालले का?
मीरा-भार्इंदरच्या प्रचारात शिवसेनेने मुख्यमंत्र्यावर ठेकेदारांकडून निधी गोळा करून निवडणूक लढवणारे असा आरोप केला होता. त्यामुळे त्यांच्याकडून निधीची मागणी करताना ठेकेदाराकडचा पैसा चालेल का, अशी तिरकस प्रतिक्रिया डोंबिवलीतील भाजपाच्या नेत्याने दिली.

Web Title: Discussion on Shivsena's move, criticizing the politics of opposition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.