आयुर्वेद संशोधनाबाबत उदासीनता : जयंत पुजारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2019 04:31 AM2019-01-09T04:31:06+5:302019-01-09T04:31:25+5:30

डोंबिवलीत कार्यक्रम : ‘आधुनिक काळातील आयुर्वेद’

Depression on Ayurveda Research: Jayant Pujari | आयुर्वेद संशोधनाबाबत उदासीनता : जयंत पुजारी

आयुर्वेद संशोधनाबाबत उदासीनता : जयंत पुजारी

Next

डोंबिवली : शास्त्रात भर घालण्यासाठी संशोधन केले जाते. आयुर्वेदात आधुनिक पद्धतीने पहिला रिसर्च पेपर प्रसिद्ध झाला, त्याला ११६ वर्षे झाली. गुळवेलवर १५ हजार ३००, अश्वगंधा ३० हजार ३००, शतावरी ११ हजार ७०० पेपर आहेत. त्यानंतरही आयुर्वेदात कोणतीच भर पडलेली नाही. आयुर्वेद आधुनिक विज्ञानाच्या भाषेत मांडण्यासाठी १०० वर्षे संशोधन झाले. आयुर्वेद चिकित्सकाला त्यांचा उपयोग झाला नसून तो उदासीन झाला आहे, अशी खंत डॉ. जयंत पुजारी यांनी व्यक्त केली.

डोंबिवलीतील एका कार्यक्रमात ‘आधुनिक काळातील आयुर्वेद’ या विषयावर ते बोलत होते. पुजारी म्हणाले, आयुर्वेदात कोणताही रोग असो, त्याबाबत पथ्ये दिली आहेत. एमबीबीएसचा अभ्यासक्रम सोडून विद्यार्थी आयुर्वेदाकडे येत आहे, ही एक चांगली बाब आहे. प्रयोगशीलता आणि नावीन्यतेचा यामध्ये अभाव दिसून येत आहे. हे शिक्षण अ‍ॅलोपॅथीसारखे शिकवून चालणार नाही, असे त्यांनी सांगितले.
आयुर्वेदात सुरुवातीला २५० च्या आसपास ग्रंथसंपदा पाहिल्यावर एवढीच ग्रंथसंपदा आहे का, असा प्रश्न पडला. २००० वर्षांत एवढीच ग्रंथसंपदा कशी आहे, हा प्रश्न स्वस्थ बसू देत नव्हता. ग्रंथालय पाहण्यास सुरुवात केली, त्यावेळी अनेक पुस्तके समोर आली. सरकारने काही वर्षांपूर्वी जगाचा सर्व्हे केला, असे ते म्हणाले.

भारतीय वाड्.मय संस्कृत आणि प्राकृत स्वरूपात किती ग्रंथसंपदा आहे, हा आकडा जाहीर केला. तो तीन कोटी पुढे आला. त्यातील एक टक्क्याच्या एक तृतीयांश आकडा आयुर्वेद ग्रंथसंपदेचा पकडला, तरी तो एक लाख आहे, असे समजू शकतो. आजचा आयुर्वेद फार तर ३०० ते ४०० ग्रंथसंपदेचा वापर करतो. नवीन ग्रंथसंपदेचा त्यात समावेश नाही, अशी खंत पुजारी यांनी व्यक्त केली.

अ‍ॅलोपॅथी, आयुर्वेदाला स्वतंत्र ओळख

मंगेश देशपांडे : ‘उत्कर्ष’मध्ये मार्गदर्शन


डोंबिवली : आरोग्यशास्त्रात ९० प्रकारच्या पॅथी आहेत. त्यातील अ‍ॅलोपॅथी आणि आयुर्वेदाला स्वत:ची ओळख आहे. अ‍ॅलोपॅथी ही रोग झाल्यावर काय करावे हे सांगते, तर आयुर्वेद रोग होऊ नये आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत करतो, असे मत वैद्य मंगेश देशपांडे यांनी व्यक्त केले.

टिळकनगर विद्यामंदिरच्या पटांगणावर नुकतीच ‘उत्कर्ष व्याख्यानमाला’ झाली. या व्याख्यानमालेद्वारे तरुण वक्ता आणि श्रोता तयार करण्याचे काम ही संस्था १७ वर्षे करत आहे. यावेळी मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीकांत पावगी आणि कार्यवाह डॉ. महेश ठाकूर, अमोघ देवस्थळी उपस्थित होते. या व्याख्यानमालेत देशपांडे बोलत होते. देशपांडे म्हणाले की, आयुर्वेदात करिअर करून स्वत:ची प्रॅक्टिस करता येते. प्राध्यापक म्हणून विद्यार्थ्यांना शिकवता येते. औषधनिर्मिती कारखान्यात काम करता येते. संशोधन करण्याची ही संधी मिळते. आयुर्वेदात नेत्रतज्ज्ञ किंवा स्पेशालिस्ट असा कुणी नसतो. एक आयुर्वेदिक डॉक्टर सर्व व्याधींवर औषधे देतो. आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी सूर्याेदयापूर्वी उठावे, रोज व्यायाम करावा, संतुलित आहार घ्यावा. अन्न योग्य प्रकारे चावून न खाल्ल्याने १५० आजार होतात, असेही ते म्हणाले.

‘समाजासाठी काहीतरी करा’
स्वत:साठी काम करणाऱ्यांची कोणीही दखल घेत नाही. पण, लोकांसाठी आणि समाजासाठी काम केले, तर ती व्यक्ती इतिहास घडवते. ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांनी समाजासाठी काम करून इतिहास घडवला, म्हणून स्वत:पेक्षा समाजासाठी काम करा, असेही देशपांडे यांनी सांगितले.

Web Title: Depression on Ayurveda Research: Jayant Pujari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.