Demand for 750 tons of Tilalgaon and demand for Loney has increased in the Thane till Rathasaptam | रथसप्तमीपर्यंत ठाण्यात ७५० टन तिळगुळाची उलाढाल, लोण्याचीही मागणी वाढली
रथसप्तमीपर्यंत ठाण्यात ७५० टन तिळगुळाची उलाढाल, लोण्याचीही मागणी वाढली

-प्रज्ञा म्हात्रे

ठाणे: ‘तिळगुळ घ्या, गोड गोड बोला’ अशा शुभेच्छा देत गोडवा वाढवणा-या संक्रांतीच्या काळात रथसप्तमीपर्यंत ठाणे शहरात ७५० टन लाडवांची उलाढाल होण्याची शक्यता दुकानमालकांनी वर्तवली आहे. हळदी-कुंकवाच्या समारंभामुळे तिळगुळाच्या लाडवांची मागणी वाढल्याने यंदा मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदवले. भोगीला बाजरीच्या भाकरीसोबत आणि थंडी असल्याने या काळात लोण्याचीही मागणी वाढली आहे. पण त्यापेक्षा तुपाने यंदा खपाची चांगलीच मजल मारली आहे.
संक्रांत तोंडावर आल्याने उपहारगृहे, घरगुती पदार्थांची दुकाने, खाद्य-पेयांची-मिठाईची दुकाने, बचतगटांचे स्टॉल लाडवांच्या विक्रीसाठी सज्ज झाले आहेत. आॅर्डर्स येईल तसे लाडू बनविण्याचे काम कारखान्यांमध्ये सुरू आहे. घरच्या घरी लाडु बनविणारे जरी आदल्या दिवशीचा मुहूर्त साधणार असले, तरी परदेशी लाडू पाठविणाºयांची खरेदी होऊन लाडू पोचण्यासही सुरूवात झाली आहे. आता शिल्लक आहे ती स्थानिक लोकांची खरेदी, ती तर आदल्या दिवशीच किंवा त्या दिवशीच होते.
लाडुप्रमाणे तिळगुळ पोळी, तिळ पोळी, गुळपोळी, लोणी, तूप, चिक्की यांचीही खरेदी होते. या पदार्थांनी दुकाने, उपहारगृहे सजली आहेत. या पदार्थांच्या विक्रीत लाडुंनी पहिली बाजी मारली आणि त्याखालोखाल हळूहळू इतर पदार्थही विक्रीसाठी बाहेर येऊ लागले आहेत. संक्रांतीच्या दिवशी तिळगुळाची देवाणघेवाण केली जात असली तरी हळदी-कुंकू समारंभाची परंपरा कायम आहे. मात्र आगामी निवडणुका लक्षात घेता अनेक ठिकाणी हा समारंभ मोठ्या प्रमाणात केला जाणार आहे. जागोजागी या समारंभाचे पडघमही वाजू लागले आहेत. आयोजक चांगलेच तयारीला लागले आहेत. या समारंभासाठीही मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाणार आहे. रथसप्तमीपर्यंत हा समारंभ आयोजित केला जातो. त्यामुळे संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत शहरात यंदा जवळपास ७५० टन तिळगुळाच्या लाडवांची उलाढाल होणार आहे. आमच्याकडेच जवळपास एक टन लाडवांची खरेदी होणार असल्याचे उपहारगृहाचे मालक संजय पुराणिक यांनी सांगितले. त्याचप्रमाणे एक लाखांच्या आसपास गुळपोळ््यांची विक्री होणार आहे. आम्ही दहा हजार पोळ््या बनविणार असल्याचे त्यांनी सांगितले. हळदीकुंकू समारंभासाठी उपाहारगृहात छोटी पाकिटे तयार केली जात आहेत. यात एक लाडू आणि थोडा हलवा दिला जातो. ही पाकिटे किलोप्रमाणे विकली जात असून ४०० रुपये किलो अशी त्याची किंमत आहे.

खसखस हलवा पसंतीचा
सध्या गुळपोळ््यांनाही मागणी आहे. एका उपहारगृहात दुकानांत दोन हजार नगापासून पोळ््यांची बुकिंग केली जात आहे. चार दिवसांपासून आॅर्डर्स स्वीकारल्या जात आहेत. यात मात्र कोणतेही फ्युजन पाहायला मिळत नाही. खवय्ये हे पारंपारिक पद्धतीच्याच पोळ््या खातात, असे निरीक्षण दुकानमालकांनी नोंदविले.
तिळाच्या हलव्याप्रमाणे खसखशीचा हलवाही या सणानिमित्ताने तयार केला जातो. ज्यांना तीळ चालत नाही, ते खवय्ये खसखशीच्या हलव्याकडे वळतात. याची किंमत २५० रुपये किलो आहे.

दागिन्यांत राधा सेटला मागणी फार
हलव्याच्या दागिन्यांत यंदा राधा सेट प्रामुख्याने पाहायला मिळतो आहे आणि या सेटला ग्राहकांकडून प्रचंड मागणी असल्याचे पुराणिक म्हणाले. हा सेट फक्त मुलींसाठी असून त्याची किंमत २०० रुपये आहे. मुकुट, कमरपट्टा, बासरी, दोन गजरे, हार, बाजुबंद, बांगडी, गळ््यातला हार हे साहित्य यात आहे. त्याचबरोबर लहान मुलांसाठी कृष्ण सेट आहे. यात बासरी, बाजुबंद, मुकुट, मोरपीस, हार असून याची किंमत १२० रुपये आहे.
महिलांसाठी सौभाग्य सेटही उपलब्ध असून त्याची किंमत ३०० रुपये आहे. यात दोन वाट्यांचे मंगळसुत्र, नेकलेस, बिंदी, बाजुबंद, मोत्याच्या बांगड्या, पाटल्या, कानातले, नथ, कमरपट्टा, मुकुट, पैंजण, अंगठी, नेकलेस, मोठा हार हे साहित्य आहे. ज्यांना हे सेट अर्धे किंवा पूर्ण हवे आहेत, त्यांना ते मागणीप्रमाणे दिले जातात. हे सर्व दागिने महिलाच बनवितात. पुण्याजवळच्या वाघोली गावातील महिला बचत गटाकडून बनवून घेतले जातात आणि तेथून आम्ही विकायला आणतो, असे पुराणिक म्हणाले.

तुपाने खाल्ला भाव
संक्रांतीच्या काळात भोगीपासूनच लोणी, तुपाला अधिक मागणी असते. त्यामुळे उपहारगृहे, दुकाने, डेअरीमध्ये या दिवशी लोणी, तुपाची मोठ्या प्रमाणात विक्री होते. पूर्वी लोण्याला अधिक मागणी असे. घरी नेऊन ते कढवले जाई. वेळेअभावी आता लोणी न नेता ग्राहक तुलनेने तुप अधिक प्रमाणात घेऊन जात असल्याचे पुराणिक यांनी सांगितले.
यामुळे लोण्याची मागणी निम्म्याने घसरली आहे. पण पारंपरिक ग्राहक लोणी नेत असल्याने लोण्याचे दर वाढले आहेत. ते ६०० रुपये किलो, तर तुपाचे किलोचे दर ७२० रुपयांदरम्यान आहेत.


Web Title: Demand for 750 tons of Tilalgaon and demand for Loney has increased in the Thane till Rathasaptam
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.