राजू ओढे 
ठाणे : १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोट मालिकेनंतर दोन वर्षांनी इक्बाल कासकर कराची येथे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या भेटीसाठी गेला होता. पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयने त्याला त्यासाठी मदत केल्याने त्याच्या पासपोर्टवर पाकिस्तानचा शिक्काही मारण्यात आला नव्हता. स्वत: इक्बालने याबाबतची कबुली पोलिसांकडे दिली आहे.
२५७ लोकांचा बळी घेणाºया १९९३ च्या बॉम्बस्फोटाने मुंबई हादरली होती. दाऊद इब्राहिम याने हे बॉम्बस्फोट घडवून आणले होते. या घातपातानंतर वातावरण काहीसे निवळल्यानंतर १९९५ साली इक्बाल कासकर दुबईमार्गे पाकिस्तानला गेला होता. कराची येथे त्याची दाऊद इब्राहिमशी भेट झाली होती, अश्ी माहिती खंडणीच्या गुन्ह्यांमध्ये ठाणे पोलिसांनी अटक केलेल्या इक्बाल कासकरने चौकशीदरम्यान दिली. कोणत्याही देशाचा प्रवास करणाºया व्यक्तीच्या पासपोर्टवर त्या देशाचा शिक्का मारला जातो. त्याआधारे संबंधित प्रवासी कोणकोणत्या देशात जाऊन आला, हे स्पष्ट होते. इक्बाल कासकर दाऊदच्या भेटीसाठी पाकिस्तानला जाऊन आला असला, तरी त्याच्या पासपोर्टवर मात्र पाकिस्तानचा कोणताही शिक्का मारला गेला नसल्याची धक्कादायक माहितीही या चौकशीदरम्यान समोर आली. आयएसआयच्या मदतीने असा प्रकार सर्रास केला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. ज्या व्यक्तीला दुबईमार्गे पाकिस्तानला आणायचे असेल त्या व्यक्तीसाठी आयएसआयमार्फत दुबई आणि कराची येथील विमानतळांवर विशेष सूचना दिल्या जातात. संबंधित व्यक्तीला नेण्यासाठी आयएसआयचे हस्तक कराची विमानतळावर स्वत: हजर राहतात. पासपोर्टवर कोणताही शिक्का न मारता संबंधित प्रवाशाला विमानतळाबाहेर काढण्याचे काम आयएसआयचे हस्तक करतात, असा तपशीलही इक्बालच्या चौकशीतून समोर आला.
इक्बालचे कुटुंब दुबई येथे वास्तव्यास असल्याने, त्याचे दुबईला वेळोवेळी जाणे-येणे असते. दुबई येथे दाऊदच्या पत्नीचेही वारंवार जाणे-येणे असते. इक्बालच्या चौकशीतून दाऊद इब्राहिमचा ठावठिकाणा आणि त्याचा खासगी तपशीलही पोलिसांना मिळाला आहे. इक्बाल कासकरविरूद्ध ठाण्यात खंडणीचे तीन गुन्हे दाखल आहेत. सप्टेंबर महिन्यात ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाने त्याला दिवंगत बहीण हसिना पारकर हिच्या नागपाडा येथील निवासस्थानातून अटक केली होती. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वयेही (मकोका) त्याच्याविरूद्ध कारवाई करण्यात आली असून, मंगळवारी या प्रकरणी न्यायालयात दोषारोपपत्रही सादर करण्यात आले आहे.
>अंगडिया कंपनीची चौकशी : खंडणीच्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान मुंबईस्थित एका अंगडिया कंपनीचा सहभाग समोर आला आहे. छोटा शकीलला या कंपनीमार्फत पैसा पुरविला जायचा. मटका किंग पंकज गंगर हा या प्रकरणात सध्या अटकेत आहे. गंगर या अंगडिया कंपनीमार्फत शकीलला नियमित पैसे पाठवायचा. छोटा शकीलचा एक हस्तक पैसे घेण्यासाठी अंगडियाच्या कार्यालयात यायचा. यासंदर्भात तपशीलवार माहिती मिळाली असून, अंगडिया कंपनीशी संबंधित व्यक्तीची लवकरच चौकशी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
>दाऊदचा मुलगा ‘हाफिज-ए-कुराण’
बॉम्बस्फोटासारख्या दहशतवादी कारवायांमध्ये गुंतलेल्या दाऊद इब्राहिमचा तिसरा मुलगा मात्र सर्वांपासून अलिप्त आहे. त्याचे नाव मोईन असून, तो कराची येथील एका मशिदीमध्ये मुलांना शिक्षण देण्याचे काम करतो.
तो हाफिज-ए-कुराण असल्याची माहिती इक्बालने पोलिसांना दिली. पवित्र ग्रंथ कुराण ज्याला मुखोद्गत आहे, त्याला मुस्लिम धर्मियांमध्ये हाफिज-ए-कुराण असे संबोधतात.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.