डोंबिवलीत सत्ताधारी भाजपा-शिवसेना नगसेवकांचा महापालिकेत ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 04:20 PM2018-03-21T16:20:06+5:302018-03-21T16:20:06+5:30

डोंबिवली शहराच्या पूर्व भागातील ग आणि फ प्रभागामध्ये फेरीवाल्यांवर आणि अनधिकृत बांधकामांवर कारवाईच होत नसल्याच्या निषेधार्थ सत्ताधारी भाजपासह शिवसेनेच्या नगरसेवकांनी डोंबिवली येथिल उपविभागीय इमारतीमध्ये ठिय्या आंदोलन केले. बुधवारी दोन्ही प्रभाग समित्यांची बैठक असल्याने भाजपासह शिवसेनेचे सदस्य त्या ठिकाणी उपस्थित होते.

Dabwali movement in Dombivli-ruled BJP-Shiv Sena Nagsevak | डोंबिवलीत सत्ताधारी भाजपा-शिवसेना नगसेवकांचा महापालिकेत ठिय्या आंदोलन

 पूर्णवेळ उपायुक्त द्या नाहीतर महापालिकेला टाळे लावा

Next
ठळक मुद्दे फेरीवाल्यांवर कारवाईसह अनधिकृत बांधकामांचा प्रश्न पेटला  पूर्णवेळ उपायुक्त द्या नाहीतर महापालिकेला टाळे लावा

डोंबिवली: शहराच्या पूर्व भागातील ग आणि फ प्रभागामध्ये फेरीवाल्यांवर आणि अनधिकृत बांधकामांवर कारवाईच होत नसल्याच्या निषेधार्थ सत्ताधारी भाजपासह शिवसेनेच्या नगरसेवकांनी डोंबिवली येथिल उपविभागीय इमारतीमध्ये ठिय्या आंदोलन केले. बुधवारी दोन्ही प्रभाग समित्यांची बैठक असल्याने भाजपासह शिवसेनेचे सदस्य त्या ठिकाणी उपस्थित होते. फ प्रभाग समितीच्या बैठकीत ठाकुर्ली चोळेगावच्या ज्येष्ठ नगरसेविका प्रमिला चौधरी यांनी आक्रमक पवित्रा घेत जर कारवाई होत नसेल तर उपोषण छेडणार असे सांगत प्रभाग समितीमधून काढता पाय घेतला. त्यांच्या पाठोपाठ सर्वच नगरसेवकांनी त्यांना सहकार्य करण्यासाठी पुढाकार घेत महापालिकेत ठिय्या मांडला. घाणेरडी डोंबिवलीला प्रशासनातील निष्क्रिय अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप चौधरींनी केला.
त्या आंदोलनात फ प्रभाग समितीच्या सभापती खुशबु चौधरी, डॉ. सुनिता पाटील, नंदीनी विचारे, विश्वदिप पवार, राजन आभाळे, निलेश म्हात्रे यांच्यासह ग प्रभाग समितीच्या सभापती अलका म्हात्रे, महिला बाल कल्याण समिती सभापती दिपाली पाटील, नगरसेवक, स्थायी समितीचे सदस्य नितीन पाटील, माजी सभापती विषु पेडणेकर, अ‍ॅड. मंदार टावरे, माजी नगरसेवक श्रीकर चौधरी आदीं सत्ताधारी भाजपा-शिवसेनेचे नगरसेवक सहभागी झाले होते. भाजपाचे नगरसेवक डोंबिवलीत सर्वाधिक असल्याने जाणुनबुजून दुर्लक्ष केले जात असल्याचा गंभीर आरोप सर्वच नगरसेवकांनी केला. मात्र तसे काही नसल्याचे स्पष्टीकरण प्रभाग अधिका-यांनी दिले.
फ प्रभागाचे अधिकारी अमित पंडीत हे कार्यक्षम नाहीत, एक तर त्यांच्याकडील जादाचा चार्ज काढुन घ्यावा अन्यथा त्यांची बदली करावी अशी मागणी प्रमिला आणि श्रीकर चौधरी यांनी केली. आभाळे-म्हात्रे म्हणाले की, अनधिकृत बांधकाम सर्रास होत असून त्याला आळा बसत नाही. नितिन पाटील, पेडणेकर यांनी त्यास दुजोरा दिला. पाटील, पेडणेकर म्हणाले की, सातत्याने प्रभाग अधिका-यांना पत्रव्यवहार केला आहे. काही वेळा आदेश आले पण कारवाई केवळ कागदावरच असते. नागरिकांना आम्हाला उत्तरे द्यावी लागतात. हे सगळे अधिकारी वातानुकूलीत दालनात बसतात, त्यांना प्रत्यक्ष नागरिकांच्या रोषाला तोंड द्यावे लागत नाही. नागरिकांचे समाधान करतांना नाकी नऊ येतात. अधिकारी कार्यक्षम नाहीत. त्यावर प्रभागअधिकारी परशुराम कुमावत म्हणाले की, कारवाईसाठी अवघा ३० जणांचा कर्मचारी आहे. पण ते देखिल पूर्ण नसतात, त्यामुळे कारवाईमध्ये सातत्य रहात नाही. आतापर्यंत २० फेरीवाल्यांवर कारवाई केली आहे. हजारो फेरीवाल्यांसमोर अवघे २० जणांवर कारवाई यातच सगळ पितळ उघडे पडल्याचे विश्वदीप पवार म्हणाले. पेडणेकर, पाटील यांनी अनधिकृत बांधकामे, फेरीवाले यासंदर्भात केलेल्या पत्रव्यवहाराची जंत्री सांगितली. त्यावर स्काय वॉकवर सातत्याने कारवाई होत असल्याचे सांगण्यात आले, पण केवळ स्काय वॉक हा परिसर फ आणि ग प्रभागाचा नसून अन्यत्र काय कारवाई केली याचे दाखले द्यावेत, अर्थार्जन करणे सोडावे अशी संतापाची भूमिका अ‍ॅड. श्रीकर चौधरींनी घेतली. अ‍ॅड. मंदार टावरे यांनीही कोपर भागात जेथे अनधिकृत बांधकामे होत आहेत त्यावर केलेल्या पत्रव्यवहारांवर कुमावत यांच्यासह तत्कालीन प्रभाग अधिका-यांनी काय कारवाई केली हे स्पष्ट सांगावे असे म्हंटल्यावर मात्र कुमावत यांनी कारवाई सुरुच असते असे मोघम उत्तर दिले. तर पंडीत यांनी मात्र अनधिकृत बांधकामाच्या तक्रारी येत असतात, पण कारवाई किती केली हे निश्चित सांगता येणार नाही असे म्हंटल्यावर चौधरी दाम्पत्याने २० वर्षात खोटे बोलणारा अधिकारी बघितला नसल्याचा संताप व्यक्त केला.
डोंबिवलीकरांसाठी पूर्ण वेळ उपायुक्त द्या अन्यथा महापालिकेच्य या विभागीय इमारतीला टाळे लावा अशी मागणी पाटील, पेडणेकर, आभाळे यांनी केली. तसेच जर महापालिका प्रशासनाला कारभार हाकता येत नसेल तर सक्षम अधिका-यांचीच नियुक्ती करा, अन्यथा यापुढे इथे नव्हे तर मुख्यालयात ठिय्या आंदोलन करणार असल्याचे म्हंटले. महिला बालकल्याण समितीच्या शिवसेनेच्या सभापती दिपाली पाटील यांनीही प्रशासन हे कमकुवत असून अधिकारी लक्षच देत नसल्याचे म्हंटले. तर महिलांना त्यांच्या कौटुंबिक जबाबदा-या सोडुन महापालिकेत ठिय्या मांडावा लागतो ही शोकांतिका असल्याचे प्रमिला चौधरी म्हणाल्या. येथिल नागरिकांना, नगरसेवकांना भेडसावणा-या अडीअडचणींसाठी कल्याण मुख्यालयात पाठपुरावा का करावा लागतो असा सवाल पेडणेकर यांनी केला. मंगळवार असला की अनधिकृत बांधकामांचे अधिकारी येतात आणि कलेक्शन करुन निघुन जातात असा आरोपही नगरसेवकांनी केला.
* ‘फ’ प्रभाग समितीच्या बैठकीत रस्त्यांवर नुकतेच करण्यात आलेले डांबरीकरण हे निकृष्ठ असून त्यात पुन्हा सुधारणा करणार असल्याचे सांगण्यात आले. विश्वदीप पवार, आभाळे यांच्यासह म्हात्रेंनी खड्डे, डांबरीकरणावर आवाज उठवला होता. तर नंदीनी विचारे यांनी घंटागाडीच फिरकत नसल्याचे म्हंटले. त्यावर घनकचरा विभागाचे अधिकारी वसंत देगलुकर यांनी विचारेंची समस्या वास्तव असून लवकरच जादाची घंटागाडी आली की तेथे पूर्णवेळ ती सुविधा देणार असल्याचे म्हंटले. तसेच अनधिकृत बांधकामे सुरु असतांनाही कर का लावला जातो, त्या इमारतींना सीसी-ओसी कशी दिली जाते असा सवाल करत किती बांधकामे अनधिकृत आहेत असा सवाल सभापती खुशबु चौधरींनी केला. त्यावर लवकरच माहिती देतो असे स्पष्टीकरण प्रशासनाकडुन देण्यात आले. गटारांवरील निकृष्ट दर्जाची झाकणे, उघड्या नाल्यांवरील स्लॅब हे मुद्दे पवार, म्हात्रेंनी मांडले. त्यावर लवकरच चांगली झाकणे बसवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. घंटा गाड्यांमध्ये घंटा नसून कर्मचारी गाडी आली की शिट्टी वाजवतात, त्यामुळे अनेकांना कचरा देण्याच्या सूचना मिळत नसल्याचे सांगण्यात आले. त्यावर लवकरच घंटा लावल्या जातील असे देगलुरकर म्हणाले.
* ‘ग’ प्रभाग समितीची बैठक दोन महिन्यांमधून पहिल्यांदा झाली. त्या बैठकीतही रिलायन्स कंपनीने केबल टाकण्यासाठी खोदलेले रस्ते, पाणी कनेक्शन साठी खोदलेले रस्ते यांचा गंभीर समस्या मांडण्यात आली. त्यावर तातडीने प्रशासनाने गंभीर दखल घेत कार्यवाही करणार असल्याचे आश्वासन दिले. पेडणेकर यांनी मािवतरणच्या भोंगळ कारभाराचे वाभाडे काढत प्रशासन त्याकडे कानाडोळा का करत आहे असा सवाल केला. तसेच स्वच्छता विषयक महापालिका दिल्लीचे प्रतिनिधी आले होते तेव्हा जेवढी सतर्क होती तेवढी आता का नाही असा टोला प्रशासनाला लगावत अस्वच्छतेबद्दल नाराजी व्यक्त केली.

Web Title: Dabwali movement in Dombivli-ruled BJP-Shiv Sena Nagsevak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.