CSMT Bridge Collapse आई, तुझ्याविना कसा जगू...; लहानग्या ओमकारची आर्त हाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 12:02 AM2019-03-16T00:02:27+5:302019-03-16T07:15:46+5:30

चिमुकली चिन्मयी मातेच्या पार्थिवाचा घट्ट पकडलेला हात सोडेना

CSMT Bridge Collapse, How to live without you ...; Small hymn | CSMT Bridge Collapse आई, तुझ्याविना कसा जगू...; लहानग्या ओमकारची आर्त हाक

CSMT Bridge Collapse आई, तुझ्याविना कसा जगू...; लहानग्या ओमकारची आर्त हाक

Next

- अनिकेत घमंडी / सचिन सागरे

डोंबिवली : आई, अजून एक दिवस सुटी वाढवून घे ना... ओमकार शिंदे आपल्या चारपाच दिवस सुटीवर असलेल्या आईला गुरुवारी सायंकाळी विनवत होता आणि त्याची आई भक्ती शिंदे (४०) मुलाचे मन मोडून जीटी रुग्णालयात कामावर गेल्या, त्या परत आल्याच नाहीत. शुक्रवारी त्यांच्या पार्थिवाला बिलगून... आई, आता तुझ्याशिवाय मी कसा राहू, अशा शब्दांत ओमकारनं फोडलेला टाहो काळीज पिळवटून टाकत होता.

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील पादचारी पूल कोसळण्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. या दुर्घटनेत सहाजणांचा मृत्यू झाला. त्यात जीटी रुग्णालयातील परिचारिका भक्ती शिंदे, अपूर्वा प्रभू (३२), रंजना तांबे (४८) या तिघींचा मृत्यू झाला. या तिघीही डोंबिवली पश्चिमेत राहायला होत्या. त्यामुळे त्या परिसरावर अक्षरश: शोककळा पसरली होती.

तांबे, प्रभू आणि शिंदे या तिघी १५ ते २० वर्षांपासून मुंबईतील जीटी रुग्णालयात कामाला होत्या. गुरुवारी रात्रपाळी असल्याने घरातून निघालेल्या तिघी रुग्णालयात पोहोचण्यासाठी पुलावरून जात असतानाच ही दुर्दैवी घटना घडली. दीनदयाळ रोड परिसरातील ओमसाई दत्त इमारतीमध्ये पती राजेंद्र शिंदे, मुलगा ओमकार (१४) आणि सासू यांच्यासोबत भक्ती राहत होत्या. त्यांच्या निधनामुळे शिंदे परिवार व शेजारी शोकाकुल झाले आहेत.

पश्चिमेतील ठाकूरवाडी परिसरात असलेल्या उदयराज इमारतीमध्ये पती अभय प्रभू, मुलगा गणेश (१२) आणि मुलगी चिन्मयी (१०) यांच्यासोबत अपूर्वा राहत होत्या. हे दोघेही सेंट जॉर्ज शाळेत सातवी आणि पाचवीमध्ये शिकत आहेत. आपल्यावर कोसळलेल्या या भीषण संकटामुळे गणेश आणि चिन्मयी कावरीबावरी झाली होती. अपूर्वा यांचे पार्थिव अंत्यसंस्काराकरिता जेव्हा घेऊन जायला निघाले, तेव्हा मी आईला सोडणार नाही, असे म्हणत लहानग्या चिन्मयीचा बांध फुटला आणि साऱ्यांचे डोळे पाणावले. अपूर्वा यांचे पती खाजगी कंपनीत कामाला आहेत. आता या दोन लहानग्यांचे संगोपन करण्याची जबाबदारी खांद्यावर येऊन पडलेले अभय यांच्या चेहऱ्यावरील दु:ख व तणाव सतत जाणवत होता.

पश्चिमेतील गणेशनगर परिसरात असलेल्या शिवसागर इमारतीमध्ये आपल्या आईसोबत रंजना तांबे राहत होत्या, तर त्यांचा भाऊ गरिबाचावाडा परिसरात असलेल्या कृष्णाबाई सज्जन दर्शन येथे राहतो. त्यांना तीन विवाहित बहिणी आहेत. अविवाहित असलेल्या रंजना जीटी रुग्णालयात कामाला होत्या, अशी माहिती रंजना यांचे नातलग विजय तांबे यांनी दिली. आपला म्हातारपणीचा आधार असलेली रंजना गेली, यावर तिच्या आईचा विश्वासच बसत नव्हता. त्यांना जबर मानसिक धक्का बसला असल्याचे तांबे कुटुंबीयांनी सांगितले.

भक्ती ३५ वर्षांपासून आमच्या शेजारी होत्या. सर्वांसोबत मिळूनमिसळून राहणाऱ्या भक्तीचा दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू होतो, ही दु:खदायक घटना आहे. तिला एक मुलगा असून त्याचे शिक्षण व्हायचे आहे. त्याला आता कोण सांभाळणार? जर असे पूल पडत गेले, तर लोकांचे कसे होणार? पुलाची दुरवस्था झाली असेल तर कार्यवाही कोणी केली पाहिजे? पूल पडूनही दोषींवर कारवाई होत नाही, हे संतापजनक आहे. जीवाभावाच्या माणसाचा मृत्यू झाल्यानंतर पैसे मिळून काय उपयोग? आमची माणसे आम्हाला परत मिळणार आहेत का? पुन्हा अशी घटना होऊ नये म्हणून काळजी घेण्याची तुमची जबाबदारी नाही का? - सीमा शिंदे, भक्ती यांच्या शेजारी

अपूर्वा, रंजना आणि भक्ती या तिन्ही जीटी रुग्णालयाच्या परिचारिका होत्या. आम्ही रुग्णसेवा करायला घर सोडून जेव्हा बाहेर पडतो, तेव्हा आम्ही घराचा विचार करत नाही. रुग्णालयातील रुग्णांची सेवा करण्यासाठी निघालेल्या या तिघींचे आयुष्य एका क्षणात उद्ध्वस्थ झाले. आम्हाला कितीही पैसे दिले तरी आमचा माणूस परत येणार नाही. रेल्वे आणि महापालिका प्रशासन आज एकमेकांकडे बोट दाखवत आहे. तुमच्या भांडणात आमचा माणूस गेला.
- वर्षा नरे, निवृत्त परिचारिका, जीटी रुग्णालय

Web Title: CSMT Bridge Collapse, How to live without you ...; Small hymn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.