महानगरपालिकेच्या ४५ शिक्षकांवर गुन्हे? बीएलओच्या कामास नकार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 04:00 AM2018-07-12T04:00:49+5:302018-07-12T04:02:32+5:30

महापालिका शाळांतील ४५ शिक्षकांनी निवडणुकीच्या बीएलओचे काम करण्यास नकार दिल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती तहसीलदार उत्तम कुंभार यांनी दिली.

Crime against 45 teachers of municipal corporation? Denial of work of BLO | महानगरपालिकेच्या ४५ शिक्षकांवर गुन्हे? बीएलओच्या कामास नकार 

महानगरपालिकेच्या ४५ शिक्षकांवर गुन्हे? बीएलओच्या कामास नकार 

Next

उल्हासनगर - महापालिका शाळांतील ४५ शिक्षकांनी निवडणुकीच्या बीएलओचे काम करण्यास नकार दिल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती तहसीलदार उत्तम कुंभार यांनी दिली. या प्रकाराने शिक्षकांमध्ये खळबळ उडाली असून शिक्षक संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
उल्हासनगर विधानसभा क्षेत्राच्या मतदारयाद्या अद्ययावत करण्यासाठी महापालिका शाळांतील ४५ शिक्षकांना बीएलओ कामाचे आदेश दिले आहेत. पालिका शाळेत शिक्षकांची पदे कमी असून बीएलओचे काम केल्यास मुलांचे शैक्षणिक नुकसान होईल, असे सांगून शिक्षकांनी बीएलओचे काम करण्यास नकार दिला. शिक्षकांनी नकार दिल्याने उपविभागीय अधिकारी जगजितसिंग गिरासे यांनी शिक्षकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश तहसीलदारांना दिले. तहसीलदार कुंभार यांनी बीएलओचे काम करण्यास नकार दिलेल्या शिक्षकांना प्रथम नोटिसा देऊन गुन्हे दाखल करण्याचे संकेत दिले. या प्रकाराने शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने त्यांनी शिक्षकसेनेकडे धाव घेतली. तसेच न्याय देण्याची विनंती केली.
महापालिका शाळेत शिक्षकांची संख्या कमी असून शिक्षकांना अशा कामांना जुंपल्यास मुलांचे नुकसान होणार, असे शिक्षकसेनेचे शहराध्यक्ष विनोद सूर्यवंशी यांनी तहसीलदारांना पटवून दिले. तसेच शिक्षकांना अशैक्षणिक कामांसाठी सक्ती करू नका, असा न्यायालयाचा आदेश असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी दिली. तशी प्रत तहसील व प्रांत कार्यालयाला दिली आहे. शिक्षकांवर गुन्हे दाखल केल्यास शिक्षकसेनेसह मुख्याध्यापकसेना रस्त्यावर उतरेल, असा इशारा शिक्षक व मुख्याध्यापकसेनेचे प्रवीण लोंढे, माधव पाटील, योगेश पाटील, प्रकाश मगर, प्रल्हाद कोलते, शहराध्यक्ष विनोद सूर्यवंशी यांनी दिला आहे.

नोटिसाही स्वीकारल्या नाहीत

मतदारयाद्या अद्ययावत करण्याचे राष्ट्रीय काम आहे. पालिका शाळांतील ४५ शिक्षकांना बीएलओचे काम देण्याचा निर्णय घेऊन तसे आदेश काढले. मात्र, एकाही शिक्षकाने आदेश स्वीकारले नाही. नोटिसा काढल्यावरही शिक्षकांनी सहकार्य केले नाही. अखेर, प्रांताधिकारी जगजितसिंग गिरासे यांनी शिक्षकांवर गुन्हे दाखल करण्यास सांगितले, अशी माहिती कुंभार यांनी दिली.

Web Title: Crime against 45 teachers of municipal corporation? Denial of work of BLO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.