ठाणे : नाम संस्थेतर्फे शेतकरी वर्गाला शहरांत बाजारपेठ उपलब्ध करुन देणार असून शेतकऱ्याला ग्राहकाशी थेट जोडले जाणार आहे. तसेच, यावर्षी पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भावर जास्त लक्ष असणार आहे, असे प्रतिपादन अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी केले.
कै. रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफले ते अनासपुरे यांनी. त्यांना नामच्या आगामी योजनांसदर्भात विचारले असता ते म्हणाले की, एप्रिल महिन्यात ठाण्यासह आठ ते दहा शहरांत धान्य महोत्सव घेण्याचा प्रयत्न आहे. तसेच, एका नामांकीत कंपनीशी बोलणी झाली असून ते ६२ हजार एकरवरील तूर, मूग, हरभरा, उडीद हे कडधान्य विकत घ्यायला तयार आहेत. मराठवाड्यात पाण्याचे काम सुरू झाले असून ५७२ किमी नाले, तलावांचे खोलीकरण, रुंदीकरण केले आहे. साधारण २० लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होणार असून जिथे ते एक पीक घेतात तिथे तीन पिके घेतील. शासन ही अवाढव्य यंत्रणा आहे. त्यांच्याकडे सर्व उपलब्ध असले तरी सिस्टीमचा भाग अत्यंत भ्रष्ट आहे. एक शेतकरी एका दाण्यापासून हजारो दाणे निर्माण करतो. परंतु त्याला किंमत नाही. आत्महत्त्या पळपुटेपणा असला तरी शेतकरी ती का करतो याचा विचार सर्वांनी करावा. शेतकऱ्यांची एकजूट नसल्याने त्यांच्या पिकाला भाव मिळत नाही. शेतकऱ्यांचे दोन वर्ग आहेत. एक बागायतदारांचा आणि दुसरा कोरडवाहू शेतकऱ्यांचा जे पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. शासन शेतकऱ्यांसाठी योजना आखताना सरसकट विचार करते. खरे तर कोरडवाहू शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे आणि आत्महत्त्या करणारा हा वर्ग आहे,अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. त्यांच्या संघर्ष प्रवासाबद्दल विचारले असते ते म्हणाले की, मला संघर्षावर बोलणे फारसे आवडत नाही. संघर्षाकडे मी नेहमी सकारात्मकतेने पाहिले आहे. संघर्षाचा काळ मी आनंदात घालविला. इंग्रजी भाषा ही जगण्यासाठी अपरिहार्य असली तरी मातृभाषा शिकण्याचा आग्रह असावा. अलिकडे रिअल हिरोंपेक्षा रील हिरोंना जास्त किंमत आहे आणि हे समाजाच्यादृष्टीने घातक असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)