तंत्रज्ञानामुळे वैचारिक गुलामी- अरविंद जगताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2018 12:11 AM2018-12-09T00:11:49+5:302018-12-09T00:12:21+5:30

अंबरनाथमध्ये ‘कोमसाप’च्या राज्यस्तरीय युवाशक्ती संमेलनाचे उद्घाटन

Conceptual slavery due to technology- Arvind Jagtap | तंत्रज्ञानामुळे वैचारिक गुलामी- अरविंद जगताप

तंत्रज्ञानामुळे वैचारिक गुलामी- अरविंद जगताप

Next

अंबरनाथ : विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा आधार घेऊन प्रत्येकाने आपल्यात चांगले बदल करणे गरजेचे आहे. मात्र आज तरूण पिढी या विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा चुकीचा वापर करत असल्याने त्यांच्यात वैचारिक गुलामी वाढली आाहे. आजचा तरूण केवळ मोबाइलवर स्वत:ला व्यक्त करत आहे. मोबाइलमधून तरूणांना बाहेर काढण्यासाठी प्रत्येक ठिकाणी युवाशक्ती साहित्य संमेलनाची गरज आहे. अंबरनाथमध्ये हा प्रयत्न यशस्वी झाला असून त्याचे अनुकरण इतर ठिकाणीही करणे गरजचे आहे, असे मत प्रसिध्द लेखक अरविंद जगताप यांनी शनिवारी व्यक्त केले.

अंबरनाथच्या महात्मा गांधी विद्यालयाच्या सभागृहात कोकण मराठी साहित्य परिषदेच्या पुढाकाराने राज्यस्तरीय युवाशक्ती साहित्य संमेलन भरवण्यात आले आहे. या संमेलनाचे उद्घाटन जगताप, कोमसापचे संस्थापक मधु मंगेश कर्णिक, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आाणि स्वागताध्यक्ष सुनील चौधरी यांच्या हस्ते झाले. युवकांचा साहित्याकडे कल वाढावा यासाठी हे संमेलन भरविण्यात आले आहे. संमेलनाच्या उद्घाटनासाठी तरूणांची गर्दी झाली होती.

जगताप यांनी मत व्यक्त करताना तरूणांना केंद्रस्थानी ठेवत अनेक महत्वाचे सल्ले दिले. आज युवकांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही त्यामुळे तरूणांना कोणता झेंडा हाताात घेऊ असे विचारावे लागते. तरूणांनी आपल्या वाटचालीत कोणताही झेंडा हाती घेतला तरी त्या झेंड्याचा दांडा मात्र विकासाचाच राहिल याची दक्षता घ्यावी. राजकीय क्षेत्रातील तरूणांचा वावर कसा असावा यावरही त्यांनी आपले मत व्यक्त केले. आजची तरूण पिढी ही संवेदनशील आहे. मात्र त्यांची संवेदना ही मोबाइलमध्येच अडकून पडली आहे.

मोबाइल आणि व्हाटस्अ‍ॅपच्या जमान्यात युवा पिढी हरवून गेली आहे. तरूणांमध्ये विनाोद बुध्दीही कमी झाली आहे. एखादा जोक समजण्यासाठी स्माईलीचा वापर करावा लागतो. त्याशिवाय जोकचा अर्थ समजत नाही. आज मोबाइलचा वापर करून स्वत:मध्ये अनेक चांगले बदल घडविणे शक्य आहे. मात्र विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील विकासामुळे गुलाम बनवण्याचे तंत्र विकसित झाले आहे, असे जगताप यांनी सांगितले. आजही जुन्या मानिसकतेचा पगडा कायम असून साहित्य संमेलन युवकांमध्ये बदल घडवू शकतील. एकमेकातील हरवत चाललेला संवाद पुन्हा सुरू होईल असा आशावाद जगताप यांनी व्यक्त केला. तरूणांना व्यक्त होण्यासाठी सातत्याने संधी दिल्यास भावी तरूण पिढी साहित्याचा गाढा अविरतपणे सुरू ठेवतील असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी खासदार डॉ. शिंदे यांनी अंबरनाथसारख्या शहरात साहित्य संमेलनाला चांगला वाव निर्माण झाला आहे. आजही या ठिकाणी संमेलनाला गर्दी जमते. अंबरनाथ आणि साहित्य यांचे बंधन सुनील चौधरी हे यापुढेही सांभाळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अंबरनाथ शहराला सामाजिक ,साहित्यिक आणि ऐतिहासिक वारसा असून सध्याच्या काळात साहित्य संमेलनांची जास्त गरज आहे. आज तरूणांसाठी संधी उपलब्ध करुन दिली आहे. या संधीचा तरूण साहित्यिक फायदा घेतील असा विश्वास मधु मंगेश कर्णिक यांनी व्यक्त केला. या संमेलानाला आमदार डॉ. बालाजी किणीकर, नगराध्यक्ष मनीषा वाळेकर, अब्दुल शेख, तुकामराम म्हात्रे, कोमसापचे केंद्रीय अध्यक्ष डॉ. महेश केळुस्कर आदी उपस्थित होते.

ग्रंथ प्रदर्शनाचे उदघाटन
महात्मा गांधी विद्यालयात सुरू असलेल्या युवाशक्ती साहित्य संमेलानाच्या उद््घाटनप्रसंगी ग्रंथ प्रदर्शनही भरवण्यात आले आहे. या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन अरविंद जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रदर्शनात विविध विषयांवरील पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. शनिवारी पहिल्या दिवशी प्रदर्शनाला रसिकांनी मोठ्या संख्येने भेट दिली.

Web Title: Conceptual slavery due to technology- Arvind Jagtap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.