भिवंडी : भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेची महासभेस आयुक्त योगेश म्हसे आज रोजी उपस्थित न राहिल्याने उपस्थित नगरसेवकांनी महासभा सुरू न करता तहकूब केली.
शहरातील जनता मुलभूत सोयीसुविधेसाठी तडफडत असताना नियोजीत महासभेस आयुक्तांनी गैरहजर रहाणे नगरसेवकांना न रूचल्याने महापौरांनी आजची महासभा रद्द केली.या पुर्वी झालेल्या स्थायी समितीच्या तीन सभेस देखील आयुक्त उपस्थित नसल्याने सभेचे कामकाज झाले नाही.त्याचप्रमाणे आज देखील महासभेस आयुक्त योगेश म्हसे उपस्थित न रहाता त्यांच्या जागी अतिरिक्त आयुक्त अशोक रणखांबे उपस्थित होते.परंतू अतिरिक्त आयुक्त रणखांबे यांना महासभा चालविण्याचे लेखी आदेश आयुक्तांनी न दिल्याने महासभेत नागरिकांच्या हिताचे निर्णय घेणे नगरसेवकांना शक्य झाले नाही.त्यामुळे संतप्त नगरसेवकांनी महासभेत गोंधळ घातला आणि महासभेचे अध्यक्ष महापौर जावेद दळवी यांच्याकडे आपला बहुमुल्य वेळ वाया गेल्याच्या तक्रारी नगरसेवकांनी केल्या.याबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याची माहिती देत महापौर दळवी यांनी महासभा तहकुब केली.