आ. प्रताप सरनाईकांनी नाट्यगृहाच्या पूर्णत्वासाठी मुख्यमंत्र्यांना घातले साकडे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2017 07:40 PM2017-12-04T19:40:20+5:302017-12-04T19:40:38+5:30

मीरा-भार्इंदर महापालिकेच्या निर्देशानुसार दहिसर चेकनाका परिसरात नियोजित नाट्यगृहाच्या निश्चित मुदतीतील बांधकाम पूर्णत्वावरच महापौर डिंपल मेहता यांनी शंका उपस्थित करून त्यांनी त्याची बांधकाम परवानगीच रद्द करण्याचा प्रस्ताव ८ डिसेंबरच्या महासभेत आणण्याची तयारी केली आहे.

Come on. Pratap Sarnaik put the Chief Minister in charge of the theater | आ. प्रताप सरनाईकांनी नाट्यगृहाच्या पूर्णत्वासाठी मुख्यमंत्र्यांना घातले साकडे

आ. प्रताप सरनाईकांनी नाट्यगृहाच्या पूर्णत्वासाठी मुख्यमंत्र्यांना घातले साकडे

Next

- राजू काळे
भार्इंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेच्या निर्देशानुसार दहिसर चेकनाका परिसरात नियोजित नाट्यगृहाच्या निश्चित मुदतीतील बांधकाम पूर्णत्वावरच महापौर डिंपल मेहता यांनी शंका उपस्थित करून त्यांनी त्याची बांधकाम परवानगीच रद्द करण्याचा प्रस्ताव ८ डिसेंबरच्या महासभेत आणण्याची तयारी केली आहे. त्यावर आ. प्रताप सरनाईक यांनी भाजपाच्या कुरघोडीच्या राजकारणाला ब्रेक लावण्याची तक्रार थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करीत नियोजित नाट्यगृह पूर्णत्वास जाण्याचे साकडे देखील त्यांना घातले आहे.

२०११ मध्ये दहिसर चेकनाका परिसरात असलेल्या डी. बी. रिअ‍ॅल्टी या विकासाच्या गृहप्रकल्पाला पालिकेने बांधकाम परवानगी दिली. त्यापोटी पालिकेला मिळालेल्या आरजी (रिक्रिएशन ग्राऊंड)वर नाट्यगृह बांधण्यात यावे, अशी मागणी आ. प्रताप सरनाईक यांनी पालिकेकडे केली. परंतु ही जागा बिल्डरच्याच घशात घालण्याचे कटकारस्थान काही भ्रष्ट अधिका-यांकडून सुरू झाल्याने ती पुन्हा आंदोलनाच्या माध्यमातून पालिकेकडे आणण्यास आ. सरनाईक यांना यश आले.

शहरात एकही नाट्यगृह उपलब्ध नसल्याने स्थानिक नाट्यरसिकांना बोरिवली अथवा दादर येथे जावे लागते. त्यामुळे शहरातच नाट्यगृह बांधल्यास स्थानिक नाट्यरसिकांची सोय होऊन नाट्यकलाकारांना शहरातच हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होईल, यासाठी नाट्यगृहाची मागणी सरनाईक यांनी पालिकेकडे रेटून धरली. विकासकाने बांधलेल्या गृहप्रकल्पासाठी या जागेचा टीडीआर (ट्रान्सफर आॅफ डेव्हलपमेंट राईट) वापरण्यात आल्याने त्याच्या मोबदल्यात विकासकाने स्वखर्चातून नाट्यगृह बांधण्याचे पालिकेकडून निश्चित करण्यात आले.

परंतु विकासाकडून सतत विलंब होऊ लागल्याने अखेर १७ नोव्हेंबरच्या पाहणी दौ-यात सरनाईक यांनी विकासकाला नाट्यगृहाच्या बांधकामाला त्वरित सुरुवात करण्याचे निर्देश दिले. पालिकेने देखील विकासकाला बांधकाम परवानगी देत बांधकाम पूर्णत्वासाठी डिसेंबर २०१८ पर्यंतचे अल्टिमेटम दिले. त्याचे काम सुरू झाल्यानंतर महापौर डिंपल मेहता यांनी नाट्यगृहाच्या पूर्णत्वावरच संशय व्यक्त करून त्याची बांधकाम परवानगीच रद्द करण्याचा प्रस्ताव येत्या ८ डिसेंबरच्या महासभेत आणण्याची तयारी केली आहे. त्यात अनेक वर्षांच्या विलंबानंतरही विकासकाकडून डिसेंबर २०१८ पर्यंत नाट्यगृहाचे बांधकाम पूर्ण होणार नाही. त्यामुळे ती जागा पालिकेच्या ताब्यात दिल्यास त्याचे बांधकाम पालिकेकडून केले जाईल.

विकासाच्या दिरंगाईला चाप लावण्यासाठीच बांधकाम परवानगीवर टाच आणण्याचा दावा करण्यात आला आहे. त्याची कुणकुण सरनाईक यांना लागताच त्यांनी महापौरांच्या कुरघोडीवर सडकून टीका करीत भाजपा आ. नरेंद्र मेहता यांच्यावरही शरसंधान साधले. यामुळे ८ डिसेंबरची महासभा वादळी ठरण्यापूर्वीच महापौरांचा प्रस्ताव गुंडाळला जावा, यासाठी सरनाईक यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच साकडे घातले आहे.

राणेंच्या स्वाभिमानचा नाट्यगृह पूर्णत्वाला पाठिंबा
काँग्रेसचे आ. नितेश राणे यांच्या स्वाभिमान संघटनेनेही महापौरांच्या, नाट्यगृहाची परवानगी रद्द करण्याच्या मनसुब्यावर प्रहार करीत सेनेच्या कारभारावरही आसूड ओढले आहे. संघटनेचे मीरा-भार्इंदर शहर (जिल्हा) उपाध्यक्ष मनोज राणे यांनी पालिका आयुक्त डॉ. नरेश गीते यांना दिलेल्या पत्रात नाट्यगृहाच्या बांधकामाची परवानगी रद्द न करता ते पूर्णत्वास न्यावे, अशी मागणी केली आहे. मोठ्या विलंबानंतर नाट्यगृहाचे बांधकाम सुरु झाले असताना सत्ताधारी भाजपा व विरोधी बाकावरील शिवसेना यांच्यातील राजकीय कुरघोडीमुळे शहरवासीय विकासाला मुकत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. एकमेकांच्या कुरघोडीत भाजपाने बहुमताच्या जोरावर नाट्यगृहाची परवानगी रद्द केल्यास स्वाभिमानकडून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा अखेर इशारा त्यांनी दिला आहे.

Web Title: Come on. Pratap Sarnaik put the Chief Minister in charge of the theater

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.