Cleanliness of Mud lake through public participation | लोकसहभागातून वडवली तलावाची स्वच्छता
लोकसहभागातून वडवली तलावाची स्वच्छता

बदलापूर : अंबरनाथ आणि बदलापूरच्या मध्यावर असलेल्या वडवली शिव मंदिर तलावात गाळ साचल्याने या तलावाचे सुशोभीकरण रखडले होते. या तलावातील गाळ काढण्यासाठी अंबरनाथ पालिका पुढाकार घेत नसल्याने आता या भागातील सेवाभावी संस्थांनी पुढे येऊन तलावाचे काम हाती घेतली आहे. लोकसहभागातून आणि शहरातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या मदतीने या तलावातील गाळ काढण्याचे काम सुरू केले आहे.

अंबरनाथ नगरपालिका हद्दीत असलेल्या आणि बदलापूरच्या सीमेवरील वडवली तलाव हे निसर्गरम्य परिसरात आहे. या तलावाच्या परिसरात अनेक पक्ष्यांचा वावर असल्याने या तलावाशेजारी बसून निसर्गाचा मनमुराद आनंद घेता येतो. मात्र, या तलावात अनेक वर्षांपासून गाळ साचला होता. तो गाळ काढण्यासाठी कोणीच पुढाकार घेतला नाही. त्यामुळे वडवली गावातील तरुण आणि जीबीके ग्रुपच्या पुढाकाराने या तलावातील गाळ काढण्याचे काम सुरू केले आहे. गेल्या वर्षी या तलावातील गाळ काढण्याचे काम सुरू करून तो तलाव अर्धा स्वच्छ केला होता. दोन महिन्यांत ते काम करणे शक्य नसल्याने निम्मे काम यावर्षी करण्यात येत आहे. या तलावातील गाळ काढण्यासाठी लागणारी सामग्री शहरातील सेवाभावी संस्था, संघटना आणि शहरातील प्रतिष्ठित व्यक्त करत आहेत. अनेकांच्या मदतीमुळे हे काम अविरतपणे सुरू आहे.

नैसर्गिक झरे जिवंत करण्याचे प्रयत्न : मे महिन्याच्या शेवटपर्यंत तलावातील सर्व गाळ काढून या तलावाचे खोलीकरण करण्यात येणार आहे. तसेच नैसर्गिक झरे जिवंत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या कामासाठी तुकाराम म्हात्रे आणि त्यांचे सहकारी दिवसरात्र काम करत आहेत. तलाव स्वच्छ झाल्यावर पावसाळ्यात पुन्हा या तलावाचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. हा परिसर स्वच्छ करून नागरिकांची चांगली सोय या ठिकाणी करण्यात येणार असल्याचे म्हात्रे यांनी स्पष्ट केले.


Web Title: Cleanliness of Mud lake through public participation
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.