शहरीकरणातून जन्मलेल्या समस्यांचा उहापोह करण्यासाठी सिटीपीडिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 08:57 PM2018-01-21T20:57:28+5:302018-01-21T21:02:27+5:30

ठाणे : शहरीकरणाचा वाढता वेग, त्यातून उद्भवणार्‍या नानाविध समस्यांचा उहापोह करण्यासाठी सिटीपीडिया या नावाने नवे सशक्त पोर्टल जनसामान्यांसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. विकीपीडियाच्या धर्तीवर हे पोर्टलही सर्वांसाठी खुले राहणार आहे.

Citypedia a new platform to discuss problems arising from urbanization | शहरीकरणातून जन्मलेल्या समस्यांचा उहापोह करण्यासाठी सिटीपीडिया

thane

googlenewsNext
ठळक मुद्देसशक्त पोर्टल जनसामान्यांसाठी उपलब्धयंत्रणेवर दबाव निर्माण करण्यास मदतसाधक-बाधक चर्चा घडवून आणणे शक्य

ठाणे : शहरीकरणाचा वाढता वेग, त्यातून उद्भवणार्‍या नानाविध समस्यांचा उहापोह करण्यासाठी सिटीपीडिया या नावाने नवे सशक्त पोर्टल जनसामान्यांसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. विकीपीडियाच्या धर्तीवर हे पोर्टलही सर्वांसाठी खुले राहणार आहे.
नागरी समस्यांवर उपाय शोधणार्‍या सिटीपीडिया प्रकल्पाची माहिती देण्यासाठी लोकजागर फेस्टच्या वतीने रविवारी टाऊन हॉलमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ठाणे मतदाता जागरण अभियानचे अध्यक्ष अनिल शाळीग्राम यांनी सिटीपीडिया.नेट.इन या पोर्टलची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. महाराष्ट्रातील सर्व मोठ्या शहरांसाठी या पोर्टलवर स्वतंत्र विभाग तयार करण्यात आले आहेत. विकीपीडिया सर्वांसाठी खुली आहे. या पोर्टलवर कुणालाही काहीही प्रसिद्ध करण्याची मुभा आहे. त्याचप्रमाणे ‘सिटीपीडिया’ही सर्वांसाठी खुली राहणार आहे. या पोर्टलवरही सामान्य नागरिक त्यांची मते खुलेपणाने मांडू शकणार आहेत. त्यांची मते संपादित करण्याची, त्यावर भाष्य करण्याचे अधिकार सर्वांनाच राहील, असे शाळीग्राम यांनी यावेळी सांगितले.
वाढत्या शहरीकरणाने अनेक समस्यांना जन्म घातला आहे. महत्वाच्या समस्या प्रसारमाध्यमांद्वारे प्रसिद्ध केल्या जातात. मात्र प्रसारमाध्यमांना मर्यादा असतात. समस्या कितीही मोठी असली तरी काही दिवसांनी ती लोकांच्या विस्मृतीत जाते. ‘सिटीपीडिया’वर अगदी लहानात लहान समस्या मांडून त्यावर साधक-बाधक चर्चा घडवून आणणे शक्य आहे. या चर्चेतून यंत्रणेवर दबाव निर्माण करण्यास मदत होईल. ‘सिटीपीडिया’वरील प्रत्येक लेखाची जबाबदारी लेखकाची असेल. असा लेख ‘सिटीपीडिया’वर प्रसिद्ध करण्यापूर्वी किंवा त्यावर कुणालाही भाष्य करण्यापूर्वी पोर्टलवर रितसर नोंदणी करावी लागणार आहे. आरोग्य, वाहतूक, रस्ते, पाणी यासारख्या अनेक समस्या दिवसागणिक वाढत आहेत. या समस्यांवर लोकचर्चा रंगल्यास त्याद्वारे यंत्रणेवर दबाव निर्माण करणे तसेच जनमत घडविणे शक्य होते. त्यामुळे अशा प्रकारची लोकचर्चा नोकरशाही किंवा लोकप्रतिनिधी दोहोंनाही नको असते. हा मुद्दा हेरून ‘सिटीपीडिया’ने जनसामान्यांसाठी सशक्य व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. सुरूवातीच्या काळात ‘विकीपीडिया’बाबत लोकांना संशय होता. कुणालाही काहीही लिहिण्याची किंवा कुणीही लिहिलेले संपादित करण्याची मुभा सर्वांना असल्याने ‘विकीपीडिया’ची विश्वासार्हता कितपत टिकून राहील, असा स्वाभाविक प्रश्न सर्वांपुढे होता. अल्पावधीत हा भ्रम दूर झाला आणि विकीपीडिया एक विश्वासार्ह वेबसाईट म्हणून जगप्रसिद्ध झाली. ‘सिटीपीडिया’देखील लवकरच लोकांचा विश्वास लवकरच जिंकेल असा विश्वास शाळीग्राम यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी ठाणेकरांनी चर्चेमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. पोर्टलविषयी अनेकांनी आपल्या शंका विचारल्या. शाळीग्राम यांनी त्यांचे समाधान केले.

Web Title: Citypedia a new platform to discuss problems arising from urbanization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.