नगराध्यक्षपदाची निवडणूक : बदलापूरच्या नगरसेवकांना पंचतारांकित पाहुणचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 01:05 AM2017-11-18T01:05:27+5:302017-11-18T01:05:39+5:30

नगराध्यक्षपदासाठी शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत असल्याने शिवसेनेने आपल्या नगरसेवकांना अज्ञातस्थळी रवाना केले आहे.

 Chief Election Commissioner: Badlapur corporators get five-star hospitality | नगराध्यक्षपदाची निवडणूक : बदलापूरच्या नगरसेवकांना पंचतारांकित पाहुणचार

नगराध्यक्षपदाची निवडणूक : बदलापूरच्या नगरसेवकांना पंचतारांकित पाहुणचार

Next

बदलापूर : नगराध्यक्षपदासाठी शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत असल्याने शिवसेनेने आपल्या नगरसेवकांना अज्ञातस्थळी रवाना केले आहे. हे सर्व नगरसेवक मुंबईच्या जे.डब्ल्यू. मॅरिएट या पंचतारांकित हॉटेलमध्ये असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
नगराध्यक्षपदावरून ज्या वेगाने बदलापूरमध्ये हालचाली सुरू झाल्या, त्याच वेगाने या ठिकाणी असलेले मतभेदही शमल्याचे दिसत आहे. राऊत विरुद्ध म्हात्रे असे चित्र बदलापूरमध्ये रंगवण्यात आले होते. मात्र, नगराध्यक्ष म्हात्रे यांनीच पुढाकार घेत राऊत यांना उमेदवारी देण्यात आपली कोणतीच हरकत नसल्याचे स्पष्ट करत राऊत यांना समर्थनही दिले.
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना नगराध्यक्षपदाच्या इच्छुक उमेदवारांची नावे कळवण्यात आली होती. त्यानुसार, विजया राऊत यांना पहिले सव्वा वर्ष नगराध्यक्षपद देण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला. या निर्णयाला सर्व नगरसेवकांनी समर्थनही दर्शवले आहे. पुढील सव्वा वर्ष अ‍ॅड. प्रियेश जाधव यांना देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. नगरसेवकांनीच एकत्रित निर्णय घेत अंतर्गत वाद मिटवल्याने भाजपाची चांगलीच कोंडी झाली आहे. शिवसेनेच्या फुटीर गटाला सोबत घेऊन सत्तेची गणिते आखण्याचा प्रयत्न भाजपा करत होते. मात्र, शिवसेनेने भाजपाचे मनसुबे ओळखले असून पक्षात वाद निर्माण होणार नाही, याची दक्षता घेत थेट नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचे नाव जाहीर करून सर्व वादांवर पडदा टाकला आहे.
निवडणुकीचे वातावरण पाहता उमेदवारी अर्ज भरताना कोणता घोळ होऊ नये, यासाठी शिवसेनेने आपल्या नगरसेवकांना एकत्रित ठेवत अज्ञातस्थळी रवाना केले आहे. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेनेचे सर्व नगरसेवक जुहूच्या जे.डब्लू. मॅरिएट हॉटेलमध्ये मुक्कामाला आहेत. या ठिकाणी सर्व नगरसेवकांना एकत्रित ठेवत शनिवारी दुपारी नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. शिवसेना एकसंध झाल्याने बदलापूरची नगराध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध होण्याचे संकेत मिळत आहेत.

Web Title:  Chief Election Commissioner: Badlapur corporators get five-star hospitality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.