अंबरनाथ : अंबरनाथ नगपरिषदेचे सहाय्यक नगररचनाकार विद्यासागर चव्हाण यांना बलात्कार प्रकरणात ठाणे न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. तर अंबरनाथ पालिकेतील लाच प्रकरणात देखील त्यांना कल्याण न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. सलग दोन्ही प्रकरणात चव्हाण यांना जामीन मिळाल्याने त्यांच्या नोकरीवर येणारे संकट टळले आहे.
अंबरनाथ नगरपरिषदेत चव्हाण यांना रंगेहाथ पकडण्यासाठी मुंबईच्या लाचलुचपत विभागाने सापळा
रचला होता. चव्हाण यांनी
लाचेची रक्कम घेतल्याचा दावा पोलिसांनी केला होता. मात्र रंगेहाथ न पकडल्याने चव्हाण यांनी या
प्रकरणात आपल्याला गोवण्यात येत असल्याचे कारण पुढे करून न्यायालयातून अंतरिम जामीन मिळविला होता.
मात्र हा जामिन रद्द करण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. हे प्रकरण सुरु असतांनाच पुन्हा चव्हाण यांच्या विरोधात एका महिलेने लैंगिक
शोषण केल्याचा आरोप करित बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल केला होता.
लाच प्रकरणात चव्हाण यांना गोवण्याचा प्रयत्न फसल्याने पुन्हा आपल्याला नवीन प्रकरणात गोवल्याचा दावा करित त्यांनी पुन्हा अंतरिम जामिन मिळविला होता. दोन्ही प्रकरणात अंतरिम जामिनावर असलेल्या चव्हाण यांनी या प्रकरणात कायमस्वरुपी जामिनासाठी अर्ज केला. ५ जानेवारीला कल्याण न्यायालयात लाच प्रकरणात चव्हाण यांना न्यायालयाने जामिन मंजूर केला. तर बलात्कार प्रकरणात ठाणे न्यायालयाने देखील त्यांना जामीन मिळाला आहे.
चव्हाण तुरी देऊन निसटल्याने हे प्रकरण चर्चेत होते. शिवाय त्यांच्या लाच प्रकरणानंतर पालिकेत फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागले होते. (प्रतिनिधी)