बालभारतीचे बदल भाषिक की गणितीय दृष्टीने?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 01:28 AM2019-06-19T01:28:05+5:302019-06-19T01:28:16+5:30

ठाणेकरांचा संमिश्र प्रतिसाद; संख्याओळख आणखी स्पष्ट होईल, मात्र भाषेचे सौंदर्य लोप पावणार असल्याची खंत

The changes in childhood are linguistic mathematical terms? | बालभारतीचे बदल भाषिक की गणितीय दृष्टीने?

बालभारतीचे बदल भाषिक की गणितीय दृष्टीने?

Next

- स्नेहा पावसकर/पंकज पाटील/अनिकेत घमंडी 

ठाणे : मराठी भाषा वळवावी तशी वळते, असे म्हणतात, ते खरेच आहे. पण आकडेमोडीचा विषय असणाऱ्या गणिताच्या अभ्यासक्रमातही आता याचा प्रत्यय आला आहे. कारण यंदा दुसरी इयत्तेच्या गणित विषयात संख्याच्या उच्चारणाची रितच बदलली आहे. याबाबत विद्यार्थी आणि पालकांमधून नाराजीचा सूर लागत असला, तरी ठाण्यात मात्र याबाबत संमिश्र प्रतिसाद आहे. ठाण्यातील शिक्षणतज्ज्ञ, अभ्यासक, काही मुख्याध्यापक यांनी या बदलाचे स्वागत केले असून, दुसरीकडे काही शिक्षक, संस्थाचालकांनी मात्र या बदलामुळे मराठी भाषेचे सौंदर्य लोप पावणार असल्याची खंत व्यक्त केली आहे.

यंदा बदललेल्या इयत्ता दुसरीच्या पुस्तकात संख्यावाचन करताना पंचवीसऐवजी वीस पाच, बेचाळीस ऐवजी चाळीस दोन असे वाचण्यास सांगितलेले आहे. मराठी जोडाक्षरे कठीण असल्याचे कारण देत, हा बदल केल्याचे बालभारतीने सांगितले आहे. मात्र ही पद्धत मुलांच्यादृष्टीने अधिक कठीण आहे, हे बदल भाषिक दृष्टीने की गणितीय दृष्टीने आहे हेच कळत नाही, असे अनेक सूर पालक वर्गातून उमटत आहेत. मात्र ठाण्यातील शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी याबाबत काहीशी संमिश्र प्रतिक्रिया दिलेली आहे. या बदलाने मुलांच्या दृष्टीने काठिण्य पातळी काहीशी वाढली आहे, पण संख्या ओळख मुलांना अधिक स्पष्ट होईल. इतर अभ्यासक्रमांच्या धर्तीवर हा बदल केलेला असून, जर त्यांच्याशी स्पर्धा आहे तर बदल अंगीकारणे गरजेचे आहे, असा अनेकांचा सूर दिसून येतो. तर हल्लीची पिढी ही खूप फास्ट आहे. कोणतीही गोष्ट ते झटपट शिकतात, अशा पिढीतील मुलं हा बदलही तितकाच झटपट आत्मसात करतील, असेही अनेकांचे मत आहे. दुसºया बाजूला या निर्णयामुळे मराठी भाषेचे सौंदर्य लोप पावेल, इंग्रजीच्या धर्तीवर केलेले हे बदल मराठी भाषेचे खच्चीकरण करेल, या बदलामुळे प्रचलित व्यवहार पद्धतीत बदल होणार नसेल, तर बदलाचा काय उपयोग, असेही मत काहींनी मांडले आहे.

नव्या प्रयोगामुळे विद्यार्थ्यांना गणित विषयाबद्दल आणखी अनास्था वाटेल. प्रचलित पद्धतीत असे कोणते मोठे दुर्गुण होते की, ज्यामुळे इंग्रजीच्या धर्तीवर संख्या उच्चार करण्याचे घाटत आहे? जी पद्धत पिढ्यान्पिढ्या चालत आली आहे व जिच्याबद्दल कुणाचीही तक्रार नाही, ती का बदलता? शिक्षणाचा दर्जा सुधारणे म्हणजे ह्यजुने जाऊ दे मरणलागीह्ण असं तर नव्हे ना? प्रांत बदलला की, उच्चार बदलतात. तरीही एकोणीस आणि एकोनविस म्हणजे १९ हे नेहमीच स्पष्ट असतं. बाराखडीत आधीच ढवळाढवळ सुरू केली आहे, त्यात आता ह्यहेह्ण. विषय तज्ज्ञांनी वेगवेगळ्या शाळांना भेट देऊन, तेथील शिक्षकांशी व विद्यार्थ्यांशी समग्र चर्चा करून, मगच आपले ह्यसंशोधनह्ण शिक्षण क्षेत्राशी संबंधित ठिकाणी चर्चेला न्यावे. काही काळापूर्वी सर्व विषयांचे नियोजित ढाचेविषयक मसुदे एकाच ह्यसर्वज्ञह्ण अधिकाºयाकडून ह्यमान्यह्ण करून घ्यावे, असे आदेश देण्यात आल्याचे ऐकिवात आले होते. माते सरस्वती, आमच्या मराठीला वाचव!
- विवेक पंडित, संचालक, विद्यानिकेतन, डोंबिवली

हा बदल अनुकू ल आहे. अभ्यासक्रमात बदल करताना तो मुलांची आकलनशक्ती लक्षात घेऊन त्यावर दोन्ही बाजूने चर्चा होऊनच केला जातो. हा बदल नक्कीच चांगला आहे आणि हळूहळू तो मुलांनाही सवयीचा होईल. यामुळे मुलांना संख्या अधिक स्पष्टपणे कळू शकेल.
- एकनाथ आव्हाड, बालसाहित्यिक

यापूर्वी साधारण १९७५ साली गणित अभ्यासक्रमात असाच बदल झाला होता. जुनी पद्धत जाऊन एकक, दशक आणि इतर बदल केले होते. मात्र हळूहळू ते शिकून आपण आत्मसात केले. कोणताही बदल स्विकारायला थोडा वेळ लागतो आणि मूळात वीस एक - एकवीस, तीस दोन बत्तीस या बदललेल्या पद्धतीत मुलांना अधिक स्पष्ट करून सांगितले आहे, असे वाटते. गणिताचे मूल्य ओळखण्यासाठी अभ्यासक्रमात ही एक पायरी वाढवलेली आहे. यापूर्वी आपण दोनावर एक - एकवीस म्हणत होतो आणि तसे असले तरीही लिहिताना दोनाच्या बाजूलाच एक लिहीत होतो. मग तेही उच्चारणात चुकीचेच होते. परंतु हळूहळू आपण ती पद्धत आत्मसात केली. आणि वीसएक म्हटल्यावर एकवीस आपण म्हणू शकतो. ते शब्द काढून टाकलेले नाही, हेसुद्धा तितकेच खरे आहे.
- सुरेंद्र दिघे, शिक्षणतज्ज्ञ

सीबीएसई आणि इतर बोर्डांच्या अभ्यासक्रमाच्या धर्तीवर आणि त्यांच्याशी स्पर्धेत उतरायचे आहे, हे लक्षात घेता महाराष्टÑ सरकारने हा बदल केलेला आहे. यातून काही अंशी मुलांच्यादृष्टीने अभ्यासाची काठिण्य पातळी वाढलेली असली तरी बदल स्वागतार्ह आहे. कारण काळाची गरज म्हणून तशाप्रकारची सुरूवात होणे गरजेचे होते. अर्थात याला विद्यार्थी आणि शिक्षकांकडून कसा प्रतिसाद मिळतो, हे पुढील काही महिन्यातच लक्षात येईल.
- बी.एन.पाटील,
अध्यक्ष- ठाणे जिल्हा गणित अध्यापक मंडळ

सरकारने हा निर्णय घेताना कोणती उद्दिष्टे ठेवली होती, ते जाहीर करणे गरजेचे आहे. कोणताही निर्णय घेत असताना त्याचे चांगले परिणाम काय होतील, हे लक्षात आल्यावरच निर्णय घेतले जातात. त्यानुसार सरकारने आपले उद्दिष्ट स्पष्ट केले तरच प्रतिक्रिया देणे योग्य ठरेल. तर दुसरीकडे आपल्याकडे प्रचलित दशमान पद्धती ही विद्यार्थ्यांसाठी सोयीची आहे. दोन वर एक २१, दोन वर दोन २२ असं शिकवणे हे विद्यार्थ्यांसाठी उचित ठरतं. त्यामुळे कोणताही निर्णय घेत असताना त्याने प्रचलित व्यवहारात कोणता बदल होईल, हेदेखील समोर येणे गरजेचे आहे
- सुचिता सकपाळ, शिक्षिका, अंबरनाथ

भाषिक विकास कसा करायचा? एखादा बदल घडवून आणायचा असतो, तेव्हा त्याच्या परिणामांचा अभ्यास करणे गरजेचे आहे. प्रयोगशिल असेल तर प्रयोग करावेत. दुसरीच्या विद्यार्थ्यांवर प्रयोग कसले करता? हे योग्य नाही. आपण इंग्रजांच्या पावलावर पाऊल का ठेवत आहोत, याचा विचार व्हावा. आपण लोकशाहीत आहोत, की हिटलरशाहीत? शिक्षण मंडळाचा खेळखंडोबा बघवत नाही.
- अ‍ॅड. प्रा. प्रविण मुश्रीफ, डोंबिवली

खरं तर ९० अधिक २ हे सहज पाठांतर करायला कठीणच असेल. पण तरीही त्यासंदर्भात अधिक भाष्य आताच करता येणार नाही. प्रयोग केल्यानंतरच ते योग्य की अयोग्य हे स्पष्ट होईल.
- दर्शना सामंत, संचालिका, ओंकार इंटरनॅशनल स्कूल,
डोंबिवली

शिक्षणाचा खेळखंडोबा सुरु झाला आहे. विद्यार्थ्यांवर प्रयोग करणे योग्य नाही. एकीकडे आपण यूपीएससी, एमपीएससीकडे विद्यार्थी वाढावेत, असे स्वप्न बघतो. त्यादृष्टीने प्रयत्न का करत नाही? आठवी पाससारखं होईल, याची कोणीच का दखल घेत नाही? त्यामुळे ज्यांनी कोणी हा प्रस्ताव आणला आहे, त्यांनी नेमक्या कोणत्या निकषांवर आधारित हा निर्णय घेतला आहे, याचा अभ्यास होणे अत्यावश्यक असून या बाबी लादल्याने फारसा काही फरक पडेल असे वाटत नाही.
- प्रसाद मराठे, शिक्षक, महात्मा गांधी हायस्कूल, कल्याण

प्रयोग करून बघायला काहीही हरकत नाही. ९0 अधिक २ असं म्हणण्याची पद्धत आताची नाही. असं ग्रामीण भागात म्हटलं जात. त्यामुळे ते काही चुकीचे नाही, याचीही यानिमित्ताने नोंद घेण्याची गरज आहे. उलट ही पद्धत जास्त शास्त्रीय आहे.
- किरण लिमये, सजग संस्था, कल्याण

नव्या शिक्षण पद्धतीपेक्षाही शिक्षकांचे प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे. शिक्षकांचे शिक्षण आवश्यक असून त्यांना आधी विद्यार्थी कसे घडवावेत, हे सांगणे महत्वाचे आहे. त्यामुळे तज्ज्ञांनी यासंदर्भात विचार करणे गरजेचे आहे.
- प्रा. वैभव जोशी,
कल्याण

सरकारचा हा निर्णय म्हणजे केवळ इंग्रजीचे अनुकरण असेच म्हणावे लागेल. व्यवहारात एकवीस, बावीस, तेवीस हे उच्चार प्रचलित झालेले आहे. नव्या पद्धतीने आकडेमोड करणे किंवा उच्चार करणे हे अवघड जाणार आहे. त्यामुळे या निर्णयासंदर्भात पुनिर्वचार होणे गरजेचे आहे.
- ज्ञानेश्वर म्हात्रे, शिक्षक, बदलापूर

जुनी पद्धती अर्थात एकवीस, बावीस ही चांगली होती. मात्र हल्लीची मुलं ही खूप स्मार्ट आहेत. त्यांची आकलन क्षमता लक्षात घेताच हा बदल केलेला आहे. हा बदल सुरूवातीला समजायला काहीसा अवघड असला तरी असे बदल होणे गरजेचे आहे.
सुनिल पाटील - मुख्याध्यापक, प्राथमिक विभाग, मो.ह.विद्यालय.

Web Title: The changes in childhood are linguistic mathematical terms?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.