आव्हाडांसमोर युतीच्या गनिमीकाव्याचे आव्हान, शिवसेनेची नवी रणनीती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 12:50 AM2019-05-29T00:50:05+5:302019-05-29T00:50:15+5:30

कल्याण लोकसभा मतदारसंघात असलेल्या कळवा-मुंब्रा या विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला मागील निवडणुकीपेक्षा जास्तीची मते मिळाली

Challenge of coalition alliance in front of Avhad, new strategy of Shivsena | आव्हाडांसमोर युतीच्या गनिमीकाव्याचे आव्हान, शिवसेनेची नवी रणनीती

आव्हाडांसमोर युतीच्या गनिमीकाव्याचे आव्हान, शिवसेनेची नवी रणनीती

googlenewsNext

- अजित मांडके
कल्याण लोकसभा मतदारसंघात असलेल्या कळवा-मुंब्रा या विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला मागील निवडणुकीपेक्षा जास्तीची मते मिळाली असल्याचे लोकसभेच्या निकालावरून दिसून आले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक ही राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना अतिशय अवघड जाणार असल्याचे दिसत आहे. या मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांना ६७ हजार ४५५ मते मिळाली आहेत. मागील निवडणुकीच्या तुलनेत या मतांमध्ये तब्बल १४ हजार ५५१ मतांची निर्णायक वाढ झाल्याचे दिसून येत आहे. तर या मतदारसंघातून राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील यांना ७७ हजार ३३६ मते मिळाली असून मागील वेळेस राष्ट्रवादीला ६५ हजार १६० मते मिळाली होती. त्यात यंदा केवळ १२ हजार १७६मते जास्तीची मिळाली आहेत. परंतु, शिवसेनेच्या मतांमध्ये राष्ट्रवादीच्या मतांच्या तुलनेत काहीशी वाढ झाल्याने ही शिवसेनेसाठी जमेची बाजू असून मागील वेळेप्रमाणे पुन्हा एमआयएमला येथे उमेदवारी देऊन मतांचे विभाजन करून शिवसेना येथून शिवसेना आव्हाडांना आव्हान देऊ शकते. तशी रणनीती आतापासूच सुरू झाली असून असे झाल्यास राष्टÑवादीला कळवा-मुंब्य्राचा गड राखणे कठीण जाणार आहे.
कळवा-मुंब्रा या विधानसभा मतदारसंघात राष्टÑवादीचे कळव्यातून ८, मुंब्रा, दिवा भागातून २१ नगरसेवक निवडून आले. तर कळव्यातील आणि मुंब्य्रातील दोन अपक्ष नगरसेवकांनीही राष्टÑवादीबरोबर घरोबा केला आहे. यामुळे राष्टÑवादीकडे ३१ नगरसेवकांचे पाठबळ येथे आहे. तर शिवसेनेला मात्र कळवा आणि मुंब्य्रात फटका बसल्याचे दिसून आले. कळव्यात शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये एकने घट होऊन त्यांची संख्या सात आली आहे. तर मुंब्य्रात शिवसेनेला भोपळाही फोडता आलेला नाही. दिव्यात मात्र भाजपची लाट असतानाही त्याठिकाणी आठही जागा शिवसेनेने आपल्या ताब्यात घेतल्या. त्यामुळे ही शिवसेनेसाठी जमेची बाजू ठरली.
२०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत एकट्या राष्टÑवादीला ८६ हजार ५३३ मते मिळाली होती. तर काँग्रेसला अवघी तीन हजार ८४७ मते मिळाली होती. शिवसेनेला येथून ३८ हजार ८५० मते मिळाली होती, तर एमआयएमला येथून १६ हजार ३७४ आणि भाजपला १२ हजार ८१८ मते मिळाली होती. शिवसेना आणि भाजपची मते मिळून ५१ हजार ६६८ मते मिळाली होती. यंदा लोकसभा निवडणुकीत यात शिवसेनेला या मतदारसंघातून ६७ हजार ४५५ मते मिळाल्याचे दिसून आले. त्यामुळेच शिवसेनेच्या मतांमध्ये वाढ झाल्याचेच दिसत आहे. राष्टÑवादीचे उमेदवार बाबाजी पाटील यांना या मतदारसंघातून ७७ हजार ३३६ मते मिळाली. पण विधानसभेला आव्हाडांना मिळालेल्या मतांच्या तुलनेत त्यात नऊ हजार १९७ मतांची घट झाल्याचे दिसून आले. त्यामुळे राष्टÑवादीला हा धक्का मानला जात आहे. ंशिवाय, या निवडणुकीत या पट्ट्यात वंचित आघाडी चालली नसली तरी आगामी विधानसभा निवडणुकीत तिचा उमेदवार हा निर्णायक भूमिकेत असणार आहे. मागील निवडणुकीत मनसे लढली असली तरी यंदा मात्र त्यांच्या मतांचा फायदा हा राष्टÑवादीच्या उमेदवाराला होईल, असा अंदाज होता; पण तसे काही या मतदारसंघात घडल्याचे दिसले नाही. त्यामुळे ही राष्टÑवादीसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. त्यामुळे मागील वेळेस जी खेळी शिवसेनेने केली होती, तशीच काहीशी खेळी आगामी विधानसभा निवडणुकीत खेळली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुंब्य्रातून एमआयएमचे कार्ड चालवायचे आणि राष्टÑवादीच्या मतांमध्ये फूट पाडायची आणि कळव्यातून पुन्हा शिवसेनेचा उमेदवार उभा करून त्याने कळव्यातील मते घ्यायची अशी रणनीती आखण्याचा शिवसेनेचा प्रयत्न होता. पण औरंगाबाद पॅर्टनही येथे चालला तर एमआयएमला त्याचा फायदा होऊनसेनेचा उमेदवार पडूही शकतो.
>की फॅक्टर काय ठरला?
या विधानसभा मतदारसंघात राष्टÑवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची मजबूत पकड असल्याचे मान्य केले असले तरी शिवसेना आणि भाजप येथे एकत्रपणे काम करताना दिसली. त्याचाच परिणाम म्हणून येथून १४ हजार ५५१ मतांची निर्णायक आघाडी शिवसेनेला घेता आली. या पट्ट्यात कळवा आणि मुंब्रा हा भाग येत असला तरी दिव्यावर शिवसेनेचे वर्चस्व असल्याने त्याचा फायदा शिवसेनेच्या वाढीव मतांवर झाल्याचे दिसले.या मतदारसंघात आव्हाडांनी मागील पाच वर्षांत केलेल्या कामांचा परिणाम म्हणूनच बाबाजी पाटील यांना ७७ हजाराहून अधिकची मते या मतदारसंघातून घेता आली आहेत.
>विधानसभेवर काय परिणाम
मागील विधानसभा निवडणुकीत राष्टÑवादीच्या जितेंद्र आव्हाडांना घेरण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून झाला होता. पण त्याचा फारसा परिणाम त्यांच्या मतांवर झाल्याचे दिसून आले नाही. उलट त्यांच्या मतांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले. आता वंचित आघाडीचा फॅक्टर हा इतर ठिकाणी चालल्याने विधानसभा निवडणुकीत त्याचा फायदा कसा घेता येईल यासाठी शिवसेनेचे प्रयत्न असणार आहेत. तसे झाल्यास राष्टÑवादीला हा गड राखण्यासाठी कसरत करावी लागेल.

Web Title: Challenge of coalition alliance in front of Avhad, new strategy of Shivsena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.