कसारा घाटातील अपघात म्हणे किरकोळ, रेल्वेला गांभीर्य नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 05:16 AM2019-07-20T05:16:53+5:302019-07-20T05:16:55+5:30

कसारा घाटात गुरुवारी पहाटे अंत्योदय एक्स्प्रेसचा एक डबा भीमा दोन या ब्रिटिशकालीन पुलावर घसरला.

The casualties in the Kasara Ghat say that retail, railways have no seriousness | कसारा घाटातील अपघात म्हणे किरकोळ, रेल्वेला गांभीर्य नाही

कसारा घाटातील अपघात म्हणे किरकोळ, रेल्वेला गांभीर्य नाही

Next

कसारा : कसारा घाटात गुरुवारी पहाटे अंत्योदय एक्स्प्रेसचा एक डबा भीमा दोन या ब्रिटिशकालीन पुलावर घसरला. सुदैवाने जास्त डबे रुळांवरून खाली उतरले नाहीत, अन्यथा, डबे ५०० फूट खोल दरीत कोसळून आपघात झाला असता. परंतु, या अपघाताची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाने किरकोळ अपघात असल्याचे सांगितले. प्रत्यक्षात हजारो प्रवासी मृत्यूच्या छायेत होते.
या दुर्घटनेत अपघातस्थळापासून एक किलोमीटर अंतरावरील रेल्वेमार्गाच्या खालचे स्लीपर, लोखंडी चाव्या, नटबोल्ट पूर्णपणे उखडले गेले असून काही लोखंडी खांबही वाकले आहेत. पुलावर रेल्वेमार्गाच्या फिटिंगसाठी वापरलेल्या नटबोल्टचे तुकडे झाले आहेत. दुर्घटनाग्रस्त गाडीचा डबा रुळांवर आणण्यासाठी तब्बल २०० रेल्वे कर्मचारी व डझनभर अधिकारी कार्यरत होते.
एवढे असतानाही अजूनपर्यंत मध्य रेल्वे प्रशासनाने हा अपघात गांभीर्याने घेतलेला दिसत नाही. अजूनपर्यंत एकही तज्ज्ञ अधिकारी तेथे चौकशीसाठी आलेला नाही. रेल्वेच्या स्थानिक अधिकाऱ्यांपासून उच्च अधिकारी असलेल्या रेल्वे व्यवस्थापक यांना अपघाताचे कारण घटनेला २४ तास उलटूनही समजू शकलेले नाही. परंतु, ही दुर्घटना अभियांत्रिकी चुकांमुळे झाल्याचे बोलले जात आहे.
>मदतीला उशीर
प्रवाशांच्या मदतीसाठी रेल्वे प्रशासनाअगोदर आपत्ती व्यवस्थापन टीम सदस्य व शहापूरचे तहसीलदार रवींद्र बाविस्कर घटनास्थळी दाखल झाले. अपघाताच्या ठिकाणापासून इगतपुरी १५ मिनिटांच्या अंतरावर असताना, एकही रेल्वे, महसूल, पोलीस प्रशासनाचा अधिकारी व कर्मचारी सकाळी ६ पर्यंत घटनास्थळी आला नव्हता.

Web Title: The casualties in the Kasara Ghat say that retail, railways have no seriousness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.