ठाणे : एखाद्या गुन्ह्यात जप्त केलेले वाहने आपण नेहमीच धूळखात खराब होताना पाहतो. पण, ठाणे पोलीस मीरारोड कॉल सेंटरप्रकरणी आॅक्टोबर महिन्यात जप्त केलेल्या त्या तीन क ोटीच्या आॅडी आर-८ या कारची
विशेष काळजी घेत आहेत. त्या कारला नित्य नियमाने फडका मारून शोरूममध्ये दिसावी, अशी उभी केली जातेआहे.
मीरा रोड येथील कॉल सेंटरमधून अमेरिकन नागरिकांना सुमारे ५०० कोटींचा गंडा घालण्यात आला होता. दरम्यान,शहर पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी या घोटाळ्यातील पैशांनी एखादी वस्तू खरेदी केली असेलतर ती जप्त केली जाईल, असे स्पष्ट केले होते. त्यानुसार, या घोटाळ्यातील कथित सूत्रधार सागर ऊर्फ शॅगी ठक्कर याने एका मैत्रिणीला भेट देण्यासाठी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याच्याकडून तीन कोटींची आॅडी आर-८ या कारची खरेदी केली होती. ही कार हरयाणातून पोलिसांनी हस्तगत करुन ठाण्यात आणली.
ती अजूनही कोहलीच्याच नावावर असून शॅगीने ती एका दलालाकडून खरेदी केलीहोती. खरेदी केल्यानंतर तिची कागदपत्रे त्याच्या नावावर करण्यासाठी पॅनकार्ड आणि इतर कागदपत्रे तो देण्यास टाळाटाळ करीत होता. त्यामुळे फॉर्म क्रमांक २९ हा भरला असला तरी ती अजूनही कोहलीच्याच नावावर असल्याचे पोलिसांनी सांगितले. ती ठाणे पोलीस परेड मैदानात उभी केली आहे. हे मैदान ठाणे गुन्हे अन्वेषण विभाग कार्यालयाच्या मागील बाजूस असल्याने त्यांनाही त्या कारवर लक्ष ठेवता येते.
विविध गुन्ह्यांमध्ये जप्त केलेल्या वाहनांकडे सहसा पोलीस विशेष लक्ष देत नाहीत. त्यामुळे त्या वाहनांमध्ये साहित्य तसेच गाडीचे पार्ट चोरीला जाण्याचे प्रकार सर्वश्रुत आहेत. या आॅडी आर-८ ची विशेष काळजी घेतली जात असल्याने ती अजूनही एखाद्या शोरुममधून आणल्याप्रमाणे त्याठिकाणी उभी आहे. पोलिसांनी इतर गुन्ह्यांमधील सर्वच वाहनांची अशा प्रकारे काळजी घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)