ठाणे : जमिनीचे मोजमाप करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या नावावर लाच मागणाऱ्या महसूल विभागाच्या अव्वल कारकुनाविरुद्ध नवी मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सोमवारी गुन्हा दाखल
केला.
या प्रकरणातील तक्रारदार हे मालमत्ता व्यवहाराशी संबंधित काम करतात. तक्रारदाराने चिखलोली येथील जमिनीचे मोजमाप करण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल विभागात कार्यरत असलेले अव्वल कारकून अतुल नाईक यांच्याशी २0 जून २0१६ ते १ जुलै २0१६ या कालावधीत वेळोवेळी संपर्क साधला. नाईकने या कामासाठी जिल्हाधिकाऱ्यांसह इतर अधिकाऱ्यांच्या नावाचा वापर करून लाचेची मागणी केली.
तक्रारदाराने याबाबत नवी मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. या तक्रारीची शहानिशा करून ९ जानेवारी रोजी ‘एसीबी’ने ठाणेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार अतुल नाईकविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे. पोलीस अधीक्षक संग्रामसिंह निशाणदार, अप्पर पोलीस अधीक्षक किसन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक भागवत सोनवणे, पोलीस निरीक्षक धनाजी जळक यांनी ही कारवाई केली. (प्रतिनिधी)