ठाणे : आपल्या मैत्रिणीला उलटसुलट माहिती का देतोस, याबाबतचा जाब विचारणा-या तरसेम सिंग उर्फ बॉबी (२५) याच्यावर एका त्रिकुटाने तलवारीने वार करून खून केल्याची घटना सोमवारी रात्री घडली. यातील आरोपींच्या शोधासाठी ठाणे पोलिसांनी गुन्हे अन्वेषण विभागासह तीन पथकांची निर्मिती केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हा हल्ला शिवम तिवारी, राहुल यादव आणि आकाश निशाद यांनी केल्याचे चौकशीत उघड झाले आहे. सावरकरनगर येथील ज्ञानोदय शाळेच्या समोरील रस्त्यावर तरसेम सिंग आणि त्याचा साथीदार अजय सिंग या दोघांवर तलवारीने हल्ला केला. यात तरसेम सिंगचा मृत्यू झाला तर अजय हा गंभीर जखमी झाला आहे. अजय आणि तरसेम सिंग या दोघांची एक मैत्रिण आहे. या दोघांच्याही ओळखीमुळेच शिवम आणि राहुल हेही तिला ओळखतात.

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून शिवम आणि राहुल हे अजय आणि तरसेम यांच्याविरुद्ध उलट सुलट सांगत होते. याबाबतची माहिती तिने आपल्या या मित्रांनाही दिली होती. त्यामुळेच तरसेम याने शिवमला याबाबतचा जाब विचारला. याच रागातून शिवमने तरसेम याला ६ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास ज्ञानोदय शाळेजवळ भेटण्यासाठी बोलविले. त्याचवेळी शिवम, राहुल आणि आकाश या तिघांनी तरसेम याच्यावर तलवारीने पोटावर वार केले. याशिवाय, त्यांनी हनुवटीवर, उजव्या छातीच्या खाली, पाठीवर डाव्या छातीच्या खालीही चाकूने वार केले. या हल्ल्यात तरसेमचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला. तर अजयवर एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्याची दोन तर गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटचे एक अशा तीन पथकांची निर्मिती केली आहे. या तिघांनाही फोटो, व्हॉटस्अ‍ॅप गृपच्या सहाय्याने, खब-यांच्या मदतीने तसेच तांत्रिक मदतीच्या आधारे शोध घेण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
‘‘तिवारीसह तिघांचीही ओळख पटली असून त्यांच्या शोधासाठी स्वतंत्र पथकांची निर्मिती केली आहे. आरोपींचा माग घेण्यात येत असून लवकरच त्यांना ताब्यात घेण्यात येईल.’’
सुनील लोखंडे, उपायुक्त, वागळे इस्टेट विभाग, ठाणे

 


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.