मीरा रोडमधील हॉटेलमध्ये स्फोट; 5 कर्मचारी जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2018 03:53 PM2018-10-21T15:53:21+5:302018-10-21T16:22:16+5:30

मीरारोडच्या कनकिया येथील एका हॉटेलात झालेल्या स्फोटात 5 कामगार  जखमी झाल्याची घटना घडली आहे.

Blast in Mira Road hotel 5 people injured | मीरा रोडमधील हॉटेलमध्ये स्फोट; 5 कर्मचारी जखमी 

मीरा रोडमधील हॉटेलमध्ये स्फोट; 5 कर्मचारी जखमी 

Next

मीरारोड - मीरारोडच्या कनकिया येथील एका हॉटेलात झालेल्या स्फोटात 5 कामगार  जखमी झाल्याची घटना घडली आहे. रविवारी (21 ऑक्टोबर)  सकाळी साडे अकराच्या सुमारास स्फोट झाला. गॅसच्या गळतीमुळे हा स्फोट झाल्याची शक्यता मीरारोड पोलिसांनी वर्तवली आहे. या प्रकरणाची नोंद करून तपास सुरु करण्यात आला आहे . तर अग्निशमन दलाने मात्र एसीची देखभाल नीट नसल्याने हा स्फोट झाल्याचे म्हटले आहे. 

कनकिया येथील पीव्हीआर मल्टिप्लेक्समध्ये तळाला फूड किंग नावाचे फास्टफूड हॉटेल आहे.  प्रह्लाद बेहरा (24), फताबुद्दिन (27), रंजन बेहरा (26), कबीर (26), फताबुद्दिन (23) हे पाच कामगार काम करण्यासाठी हॉटेलात आले असता अचानक स्फोट झाला. काही कळायच्या आत हॉटेलच्या काचा फुटल्या व वस्तू अस्ताव्यस्त झाल्या. पाचही कामगार भाजल्याने जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

जखमींमधील तिघांना प्राथमिक उपचार करून सोडण्यात आले आहे. तर दोघांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. स्फोटाची माहिती मिळताच जवळच असलेल्या मीरारोड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक कस्तुरे हे पोलीस कमर्चाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. पालिकेच्या कनकिया, सिल्व्हरपार्क व भाईंदर येथील अग्निशमन दलाचे जवान सुद्धा पोहचले. 

हॉटेलमध्ये सुदैवाने ग्राहक बसलेले नसल्याने तसेच आतील गॅस सिलेंडर व कॉम्प्रेसरचा स्फोट झाला नाही म्हणून मोठी दुर्घटना टळली. आतील गॅसची गळती होऊन गॅस बंद हॉटेलमध्ये कोंडला गेला होता. कर्मचाऱ्यांनी गॅसचा वापर करण्यास घेतला असता लोळ उठून गॅसच्या दाबाने स्फोट झाल्याची शक्यता कस्तुरे यांनी व्यक्त केली. या घटनेची नोंद केली असून तपास सुरु केला आहे असे ते म्हणाले. तर अग्निशमन दलाचे प्रभारी प्रकाश बोराडे यांनी सांगितले कि, हॉटेलमधील वातानुकूलित यंत्रणेची देखभाल दुरुस्ती केली गेली नसल्याने त्यातून उष्णता तयार होऊन हा स्फोट झाल्याची शक्यता आहे. या प्रकरणी हॉटेल चालकाचा निष्काळजीपणा सकृत दर्शनी दिसत असून पालिका स्तरावर योग्य ती कारवाई केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे सदर हॉटेल चालकाने बाहेरच्या सार्वजनिक मोकळ्या जागेत मंडप टाकून ते बंदिस्त केले असून तेथे सुद्धा ग्राहकांच्या बसण्याची सोय केलेली आहे . पालिकेने त्यावर कारवाई केली होती. पण शेड पुन्हा बांधण्यात आली आहे असे स्थानिकांनी सांगितले. 

 

Web Title: Blast in Mira Road hotel 5 people injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.