भाजपाचा ‘राष्ट्रवादी’ विजय! आमदार नरेंद्र मेहता यांचे वर्चस्व स्पष्ट, आयारामांची निवड ठरली अचूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 04:52 AM2017-08-22T04:52:26+5:302017-08-22T04:52:29+5:30

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खिंडार पाडत त्या पक्षातील नेमक्या आयारामांना दिलेली संधी, प्रत्येक प्रभागानुसार विजयाचे आखलेले गणित, समाजासमाजातील संपर्क आणि राजकीय समीकरणांचा अचूक अंदाज हे सारे जुळून आल्याने मीरा-भार्इंदर महापालिकेवर भाजपाला एकहाती वर्चस्व मिळवता आले.

BJP's 'Nationalist' victory! MLA Narendra Mehta's dominance is clear; | भाजपाचा ‘राष्ट्रवादी’ विजय! आमदार नरेंद्र मेहता यांचे वर्चस्व स्पष्ट, आयारामांची निवड ठरली अचूक

भाजपाचा ‘राष्ट्रवादी’ विजय! आमदार नरेंद्र मेहता यांचे वर्चस्व स्पष्ट, आयारामांची निवड ठरली अचूक

Next

मीरा रोड : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खिंडार पाडत त्या पक्षातील नेमक्या आयारामांना दिलेली संधी, प्रत्येक प्रभागानुसार विजयाचे आखलेले गणित, समाजासमाजातील संपर्क आणि राजकीय समीकरणांचा अचूक अंदाज हे सारे जुळून आल्याने मीरा-भार्इंदर महापालिकेवर भाजपाला एकहाती वर्चस्व मिळवता आले. त्यातही राष्ट्रवादी काँग्रेसमधून मिळालेली कुमक भाजपासाठी निर्णायक ठरली. त्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसने लढताना ज्या पद्धतीने उमेदवार देत मतविभागणीस पोषक वातावरण तयार केल्याने भाजपाचा विजय आणखी सुलभ झाला.
आयारामांना संधी दिल्याने भाजपात नाराजी असली, तरी एकहाती सत्ता मिळाल्याने ती पुरती धुवून निघाली असून मीरा-भार्इंदरच्या राजकारणावर आमदार नरेंद्र मेहता यांचे हुकमी वर्चस्व असल्याचे निकालातून सिद्ध झाले.
पालिकेच्या ९५ पैकी तब्बल ६१ जागा जिंकून भाजपाने मिळवलेला विजय हा आतापर्यंत मीरा- भार्इंदर महापालिकेत एका पक्षाने मिळवलेला सर्वात मोठा विजय आहे. या निवडणुकीत भाजपाने भरभरुन कमावले आणि आपले निर्विवाद वर्चस्व सिध्द केले. साहजिकच या घवघवीत यशाचे श्रेय हे भाजपाचे स्थानिक नेते, आमदार नरेंद्र मेहता यांचेच असल्याचे दिसून आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मोक्याच्या क्षणी निवडणुकीची सूत्रे हाती घेत स्वत: मैदानात उतरुन मेहतांविरोधातील नाराजी दूर करत त्यांना पाठबळ दिले आणि विजयाची समीकरणे जुळवून आणली. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावरही प्रभारी म्हणून जबाबदारी होती. सलग तीन-चार पालिका निवडणुकीतील त्यांच्या अनुभवाचाही पक्षाला उपयोग झाला.
मीरा-भार्इंदर महापालिकेत २०१२ साली मेहता यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच भाजपाचे सर्वाधिक २९ नगरसेवक निवडून आले. नंतरच्या पोटनिवडणुकीत आणखी दोन नगरसेवक वाढले. त्यानंतरही त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेतून नऊ नगरसेवक भाजपात आणले. काही माजी नगरसेवक व प्रमुख पदाधिकाºयांना प्रवेश दिला. उमेदवारी देताना मेहता पत्ता कापणार किंवा शेवटच्या क्षणी संधी मिळाली नाही, म्हणून भाजपातून सहा नगरसेवकांनी शिवसेनेचा रस्ता धरला. त्यानंतरही पक्षातील विरोधक, निवडून येण्याच्या क्षमतेचे उमेदवार, अन्य पक्षातून घेतलेले पदाधिकारी-उमेदवार यांच्या बळावर भाजापाने आखणी केली. त्यात यश मिळाले. अन्य पक्षातून भाजपात येऊन उमेदवारी मिळवत निवडणुकीत विजयी झालेल्यांनी पक्षाला यशाचा सोपान दाखवला.
भाजपाला तिकीट वाटपावरुन अंतर्गत नाराजीचा आणि बंडखोरीचा फटका बसणार अशी शक्यता वाटत होती. त्यातही तिकीट वाटपात मेहता यांनी त्यांचे पक्षांंतर्गत विरोधक, तसेच अडचणीचे ठरणारे प्रतिस्पर्धी यांचे पत्ते कापले. त्यामुले विरोधकांकडूनच नव्हे, तर स्वपक्षीयांकडूनही मेहता टार्गेट झाले. त्यांच्यावरील गंभीर स्वरुपाच्या तक्रारी, दाखल गुन्हे, पालिकेतील गैरप्रकाराचे मुद्दे जोरकसपणे उचलले गेले. मेहतांनीही त्याला तसेच प्रत्युत्तर देत शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांना लक्ष्य केले. पण एवढी राळ उडवूनही विरोधकांना निवडणुकीत त्याचा फायदा झाला नाही.
निवडणुकीच्या आधीपासूनच भाजपाने प्रचारात आघाडी घेतली. मेहतांनी स्वत: सह पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची छबीच मतदारांसमोर ठेवली. भूमिपुजन, उद्घाटन आदी कार्यक्रमांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना शहरात आणत अनेक आश्वासने दिली गेली. निवडणुकीत तर मुख्यमंत्री पूर्ण ताकतीने मैदानात उतरले. दोन जाहीर सभा घेतानाच त्यांनी निवडणुकीचा संपूर्ण आढावा घेतला. अनेकांच्या भेटीगाठी, नाराजांची समजूत आदी महत्वाची कामे मुख्यमंत्र्यांनी स्वत: केली. मेट्रो, सूर्या पाणी योजनेचे आश्वासन दिले. त्याचबरोबर ७५ दशलक्ष लीटर पाणी योजना पूर्ण झाल्याने नवीन नळजोडण्या सुरु झाल्या, शिवाय नागरिकांना पुरेसे पाणी मिळू लागल्याने त्याचा सकारात्मक फायदा भाजपाला झाला.

सेनेचा
आयात विजय
शिवसेनेला मतदारांनी नाकारले आहे. शिवसेनेच्या निवडून आलेल्या उमेदवारांपैकी निम्मे उमेदवार हे आयात केलेले आहेत. ते पाहता शिवसेनेची ताकद वाढली आहे, असे कसे म्हणणार? उलट ती मागच्यावेळेपेक्षा कमी झाली आहे.
- रवींद्र चव्हाण, राज्यमंत्री

धर्मगुरूंची मदत भाजपाने धर्माच्या नावावर थेट धर्मगुरुंना प्रचारात उतरविल्याने त्याचा फायदा त्यांना बहुमतासाठी झाला. प्रचारात धर्माचा वापर झाला आहे. पक्षप्रमुखांच्या निर्देशानुसार त्यावर निर्णय घेऊ. यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेला चांगले यश मिळाले असून मागील वेळेच्या १४ जागांमध्ये आठ जागांची वाढ झाली, याचा आम्हाला आनंद आहे.
- आ. प्रताप सरनाईक,
मीरा-भार्इंदर शिवसेना शहरसंपर्क प्रमुख

संघटनकौशल्य उजवे
मीरा-भार्इंदरमध्ये भाजपाची संघटना मजबूत आहे. त्यांची बांधणी, नियोजन आदींमध्ये मेहता उजवे ठरले. मतदार नोंदणीपासून मतदारांची जात - धर्म तसेच प्रांतनिहाय समीकरणांची गणितेही त्यांनी उमेदवारी देताना त्यांनी मांडली.
मेहतांनी गुजराती, जैन, मारवाडी मतांची बांधलेली मोटही यशाला कारणीभूत ठरली. उत्तर भारतीय समाजातील अनेक पदाधिकारी भाजपातून शिवसेनेत गेले. परंतु उत्तर भारतीय मतदारांनी मात्र भाजपालाच पसंती दिल्याचे स्पष्ट झाले.
याशिवाय जैन धर्माचे मुनी नयपद्मसागर महाराज यांनीही जाहीरपणे भाजपाला मतदान करण्याचे आवाहन करत शिवसेनेला केलेला विरोधही भाजपाच्या फायद्याचा ठरला.

यशाची चढती कमान
महापालिका निवडणुकीत भाजपा आणि आमदार नरेंद्र मेहता यांनी भरभरुन कमावले. पालिकेत एकहाती सत्ता आल्याने या परिसरावरील मेहतांचे निर्विवाद वर्चस्व सिद्ध झाले आहे. लोकसभेपासून या परिसरात पक्षाची कमान चढती राहिली आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाला या विजयाचा फायदाच होणार आहे.

Web Title: BJP's 'Nationalist' victory! MLA Narendra Mehta's dominance is clear;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.