दर कमी केल्यानेही भाजपची गोची, नालेसफाईची निविदा मिनिटात मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2019 01:35 AM2019-05-08T01:35:51+5:302019-05-08T01:36:04+5:30

पावसाळा महिनाभरावर आला असतानाही शनिवारी सत्ताधारी भाजपने स्थायी समितीत नालेसफार्ईचे कंत्राट दर जास्त असल्याचे सांगून मंजूर केले नाही.

 BJP's decision to reduce Nalcefi's tender in Minutes | दर कमी केल्यानेही भाजपची गोची, नालेसफाईची निविदा मिनिटात मंजूर

दर कमी केल्यानेही भाजपची गोची, नालेसफाईची निविदा मिनिटात मंजूर

Next

मीरा रोड  - पावसाळा महिनाभरावर आला असतानाही शनिवारी सत्ताधारी भाजपने स्थायी समितीत नालेसफार्ईचे कंत्राट दर जास्त असल्याचे सांगून मंजूर केले नाही. त्यामुळे नालेसफाई बारगळण्याची भीती निर्माण झाल्याने भाजपवर ‘शहर बुडवायला निघाल्या’चा आरोप काँग्रेसने केला. शिवसेनेने या प्रस्तावावर तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. त्यामुळे मंगळवारी स्थायी समितीत अवघ्या एका मिनिटात भाजपने निविदा मंजूर करवून घेतली. यावर्षी नालेसफाईचे दर कमी केले असा दावा करणाऱ्या भाजपला गेल्या वर्षी दर जास्त देऊन पालिकेचे लाखो रुपयांचे नुकसान का केले, असा प्रश्न काँग्रेसने केला.
महापालिकेने नालेसफाईच्या कामासाठी ४ मार्च रोजी निविदा काढली असली तरी १० मार्च रोजी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने निविदा प्रक्रिया बारगळली. मीरा-भार्इंदरसह जिल्ह्यातील अन्य महापालिकांची नालेसफाई ठप्प झाल्याने जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे विनंती केली. केंद्रीय निवडणूक आयोगाने १ मे रोजी नालेसफाईच्या निविदा मंजुरीचा मार्ग मोकळा केल्याने ४ मे रोजी स्थायी समितीची विशेष बैठक बोलावण्यात आली होती.
नालेसफाईकरिता अडीच कोटींची तरतूद आहे. या कामासाठी आलेल्या तीन निविदांपैकी कमी दराची निविदा दाखल केलेल्या ठेकेदारास वाटाघाटीसाठी बोलावून त्याची निविदा मंजूर करण्याता प्रस्ताव आयुक्त बालाजी खतगावकर यांनी दिला होता. भाजप नगरसेवक धु्रवकिशोर पाटील यांनी प्रस्तावास विरोध करीत ठेकेदाराने दिलेले दर जास्त असल्याचे सांगितले. उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे यांनी दर जास्त नसून गेल्या वर्षी होते तेवढेच दर असल्याचे स्पष्ट केले.
भाजपला निविदा मंजूर करायची नसल्याचे पाहून काँग्रेसचे गटनेते जुबेर इनामदार यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली. जानेवारी महिन्यातच महासभेत विषय का मांडला नाही, असा सवाल इनामदार यांनी केला. नालेसफाई लागलीच सुरु झाली नाही तर शहर बुडेल आणि त्याला सत्ताधारी जबाबदार असतील, असा इशारा इनामदार यांनी दिला. त्यामुळे भाजप नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा सोडून आयुक्तांनी पुन्हा ठेकेदाराशी वाटाघाटी करुन आणखी दर कमी करावे, अशी सूचना केली. मंगळवारी पुन्हा स्थायी समितीत विषय आणण्याची सूचना केली. या सर्व खडाजंगीत शिवसेनेचे नगरसेवक तटस्थ राहिले.
आयुक्तांंनी ठेकेदाराशी चर्चा करुन दर कमी करुन घेतल्याने मंगळवारच्या सभेत आयुक्तांनी सुधारित दराचा प्रस्ताव दिला. एका मिनिटात तो मंजूर केला गेला. गेल्या वर्षी ध्रुवकिशोर हेच सभापती असताना त्यांनी यंदापेक्षा जास्त दराने नालेसफाईची निविदा कोणाच्या हितासाठी मंजूर केली होती, असा सवाल काँग्रेसने केला.

प्रशासनाला आम्ही पुन्हा वाटाघाटी करायला लावून दर आणखी कमी करुन घेतले आहेत. यातून पालिकेचे लाखो रुपये वाचणार आहेत. पण विरोधकांना जनतेच्या पैशांची काळजी नसून ठेकेदाराला महागड्या दराचा ठेका देण्याचा आग्रह धरत आहेत. नालेसफाई वेळेत सुरु होऊन पूर्ण होईल.
- ध्रुवकिशोर पाटील,
नगरसेवक, भाजप

टक्केवारीसाठी भाजपने नालेसफाईच्या कामाची निविदा मंजूर केली नाही. पण शहर बुडाले तर भाजपला विधानसभा निवडणुकीत मोठी अडचण झाली असती. म्हणून आज त्वरित निविदेला मंजुरी दिली. यावर्षी जर गेल्या वर्षीपेक्षा दर कमी झाले आहेत तर गेल्या वर्षी भाजपने काही लाख रुपये जास्त कोणासाठी दिले ? कोणते हित साधले, हे कळले पाहिजे.
- जुबेर इनामदार, गटनेता, काँग्रेस

Web Title:  BJP's decision to reduce Nalcefi's tender in Minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.