BJP's big power show in Mira-Bharindar in January | मीरा-भार्इंदरमध्ये जानेवारीत भाजपाचे मोठे शक्तिप्रदर्शन

मीरा रोड : मीरा-भाईंदर महापालिकेत शिवसेना आणि भाजपामध्ये सातत्याने संघर्ष सुरू आहे. एकमेकांना कोंडीत पकडण्यासाठी दोन्ही पक्ष संधी शोधत असतात. त्यातच विरोधी पक्षनेतेपद सेनेला जाहीर न केल्याने भाजपाने अडचणीत आणले आहे. पालिकेत कामे होत नाहीत म्हणून मध्यंतरी सेनेच्या नगरसेवकांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना साकडे घातले. अधिवेशनानंतर मी पालिकेत येईन असे शिंदे यांनी आश्वासन दिले आहे. त्यामुळे भविष्यात दोन्ही पक्षातील वाद अधिक वाढेल अशी चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर होणाºया विकासकामांच्या भूमिपूजनाच्यावेळी भाजपा शक्तिप्रदर्शन करणार असे बोलले जात आहे.
मीरा- भार्इंदर हद्दीतून जाणाºया महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वरसावे येथे खाडी पूल, एक अंडरपास पूल, एक पादचारी पूल, घोडबंदर खिंडीचे रूंदीकरण अशा विविध विकासकामांचे भूमिपूजन ११ जानेवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती आमदार नरेंद्र मेहता यांनी महापौर डिंपल मेहता यांनी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत दिली. या शिवाय भार्इंदर पश्चिम रेल्वे स्थानक परिसराचे सुशोभीकरण व ९२ कोटीच्या नाल्याच्या भूमिपूजनही केले जाणार आहे.
वसई खाडीवरील वरसावे जुना पूल कमकुवत झाल्याने सध्या या ठिकाणाहून धीम्या गतीने वाहतूक सुरु आहे. मध्यंतरी दुरुस्तीसाठी हा पूल बंद असल्याने अनेक महिने वाहतुकीची मोठी कोंडी होत होती. या ठिकाणी आणखी ५ पदरी नवीन पूल बांधण्याची प्रक्रिया आधीपासूनच सुरू झाली होती. त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली आहे.
महापौर डिंपल मेहता यांनी मंगळवारी महापौर दालनात पत्रकार परिषद बोलावली होती. त्यावेळी उपमहापौर चंद्रकांत वैती, स्थायी समिती सभापती ध्रुवकिशोर पाटील, नगरसेवक सुरेश खंडेलवाल, भाजपा जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे आदी उपस्थित होते. महापौरांच्या वतीने बोलताना आ. मेहता म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गडकरी यांच्या हस्ते ११ जानेवारीला दुपारी १२ वाजता श्रीकांत जिचकार चौक येथील मैदानात हा डिजीटल भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार आहे.
वरसावे खाडीवरील नवीन ५ पदरी पुलाच्या कामाचे भूमिपूजन, दिल्ली दरबार हॉटेल ते फाऊंटन हॉटेल पर्यंतच्या सध्याच्या ४ पदरी मार्गाचे रूंदीकरण करून ६ पदरी मार्गाचे भूमिपूजन, महामार्गावरील दारास ढाबा ते लक्ष्मीबाग पादचारी पुलाचे भूमिपूजन, काशिमीरा उड्डाणपुलाखालील जागेचे सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन तसेच ठाकूर चित्रपटगृह ते सम्राट हॉटेलपर्यंत अंडपरपास पुलाच्या कामाचे भूमिपूजन होणार आहे.
अंडरपासच्या ठिकाणी आधी खासदार राजन विचारे यांच्या निधीतून पादाचारी पूल बांधण्याचे प्रस्तावित होते. पण ते काम आम्ही रद्द करायला लावून त्या ठिकाणी अंडरपास मंजूर केल्याने अधिक सोयीचे ठरणार असे मेहता म्हणाले. या शिवाय आमदार निधीतून २ कोटी खर्चून भार्इंदर पश्चिम रेल्वे स्थानक परिसराचे सुशोभीकरण तसेच अमृत योजनेतून मंजूर ९२ कोटी रुपयांच्या नाले बांधकामांचे भूमिपूजनही करणार आहेत.
>पुलामुळे फायदा
या कामांमुळे महामार्गावरील वरसावे पूल व अन्य ठिकाणीची वाहतुकीची कोंडी दूर होऊन एक सिग्नल देखील कमी होणार आहे. पादचारी पुलामुळे लक्ष्मी बाग भागातील रहिवाशांना रस्ता ओलांडणे सोयीचे ठरेल. घोडबंदर खिंडीतील रूंदीकरणामुळे होणारी वाहतूक कोंडी दूर होईल असे ते म्हणाले.