तीन बारवर भिवंडी पोलिसांचे छापे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 12:35 AM2019-06-14T00:35:23+5:302019-06-14T00:35:25+5:30

२४ बारबाला सापडल्या : १७ बार कर्मचारी अटकेत, चालक-मालकांचा शोध सुरू

Bhiwandi police raids on three bars | तीन बारवर भिवंडी पोलिसांचे छापे

तीन बारवर भिवंडी पोलिसांचे छापे

Next

मीरा रोड : काशिमीरा व मीरारोड पोलीस ठाण्यात बेधडकपणे आॅर्केस्ट्रा बारच्या आड चालणाऱ्या अश्लिल नृत्य, बारबालांची रेलचेल भिवंडी ग्रामीण आणि पडघा पोलिसांनी छापे टाकून उघड केली. तीन बारवरील कारवाईत २४ बारबाला सापडल्या आहेत. याशिवाय १७ बार कर्मचाऱ्यांना अटक करुन ६ चालक-मालकांचा शोध सुरू आहे. ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजीराव राठोड यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली असून यामुळे काशिमीरा, मीरारोड पोलीस ठाण्यांसह अनैतिक मानवी वाहतूक शाखेचे पोलीस करतात काय, असा सवाल केला जाऊ लागला आहे.

मीरा भार्इंदरमधील काशिमीरा, मीरारोड, नवघर व नयानगर पोलीस ठाणे हद्दीत मोठ्या संख्येने आॅर्केस्ट्रा बार असून बहुतांश बारलगतच लॉज आहेत. आॅर्केस्ट्रा बारच्या आड सर्रास अश्लील नृत्य व वेश्याव्यवसाय चालवला जात असल्याचे सर्वश्रुत असून लॉजमधूनदेखील वेश्या व्यवसाय चालवला जातोय. कायद्याने बंदी असताना राजरोस चालणाºया या अनैतिक प्रकारांबद्दल मोठ्या प्रमाणात तक्रारी असूनदेखील पोलिसांकडून ठोस कारवाईच होत नाही. दुसरीकडे बार-लॉजची बेकायदा बांधकामे पालिका तोडत नाही. गुन्हे दाखल असूनही जिल्हा प्रशासन व उत्पादन शुल्क विभाग सर्रास परवाने देत सुटले आहेत. त्यामुळे मीरा भार्इंदर म्हणजे आॅर्केस्ट्रा बार व लॉजचे, तसेच अनैतिक व्यवसायाचे शहर म्हणून ओळखले जातेय.

शहरातील बारमधून मोठ्या संख्येने बारबाला अश्लील नाचगाणे व चाळे करत असल्याच्या तक्रारी ठाणे ग्रामीण पोलीस अधिक्षक डॉ. शिवाजीराव राठोड यांच्यासह वरिष्ठांपर्यंत होत होत्या; परंतु स्थानिक पोलिसांकडून सोयीस्कर डोेळेझाक केली जात असल्याने ठोस आणि सातत्याने कारवाई केली जात नसल्याचे लक्षात आल्यावर राठोड यांनी पडघा व भिवंडी पोलिसांना मीरा भार्इंदरमधील बारवर धाडी टाकण्याचे आदेश दिले. त्या अनुषंगाने बुधवारी रात्री भिवंडी ग्रामीण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक राहुल अतिग्रेसह श्रीपत मोरे, आनंदा पाटील, ईश्वर पाटील या पोलीस कर्मचाºयांनी काशिमीरा पोलिसांना सोबत घेऊन महामार्गावरील पांडुरंग वाडी येथे असलेल्या नाईटसिटी आणि बॉसी या आॅर्केस्ट्रा बारवर धाडी टाकल्या. नाईट सिटीमध्ये नऊ बारबाला सापडल्या. व्यवस्थापक रघू शेट्टीसह दोघा वेटरना अटक करण्यात आली. येथे ३६०० रुपयांची रोख जप्त करण्यात आली. बॉसी बारमधून ६ बारबाला सापडल्या. येथूनदेखील व्यवस्थापकासह दोन वेटरना अटक केली. ६ हजार रुपये रोखही जप्त केली. या दोन्ही बारमध्ये बारबाला अर्धवट कपडे घालून अश्लील चाळे करत होत्या.

अश्लील नृत्य करत होत्या
मीरारोडच्या शीतलनगरमधील बिंदिया आॅर्केस्ट्रा बारवर पडघा पोलीस ठाण्याचे विलास निमसे, सुभाष पादिर, मोहन भोईर, प्रवीण चव्हाण या पोलिसांनी उपनिरीक्षक शिरीष चौधरी यांच्यासह धाड टाकली.

बारमध्ये तब्बल नऊ बारबाला सापडल्या. त्या अश्लील नृत्य करत होत्या. १४ ग्राहकांचीदेखील पोलिसांनी नोंद घेतली. व्यवस्थापक प्रदीप शेट्टी व १० वेटरना अटक करण्यात आली असून, पाच हजार रुपये रोख जप्त करण्यात आले.

अश्लील नृत्यावर प्रतिबंध घालणे तसेच महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण करणे अधिनियम २०१६ नुसार मीरारोड पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या तिन्ही बारच्या चालक व मालकांनादेखील आरोपी करण्यात आले आहे.

Web Title: Bhiwandi police raids on three bars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.