भिवंडी लोकसभा निवडणूक निकाल २०१९ : पहिल्या फेरीपासूनच कपिल पाटील यांनी घेतली होती आघाडी...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2019 12:55 AM2019-05-24T00:55:54+5:302019-05-24T00:57:48+5:30

भिवंडी लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा लोकसभेची निवडणूक लढवणारे भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांनी मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून आघाडी घेतली होती.

Bhiwandi Lok Sabha election result 2019: Kapil Patil took lead from the first round ... | भिवंडी लोकसभा निवडणूक निकाल २०१९ : पहिल्या फेरीपासूनच कपिल पाटील यांनी घेतली होती आघाडी...

भिवंडी लोकसभा निवडणूक निकाल २०१९ : पहिल्या फेरीपासूनच कपिल पाटील यांनी घेतली होती आघाडी...

Next

भिवंडी - भिवंडी लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा लोकसभेची निवडणूक लढवणारे भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांनी मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून आघाडी घेतली होती. नवव्या फेरीच्या मोजणीत पाटील व त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या मतांमध्ये ३८ हजार मतांचा फरक पडला. त्यामुळे टावरे यांचा पराभव होणार, हे स्पष्ट होत गेले. नवव्या फेरीनंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्रापासून काढता पाय घेतला.

पहिल्या फेरीनंतर...
मुंबई-नाशिक मार्गावरील भिवंडी बायपासजवळ असलेल्या सोनाळे गावातील एका इंग्रजी शाळेत भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीस ९ च्या सुमारास सुरुवात झाली. पहिल्या फेरीची सुरुवात पोस्टल मतांच्या मोजणीने झाली. त्यामुळे पहिल्या फेरीची मते जाहीर करण्यास साडेदहा वाजले. त्यामुळे प्रसारमाध्यमांना अपडेट मिळत नव्हते. पहिल्या फेरीत पाटील यांना २१ हजार ९९६ मते पडली, तर आघाडीचे उमेदवार टावरे यांना ११ हजार २२५ मते पडली. दोघांच्या मतांमध्ये १० हजार मतांचा फरक होता.

दुस-या फेरीनंतर...
दुसरी फेरी जाहीर होण्यास साडेअकरा वाजले. दुसºया फेरीत पाटील यांना २५ हजार ५०६ मते पडली. तर, टावरे यांना १९ हजार १५६ मते पडली. त्यामुळे पाटील व टावरे यांच्या मतांमध्ये सहा हजार मतांचा फरक होता. पाटील हे दुसºया फेरीतही आघाडीवर होते.

पाचव्या फेरीनंतर...
पाचव्या फेरीत पाचही फेऱ्यांची एकूण मते मिळून पाटील यांना ९३ हजार ७६८ मते मिळाली. तर, टावरे यांना ७६ हजार ४०३ मते मिळाली. पाचव्या फेरीच्यावेळी दोघांच्या मतांमध्ये १७ हजारांचा फरक होता. हा फरक प्रत्येक फेरीनंतर वाढत जात असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे पाचव्या फेरीपर्यंत चांगली टक्कर देणारे टावरे मागे पडत असल्याचे चित्र निर्माण झाले.

दहाव्या फेरीनंतर...
आठव्या फेरीच्यावेळी पाटील व टावरे यांच्यातील मतांचा फरक हा ३८ हजारांच्या घरात पोहोचला. पाटील यांनी सुरुवातीपासून घेतलेली आघाडी पाहता मतांमधील फरक टावरे पुढे भेदू शकणार नाहीत. त्यामुळे टावरे समर्थकांनी मतमोजणीच्या ठिकाणाहून काढता पाय घेतला.

पाटील विजयी होणार, ही काळ्या दगडावरची रेघ
मतमोजणीच्या ठिकाणी कल्याण पश्चिमेचे भाजप आमदार नरेंद्र पवार यांनी फेरी मारून पाटील यांच्या मतांची आघाडी किती आहे, याची विचारणा केली. पाटील हे विजयी होणार, ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असे पवार यांनी वक्तव्य करून विजयाचा गुलाल उधळण्याच्या तयारीला लागा, असे आदेश कार्यकर्त्यांना दिले. बदलापूरचे भाजपचे पदाधिकारी संभाजी शिंदे व अण्णा कुलकर्णी यांनीही बदलापूर शहरातून पाटील यांना किती मताधिक्य मिळणार, याची गोळाबेरीज करण्यास सुरुवात केली. दुपारपर्यंतच्या मतमोजणीपर्यंत १५ हजारांचे मताधिक्य बदलापुरात मिळाल्याचा दावा भाजप कार्यकर्ते त्याठिकाणी करत होते.

उन्हाचा फटका जल्लोषाला...
उन्हाचा पारा जास्त असल्याने त्याचा फटका जल्लोषाला झाला. कार्यकर्त्यांसाठी उभारण्यात आलेला मंडप भरउन्हात होता. त्यामुळे त्याठिकाणी कार्यकर्ते भाजून निघाले. उन्हामुळे कार्यकर्त्यांची संख्या फारशी मतमोजणी केंद्राजवळ नव्हती. जवळपास ५०० कार्यकर्ते मंडपात निकालाच्या फेरीनुसार मतांचे आकडे घेत बसले. दुपारनंतर कार्यकर्त्यांसह बंदोबस्ताला असलेल्यांनाही मरगळ आली. त्यामुळे काही पोलीस व कार्यकर्ते आहे, तेथे पथारीवर पहुडले. दुपारच्या उन्हाची लाही कमी करण्यासाठी अनेकांनी थंडगार पाण्याच्या बाटल्या, काकडी, कुल्फीचा आस्वाद घेतला. काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याने सांगितले की, टीव्हीवर सगळा निकाल दिसत असल्याने कार्यकर्ते याठिकाणी उन्हामुळे आले नाहीत. कार्यकर्त्यांसाठी जेवण, नाश्ता, पाण्याची सोय नव्हती. पोलिसांकरिता निवडणूक यंत्रणेकडून जेवण व पाणी पुरवले गेले.

दरम्यान, अनेक राजकीय तज्ज्ञांनी येथील निकालाबाबत तर्कवितर्क लढवले होते. मात्र पाटील यांच्या विजयाने ते खोटे ठरवले. कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहचला होता.

कपिल पाटील जेव्हा कार्यकर्त्यांच्या मंडपाजवळ आले तेव्हा भाजप, श्रमजीवीच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला. झेंडे घेऊन बेभान नाचत होते. कार्यकर्ते पाटील यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी धडपडत होते. पाटील यांच्या समर्थकांच्या गाड्यांमुळे मुंबई-नाशिक महामार्गावर वाहतूककोंडी झाली होती.

Web Title: Bhiwandi Lok Sabha election result 2019: Kapil Patil took lead from the first round ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.