भार्इंदर रेल्वे स्थानक परिसराचे सुशोभीकरण होणार; आ. मेहतांसह पालिका अधिकाऱ्यांनी केली पाहणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2017 08:06 PM2017-11-16T20:06:16+5:302017-11-16T20:06:30+5:30

भार्इंदर रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील उत्तर दिशेच्या परिसराचे सुशोभीकरण भव्य प्रवेशद्वाराच्या माध्यमातून लवकरच करण्यात येणार आहे.

 Beautification of Bhairinder railway station; Come on. Mehta with municipal officials inspected | भार्इंदर रेल्वे स्थानक परिसराचे सुशोभीकरण होणार; आ. मेहतांसह पालिका अधिकाऱ्यांनी केली पाहणी

भार्इंदर रेल्वे स्थानक परिसराचे सुशोभीकरण होणार; आ. मेहतांसह पालिका अधिकाऱ्यांनी केली पाहणी

Next

राजू काळे
भार्इंदर - भार्इंदर रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील उत्तर दिशेच्या परिसराचे सुशोभीकरण भव्य प्रवेशद्वाराच्या माध्यमातून लवकरच करण्यात येणार आहे. तत्पूर्वी भाजपा आ. नरेंद्र मेहता यांच्यासह पालिकेच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुरुवारी त्या परिसराची पाहणी केली.

या नियोजित सुशोभिकरणासाठी आ. मेहता यांच्या प्रयत्नाने राज्य सरकारकडून २ कोटींचा विशेष निधी पालिकेला प्राप्त झाला आहे. या निधीतून भार्इंदर रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील उत्तर दिशेला भव्य एकमजली प्रवेशद्वार बांधण्यात येणार आहे. या प्रवेशद्वाराची लांबी २२० फूट तर रुंदी ३० फूट इतकी प्रस्तावित करण्यात आली आहे. त्याचे अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचना मेहता यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

या नियोजित प्रवेशद्वारामुळे रेल्वे परिसराचा लूक बदलणार असला तरी तेथील रिक्षास्टॅन्ड, बस थांबे, त्यांच्यासह खासगी वाहतुकीची रेलचेल, लगतच्या मासळी बाजार व लोकवस्तीतील रहिवाशांच्या वर्दळीमुळे होणारी वाहतुक कोंडी त्यामुळे सुटणार का, असा प्रश्न रेल्वे प्रवाशांकडुन उपस्थित होऊ लागला आहे. यात प्रामुख्याने म्हणजे नियोजित प्रवेशद्वाराची जागा रेल्वेच्या मालकीची असुन रेल्वे प्रशासन त्याच्या बांधकामाला सहज परवानगी देईल का, असाही प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. यापूर्वीच रेल्वे मार्गाखालून बांधलेल्या भुयारी मार्गाच्या परवानगीपोटी रेल्वे प्रशासनाने पालिकेकडून कोट्यवधींचे शुल्क वसूल केले आहे. त्यामुळे या नियोजित प्रवेशद्वाराच्या परवानगीसाठी देखील रेल्वेकडून विविध शुल्काची मागणी केली जाऊ शकते, असा कयास प्रशासनाकडून लावला जात आहे. त्यामुळे हे प्रवेशद्वार अत्यावश्यक नसल्याचा सूर नागरिकांकडून आळवला जात आहे.

एका बाजूला शहरातील अनेक विकासकामे प्रलंबित तसेच सरकारी लालफितीत अडकली असताना केवळ रेल्वे परिसराचे सुशोभीकरण करण्याचा सपाटा लावण्यात आर्थिक नुकसान करण्यासारखे असल्याचा दावा केला जात आहे. यापूर्वी २० आॅक्टोबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मीरा रोड रेल्वे स्थानक परिसराच्या सुशोभीकरणाचे भूमिपूजन करण्यात आले. यानंतर भार्इंदर रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरणाचे डोहाळे सत्ताधा-यांना लागल्याचे दिसून येत असल्याचा आरोप केला जात आहे. परंतु या स्थानक परिसरातील बेकायदेशीर फेरीवाले, वाहतूक कोंडी, अरुंद रस्ते व पर्यायी रस्त्यांचा अभाव आदी समस्या जैसे थे असताना केवळ परिसराचे सुशोभीकरण करून शहराचा विकास काय कामाचा? असा दावा केला जात असला तरी शहरातील सौंदर्यात मात्र नियोजित सुशोभीकरणामुळे भर पडणार असल्याचा दावा भाजपाकडून केला जात आहे.

Web Title:  Beautification of Bhairinder railway station; Come on. Mehta with municipal officials inspected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.