Basewadi dumping: Breath of fire from the fire | आधारवाडी डम्पिंग : आगीच्या धुराने कोंडला श्वास
आधारवाडी डम्पिंग : आगीच्या धुराने कोंडला श्वास

कल्याण  - उन्हाळ्याला प्रारंभ होताच येथील आधारवाडी डम्पिंगला आग लागण्यास सुरुवात झाली आहे. दुर्गाडी खाडीलगतच्या डम्पिंगच्या मागील वाडेघर परिसराच्या बाजूस मंगळवारी रात्री ९.३० च्या सुमारास आग लागली. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात धुराचे लोट पसरले होते. अग्निशमन दलाचे बंब आणि पाण्याचे टँकर, अशा ५० ते ६० गाड्यांमधील पाण्याने बुधवारी दुपारी १२ पर्यंत म्हणजे १४ तासांनी ही आग आटोक्यात आणण्यात आली.
पश्चिमेतील आधारवाडी डम्पिंगची क्षमता संपल्यानंतरही तेथे कचरा टाकणे सुरूच आहे. त्यामुळे डम्पिंगच्या दुर्गंधीने परिसरातील रहिवासी हैराण झाले आहेत. त्यातच, उन्हाळ्यात कचरा पेटण्याचे सत्र सुरूच असल्याचे पुन्हा मंगळवारी समोर आले.
२०१६-१७ मध्येही मोठ्या प्रमाणावर डम्पिंगला आगी लागल्या होत्या. परंतु, प्रशासनाने आजतागायत यासंदर्भात ठोस उपाययोजना न केल्याने २०१८ च्या उन्हाळ्यातही हे सत्र कायम राहण्याची चिन्हे आहेत. उन्हात कचरा तापतो. त्यात कचºयामुळे निर्माण होणारा मिथेन वायू पेट घेतो. यामुळे आगीच्या घटना घडतात. आग लागताच मोठ्या प्रमाणावर वाहणाºया वाºयामुळे आगीचा धूर वाºयाच्या प्रवाहाबरोबरच सभोवतालच्या परिसरात पसरतो. आगीचे प्रमाण अधिक असेल, तर धुराचे लोट आधारवाडी परिसराबरोबरच वाडेघर, खडकपाडा, लालचौकी, शिवाजी चौक, गौरीपाडा, पौर्णिमा चौकीपर्यंत पसरत जातात. त्यामुळे तेथील रहिवाशांना श्वास गुदमरणे, खोकला येणे, मळमळणे आदी त्रासाला सामोरे जावे लागते.
आगीच्या घटना रोखण्यासाठी उपाय म्हणून डम्पिंगमध्ये पाण्याच्या पाइपलाइन टाक ण्याबाबतची निविदा प्रक्रियाही पार पडली होती. परंतु, एका वरिष्ठ अधिकाºयाच्या हितसंबंधांमुळे ती प्रक्रिया पुढे सरकू शकलेली नाही, अशी सूत्रांची माहिती आहे.
दरम्यान, मंगळवारी आगीची माहिती मिळताच समोरच केंद्र असलेल्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. परंतु, खाडीकिनारी सुटलेल्या वाºयामुळे ही आग पसरत गेली. आगीने रौद्र रूप धारण करताच आधारवाडी, कोळसेवाडी ‘ड’ प्रभागातील अग्निशमन दलाच्या गाड्यांना पाचारण करण्यात आले. बुधवारी सकाळी ७ च्या सुमारास आगीवर काही प्रमाणात नियंत्रण मिळवणे शक्य झाले. परंतु, आग डम्पिंगच्या आतमध्ये खोलवर गेल्याने ती आतल्या आत धुमसत होती. त्यातून धुराचे लोट बाहेर पडणे सुरूच होते. अखेर, दुपारी १२ च्या सुमारास या आगीवर संपूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश आले, अशी माहिती आधारवाडी केंद्राचे उपस्थानक अधिकारी नामदेव चौधरी यांनी दिली.

महापौर, तत्कालीन आयुक्तांनी केली होती पाहणी

महापौर राजेंद्र देवळेकर आणि तत्कालीन आयुक्त ई. रवींद्रन यांनी संयुक्त दौरा करून डम्पिंगची पाहणी केली होती. यावेळी त्यांनी परिसरातील रहिवासी आणि साठेनगरमधील नागरिकांशी संवाद साधला होता.

डम्पिंग पूर्णपणे बंद होण्यासाठी लागणारा दीड वर्षाचा कालावधी पाहता बायोगॅसद्वारे कचºयाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करणार असल्याचा दावा देवळेकर यांनी त्या वेळी केला होता. परंतु, आजतागायत याची कार्यवाही झालेली नाही.

आगीच्या यापूर्वीच्या घटना

२०१० मध्ये डम्पिंगला मोठी आग लागली होती. त्यानंतर, २०१६ मध्ये २, ११, ३१ जानेवारी, २१ मार्च आणि २८ मार्चला डम्पिंगला आगी लागल्या होत्या.
२०१७ मध्येही ६ मार्च आणि १३ एप्रिललादेखील डम्पिंगला आग लागली होती. १३ एप्रिलची आगही १० तास धुमसत होती.
३१ मे २०१६ ला लागलेली आग सलग तीन दिवस धुमसत होती. वाढती आग आणि धूर पाहता डम्पिंगला लागून असलेल्या साठेनगर वसाहतीतील रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले होते.
या वेळी तीन कचरावेचकही किरकोळ जखमी झाले होते. या वाढत्या घटना पाहता डम्पिंगवर मातीचा भराव टाकून आगीच्या घटनांवर नियंत्रण आणण्याचा निर्णय घेतला होता. आग तीन दिवस धुमसल्याने ही आग कोणीतरी लावल्याची तक्रारही खडकपाडा पोलीस ठाण्यात केली होती.


Web Title:  Basewadi dumping: Breath of fire from the fire
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.