हटवलेला रिक्षाथांबा मूळ जागी, संतप्त नागरिकांचे ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 06:14 AM2018-05-10T06:14:22+5:302018-05-10T06:14:22+5:30

बदलापूर पूर्वेतील बेकायदा रिक्षाथांब्याला मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास हटवल्यानंतर तासाभरातच मुजोर रिक्षाचालकांनी थांब्याचा ताबा घेतला.

badlapur News | हटवलेला रिक्षाथांबा मूळ जागी, संतप्त नागरिकांचे ठिय्या आंदोलन

हटवलेला रिक्षाथांबा मूळ जागी, संतप्त नागरिकांचे ठिय्या आंदोलन

googlenewsNext

बदलापूर - बदलापूर पूर्वेतील बेकायदा रिक्षाथांब्याला मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास हटवल्यानंतर तासाभरातच मुजोर रिक्षाचालकांनी थांब्याचा ताबा घेतला. त्यामुळे संतापलेल्या रेल्वेस्थानक परिसरातील नागरिक आणि व्यापाऱ्यांनी ठिय्या आंदोलन करत पोलीस, वाहतूक पोलीस आणि रिक्षाचालकांचा निषेध केला. अखेर रिक्षाचालकांनी बंद पुकारत थांबा रिकामा केला. मात्र स्थानक परिसरात तीन ते चार तास तणावाचे वातावरण होते.
बदलापूर पूर्वेतील अंबिका हॉटेल आणि संजीवनी सभागृहापर्यंतच्या बेकायदा रिक्षाथांब्याच्या विरूद्ध स्थानक परिसरातील नागरिकांनी आंदोलनाचे हत्यार उपसल्यानंतर वाहतूक पोलीस, रिक्षा संघटना सावध झाल्या होत्या. वाहतूक पोलीस निरीक्षक दीपक गुजर यांनी ठोस निर्णय घेत रिक्षा संघटनांशी चर्चा केली होती. पंधरा दिवसांच्या चर्चेनंतर अखेर मंगळवारी उशिरा स्थानक परिसरातील हा बेकायदा थांबा हटवण्यावर शिक्कामोर्तब झाले. त्यानुसार बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास नगरसेवक संजय भोईर, राजन घोरपडे ाणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीपकुमार राजभोज यांच्या उपस्थितीत रिक्षाथांबा हटवण्यात आला. मात्र काही मोजक्या मुजोर रिक्षाचालकांनी या निर्णयाविरूद्ध रिक्षा बंद करण्याचा प्रयत्न केला. तसेच अवघ्या एका तासातच पूर्वीच्याच ठिकाणी रिक्षा लावण्यास सुरूवात केली. त्यामुळे संतापलेल्या स्थानक परिसरातील नागरिक आणि व्यापाºयांनी रेल्वे स्थानकाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यामुळे सकाळी समन्वयाची भूमिका बजावणाºया पोलिसांची एकच धावपळ सुरू झाली. नगराध्यक्षा विजया राऊत, सहायक पोलीस आयुक्त बाबाजी आव्हाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीपकुमार राजभोज यांनी नगरसेवक भोईर यांना सोबत घेऊन चर्चेला सुरूवात केली. मात्र सकाळी झालेला निर्णय पुन्हा कसा बदलू शकतो, असा ठाम पवित्रा घेत भोईर आणि रहिवाशांनी ठिय्या कायम ठेवला. तसेच पोलिसांनी मध्यस्थी करत रिक्षाथांबा हटवल्यानंतर पुन्हा तो तासाभरात कसा येऊ शकतो, असा संताप नागरिकांनी यावेळी व्यक्त केला. परिस्थिती तणावपूर्ण झाल्याने स्थानक परिसरात राज्य राखीव दलाची एक तुकडी तैनात करण्यात आली.

प्रवाशांना रिक्षातून उतरवले

- दरम्यान, याचकाळात शहरात व्यवसाय करणाºया रिक्षाचालकांना काही मुजोर रिक्षाचालक वाहतूक बंद करण्यासाठी धाक दाखवत होते. त्यामुळे तीनच्या सुमारास शहराच्या पूर्व भागात रिक्षा बंद करण्यात आल्या होत्या. त्याचवेळी रिक्षा थांबा हटवण्याच्या आश्वासनानंतर अखेर नागरिकांनी आपले ठिय्या आंदोलन मागे घेतले.
- मात्र रिक्षाथांबा पुन्हा आल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असाही इशारा आंदोलकांनी यावेळी दिला. दरम्यान, या काळात प्रवासी घेऊन जाणाºया रिक्षाचालकांना अडवून प्रवासी उतरवून देण्याचे प्रकार समोर आले.
- यामुळे नागरिक संतापले होते. वाहतूक कोंडी आणि मुजोर रिक्षाचालकांचा प्रश्न गंभीर होत असताना तसेच आंदोलन चिघळत असताना तिथे हजर असलेल्या सहायक आयुक्तांनी यावर ठोस निर्णय घेण्यास असमर्थता दर्शवली. या विषयावर बोलणे टाळले.

Web Title: badlapur News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.