बदलापूर-कर्जत महामार्गावर अडथळ्यांची शर्यत, एमएमआरडीएचे ढिसाळ नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 06:13 AM2017-09-11T06:13:25+5:302017-09-11T06:14:18+5:30

मोठा गाजावाजा करून एमएमआरडीएने काटई नाका ते कर्जत हा राज्य महामार्ग बांधला. या रस्त्याच्या देखभाल, दुरुस्तीची जबाबदारीही संबंधित कंत्राटदाराकडे देण्यात आली होती. मात्र, या कंत्राटदाराची मुदत संपताच या रस्त्याची वाताहत झाली, अक्षरश: चाळण झाली आहे.

 Badlapur-Karjat highway hamper, MMRDA's poor planning | बदलापूर-कर्जत महामार्गावर अडथळ्यांची शर्यत, एमएमआरडीएचे ढिसाळ नियोजन

बदलापूर-कर्जत महामार्गावर अडथळ्यांची शर्यत, एमएमआरडीएचे ढिसाळ नियोजन

Next

- पंकज पाटील, बदलापूर
  मोठा गाजावाजा करून एमएमआरडीएने काटई नाका ते कर्जत हा राज्य महामार्ग बांधला. या रस्त्याच्या देखभाल, दुरुस्तीची जबाबदारीही संबंधित कंत्राटदाराकडे देण्यात आली होती. मात्र, या कंत्राटदाराची मुदत संपताच या रस्त्याची वाताहत झाली, अक्षरश: चाळण झाली आहे. अनेक ठिकाणी रस्ता शोधण्याची वेळ वाहनचालकांवर आली आहे. हा राज्य महामार्ग आहे की अडथळ्यांची शर्यत, असा सवाल आता नागरिक आणि वाहनचालकांकडून उपस्थित केला जात आहे. जर राज्य महामार्गाची ही परिस्थिती असेल, तर अन्य रस्ते, गल्लीबोळांबद्दल न बोललेले बरे, असे म्हणण्याची वेळ आली आहे. त्यामुळे या राज्य महामार्गाची पाहणी केली असता अवस्था खरोखरच बिकट झाली आहे, हे वास्तव आहे.
एमएमआरडीएच्या क्षेत्रात विविध प्रकारची विकासकामे सुरू आहेत. एमएमआरडीएने भरीव निधी ज्या कामासाठी दिला, ते काम म्हणजे काटईनाका ते बदलापूरमार्गे कर्जतकडे जाणारा राज्य महामार्ग. अर्थात, हा महामार्ग कल्याणहूनही अंबरनाथमार्गे बदलापूरला जोडण्यात आला आहे. काटईनाका आणि कल्याण येथून दोन स्वतंत्र रस्ते अंबरनाथ येथील फॉरेस्टनाका येथे एकत्रित आले आहेत. हा रस्ता बदलापूरमार्गे कर्जत आणि पुढे पुण्याला जोडण्यात आला आहे. पूर्वी हा रस्ता दोनपदरी होता. मात्र, या रस्त्याला राज्य महामार्गाचा दर्जा मिळताच एमएमआरडीएने हा रस्ता आपल्या ताब्यात घेत तो चारपदरी केला. सव्वाशे कोटीवर या रस्त्यासाठी खर्च करण्यात आला आहे. काटईनाका ते बदलापूर आणि पुढे खरवई ते वांगणी या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येणार होते. मात्र, अनेक ठिकाणी पाणी साचत असल्याने बदलापूर शहरातून जाणारा रस्ता हा काँक्रिटचा करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्यानुसार, काटईनाका ते बदलापूरच्या सीमेपर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. पुढे हा रस्ता होप इंडिया कंपनीपर्यंत काँक्रिटचा करण्यात आला. मात्र, होप इंडिया ते वांगणीपर्यंत पुन्हा हा रस्ता डांबरी करण्यात आला. या रस्त्याचे काम करताना पहिल्याच पावसात हा रस्ता पूर्णपणे खड्ड्यांत हरवला होता. मात्र, संबंधित कंत्राटदाराशी रस्त्याच्या देखभाल, दुरुस्तीसाठी तीन वर्षांचा करार करण्यात आला होता. त्यामुळे एमएमआरडीएच्या अधिकाºयांनी या रस्त्याची दुरुस्ती कंत्राटदाराकडून करून घेतली.
मुळात या रस्त्याच्या कामाचा दर्जा हा पहिल्याच पावसात दिसून आला होता. मात्र, कंत्राटदारावर कारवाई न करता त्याच्याकडून रस्त्याची दुरुस्ती करून घेण्यात आली. या कंत्राटदाराने हा रस्ता बनवताना तो दोन ते तीन वर्षे टिकेल, इतक्याच क्षमतेचे काम केले होते. राज्य महामार्गाच्या कामाचा दर्जा सर्वात चांगला ठेवणे बंधनकारक आहे. मात्र, या रस्त्याच्या बाबतीत असे घडलेले दिसत नाही. कारण, मे २०१७ मध्ये कंत्राटदाराची रस्ते दुरुस्तीची मुदत संपल्याने त्याने नावाला रस्तेदुरुस्ती करून आहे, त्या अवस्थेत आपली जबाबदारी संपवली.
कंत्राटदाराने बेजबाबदारपणा केला असला तरी त्याच्यावर नियंत्रण ठेवणाºया एमएमआरडीएनेही तेवढीच मोठी चूक केली आहे. रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी संपणार आहे, याची जाणीव असतानाही एमएमआरडीएने या रस्त्याच्या देखभाल, दुरुस्तीसाठी कोणतीच आर्थिक तरतूद केली नाही, याचे आश्चर्य वाटते. बेजबाबदारपणाचा अंत येथे झालेला नाही. तर, याच एमएमआरडीएने या रस्त्याचा ताबा हा थेट सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दिला आहे.

दलापूर ते कर्जत या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी तर डांबरी रस्त्यावर केवळ खडीच शिल्लक राहिली आहे. खडीसोबतचे डांबरही नाहीसे झाले आहे. यावरून, रस्त्याच्या कामात निकृष्ट दर्जाचे डांबर वापरल्याचे समोर येत आहे. बदलापूरच्या होप इंडिया ते वांगणी या रस्त्याचाच विचार केला, तरी या रस्त्यावर पडलेले खड्डे आणि त्याची झालेली दुरवस्था पाहता या मार्गावरून पुणे गाठणे, हे अवघड झाले आहे. कर्जतकडील रस्त्याची झालेली दुरवस्थाही यापेक्षा वेगळी नाही. त्यामुळे आता वाहनचालक पुण्याकडे जाण्यासाठी या रस्त्याचा सर्वात कमी वापर करत आहेत. ज्या वाहनचालकांना या रस्त्याची अवस्था माहिती नाही, तेच या मार्गाने वाहतूक करत आहेत. या रस्त्यावरून एकदा गेल्यावर पुन्हा त्या रस्त्यावरून जाण्याची इच्छा होत नाही, अशी अवस्था या रस्त्याची झालेली आहे. त्यामुळे हा रस्ता असून नसल्यासारखा झाला आहे.
होप इंडिया कंपनी ते खरवईपर्यंतच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. या रस्त्यावर दिवे नसल्याने रात्रीच्या वेळी खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अनेक वाहनचालक या रस्त्यावर पडतात. अनेक चारचाकी वाहने ही खड्ड्यांमध्ये आदळतात. हा रस्ताही मोठ्या प्रमाणात धोकादायक झाला आहे. खरवईच्या मुख्य चौकातच मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे त्याचा त्रास ग्रामस्थांनाही होत आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात नवीन बांधकामे होत असल्याने या बांधकामांना साहित्य पुरवणारे मोठे ट्रक आणि डम्परदेखील याच रस्त्यावरून जात असल्याने त्यांनाही या खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागत आहे.
खरवई ते चामटोली या दोन किलोमीटरच्या रस्त्याची पूर्ण चाळण झाली आहे. उतरणीवरचा रस्ता पूर्णपणे खचला आहे. या रस्त्यावर डांबर नाही, तर केवळ खडी शिल्लक राहिली आहे. त्यामुळे वाहने घसरण्याचे प्रमाणही वाढले आहे. याचा सर्वाधिक त्रास हा दुचाकीस्वारांना होत आहे. चामटोली येथील सह्याद्री हॉलसमोरच मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. पुलाला लागूनच हे खड्डे पडल्याने वाहनाचा ताबा सुटून गाडी पुलात पडण्याची भीती निर्माण झाली आहे. इतकेच नव्हे तर पुलाला लागून असलेल्या या रस्त्यावर खड्डेही एक फुटापेक्षा जास्त खोलीचे झाले आहेत. त्यामुळे वाहने आणि वाहनचालकांना मोठा धक्का या खड्ड्यांतून जाताना बसतो. खड्डे चुकवण्यासाठीही रस्ता शिल्लक राहिलेला नाही.
असाच काहीसा प्रकार चामटोलीनाक्यावर झाला आहे. राज्य महामार्गाच्या या चौकात चोहीकडे खड्डेच खड्डे पडले आहे. खड्ड्यांतून वाहन गेल्यावर चिखल अंगावर उडण्याचे प्रकार या चौकात मोठ्या प्रमाणात घडत आहेत. त्यामुळे पादचारी आणि वाहनचालक यांच्यात वादावादीचे प्रमाण वाढले आहे.
चामटोली ते कासगाव या रस्त्याची अवस्था किंचित बरी म्हणावी लागेल. या ठिकाणी रस्त्याच्या काही भागांतच खड्डे पडले आहेत. हा रस्ता बरा असला तरी कासगाव येथील चौकात मात्र पुन्हा तीच अवस्था निर्माण झाली आहे. या चौकातही खड्डेचखड्डे पडले आहे. कासगाव ते गोरेगाव या रस्त्यावर अनेक ठिकाणी शेतातील पाणी थेट रस्त्यावरून वाहत आहे. वाहणाºया पाण्याखाली खड्डे आहेत, याची कल्पना वाहनचालकांना नसल्याने या खड्ड्यांमध्ये वाहने आदळण्याचे प्रमाण वाढले आहे. वाहणाºया पाण्यातून गाडी गेल्यावर ते पाणी शेजारून जाणाºया नागरिकांवर अथवा गाड्यांवर उडते. त्यामुळे हा रस्ता त्या ठिकाणी धोकादायक झाला आहे. गोरेगाव ते वांगणी हा रस्तादेखील वाहतुकीसाठी धोकादायक झाला आहे. अनेक ठिकाणी रस्ता चांगला वाटत असला, तरी रस्त्याच्या मध्यभागी अचानक खड्डा येत असल्याने वाहनचालकांना अचानक ब्रेक दाबण्याची वेळ येते. त्यामुळे मागून येणाºया गाडीची या गाडीला धडक लागण्याची भीती निर्माण झाली आहे.

खडड्यांची रांगोळी
वांगणी पुलावरदेखील मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याने त्या ठिकाणी वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. वांगणी ते शेलू या रस्त्यावरही खड्ड्यांची रांगोळी झालेली आहे. वांगणीच्या पुढे डेणे गावाच्या वळणावर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना रस्ताच शिल्लक राहिलेला नाही. थेट मोठमोठे खड्डे पडल्याने त्या ठिकाणी गाडीचे चाक अडकण्याचे प्रकार वाढले आहेत. अनेक वाहनचालकांना या खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने वेगात या खड्ड्यांमध्ये वाहन आदळते. तर, शेलू गावाच्या वळणावरदेखील हीच अवस्था निर्माण झाली आहे.

आर्थिक तरतूदच नाही!
पावसात या रस्त्याची वाताहत होणार, याची कल्पना असतानाही हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाने स्वत:च्या ताब्यात घेतला.
रस्ता ताब्यात घेत असल्याने त्या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीचा खर्च मंजूर करून घेणे गरजेचे होते.
मात्र, वार्षिक देखभाल, दुरुस्तीचा खर्च मंजूर नसतानाही हा रस्ता ताब्यात घेतल्याने आता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नावाने नागरिक संताप व्यक्त करत आहे.

पाहणी करण्यासाठी
अधिकाºयांना वेळच नाही
सर्व चूक एमएमआरडीएच्या ढिसाळ कारभाराची असली, तरी त्याचा भुर्दंड आता येथून जाणाºया वाहनचालकांना आणि स्थानिक ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. शहरातील किंवा गावातील रस्त्यांच्या अवस्थेपेक्षा बिकट अवस्था ही राज्य महामार्गाची झाली आहे. एवढेच नव्हे तर काही ठिकाणी एक फुटापर्यंतचे खड्डे पडलेले आहेत. त्याची दुरुस्ती तर करणे सोडाच, त्या रस्त्याची पाहणी करण्यासाठीही अधिकाºयांकडे वेळ नाही, हीच या रस्त्याची शोकांतिका आहे.

 

Web Title:  Badlapur-Karjat highway hamper, MMRDA's poor planning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.