गरिबांच्या शिक्षणासाठी धडपड करणारा अवलिया

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 12:45 AM2019-01-31T00:45:08+5:302019-01-31T00:45:33+5:30

देशभर सायकलवरून प्रवास; १९९२ पासून उपक्रमाला केला प्रारंभ, २० हजार खेड्यांमध्ये दिले धडे

Avalia struggling for poor education | गरिबांच्या शिक्षणासाठी धडपड करणारा अवलिया

गरिबांच्या शिक्षणासाठी धडपड करणारा अवलिया

- जितेंद्र कालेकर 

ठाणे : सायकलवरून देशभरातील गरीब मुलांच्या शिक्षणासाठी भ्रमंती करणाऱ्या आदित्यकुमार या ४९ वर्षीय अवलियाने गुरुवारी लखनौ येथून ठाणे गाठले. देशातील शेवटच्या घटकातील गरीब, अनाथ मुलांना सायकलवर जाऊन साक्षर आणि शिक्षित करण्याचे ध्येय असल्याचे आदित्यकुमार याने ‘लोकमत’ला सांगितले.

उत्तर प्रदेशातील सलेमपूर (जि. फरकाबाद) या गावात वास्तव्याला असलेल्या आदित्यकुमारने विज्ञान शाखेतून (बीएससी) आपले शिक्षण पूर्ण केले आहे. शंभरी पार केलेले आईवडील, दोन बहिणी आणि दोन भाऊ असा त्यांचा परिवार आहे. इतर सर्व विवाहित आहेत. १९९२ पासून सायकलवरून सुरुवातीला फरकाबादमध्ये गरीब मुलांच्या शिक्षणासाठी फिरणाºया आदित्यकुमारने राज्यभर भ्रमंती केली. पुढे अनेक ठिकाणी शिक्षणापासून गरीब मुले वंचित असल्याचे आढळल्यामुळे या प्रत्येकापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी आपली पदरमोडही केली. १९९२ मध्ये आॅल इंडिया सायकलगुरूचा हा प्रवास सुरू झाला. १२ जानेवारी २०१५ रोजी त्यांनी सायकलवरून ‘आओ भारत को साक्षर बनाये’, ‘हर बेसहारा को शिक्षा मिले यही है प्रयास’ अशी घोषवाक्ये घेऊन भारतयात्रेला सुरुवात केली. उत्तर प्रदेश, दिल्ली, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, चंदीगढ, जम्मू-काश्मीर, पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि महाराष्टÑ आदी २९ राज्यांमध्ये त्यांचा हा प्रवास झाला. या एक लाख १७ हजार किलोमीटरच्या प्रवासात त्यांनी २० हजार गावखेड्यांमध्ये जाऊन हजारो मुलांना प्राथमिक शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. हिमाचल प्रदेशातील सोलन सिटीमधील सहा ते सात हजार झोपडपट्टी भागातीलमुलांनाही त्यांनी प्राथमिक शिक्षण दिले. आतापर्यंत पाच लाख किलोमीटर भ्रमंती केल्याचा दावा केला आहे.

आदित्यकुमार यांच्या शिक्षणासाठीच्या धडपडीची लिमका बुक आॅफ रेकॉर्डनेही नोंद घेतली आहे. याशिवाय, अमेरिकेच्या गोल्डन बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डसह परदेशातील प्रसारमाध्यमांनीही दखल घेतली आहे. देशभरातील अनाथ, गरीब मुलांच्या शिक्षणासाठी व्यापक देशव्यापी कार्य करण्यासाठी मदत करू शकतात, असेही त्यांनी आवाहन केले आहे.

दोन लाख मुलांनी घेतली शाळेची प्रेरणा
या प्रवासात कधी एखादा दानशूर त्यांना कपडे देतो, तर कोणी पैसे, कधीकधी तर खायलाही काही नसते. अशावेळी उपाशीपोटीही एखाद्या गावखेड्यामध्ये किंवा शहरातील रस्त्यावरच अंथरूण टाकून विश्रांती घेत असल्याचे ते सांगतात. अनेक गरीब मुलांना शिक्षणासाठी प्रेरित केल्यामुळे अनेकांनी उच्च शिक्षण घेतले. त्यातील काही शिक्षक तर कोणी उच्च पदस्थ अधिकारीही झाल्याचे त्यांनी सांगितले. अशा सुमारे दोन लाख मुलांना त्यांनी शाळेत येण्याची प्रेरणा दिली. याच ध्येयासाठी १५ वर्षे घर सोडूनही त्यांना राहावे लागले.

मुख्यमंत्री, राज्यपालांकडून गौरव या संपूर्ण कार्याची दखल घेऊन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि राज्यपाल राम नाईक यांनीही या अवलियाचा २०१४ मध्ये सत्कार केला. देशभरातील गरीब तसेच मजुरांच्या मुलांच्या शिक्षणासाठी भरीव कार्य करण्यासाठी मुंबईतील सेलिबे्रटी, दानशूर व्यक्ती किंवा बड्या राजकारण्यांनी आपल्याला दत्तक घेतल्यास एक व्यापक कार्य देशासाठी राबवता येईल, असा मानस त्यांनी व्यक्त केला.

Web Title: Avalia struggling for poor education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.