औदुंबरचा काव्ययोगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 05:30 AM2018-04-22T05:30:13+5:302018-04-22T05:30:13+5:30

सदानंद सामंत या औदुंबरातील साहित्यप्रेमी मित्राच्या स्मृतिप्रीत्यर्थ सुधांशू व त्यांच्या मित्रांनी सदानंद मंडळाची १९३९ मध्ये स्थापना केली.

Audub's poet | औदुंबरचा काव्ययोगी

औदुंबरचा काव्ययोगी

Next

राजीव जोशी|


प हाटेच्या त्या दवात भिजुनी, विरली हळूहळू सुंदर रजनी, स्वप्न सुमांवर अजूनी तरंगे, ती सोन्याची वेल।।’ आठवतंय कां काही? बरोब्बर ! ‘इथेच आणि या बांधावर, अशीच शामल वेळ, सख्या रे किती रंगला खेळ’ हेच ते गीत. स्मृतीचं नेमकेपण, इथेच, या, अशीच अशा शब्दांमधून परिसर, वेळ आणि ठिकाणाच्या खाणाखुणांची साक्ष आणि त्याच जवळिकीने ‘सख्या रे’ अशी साद घालणारी ललना आपल्या प्रियकराच्या आठवणी उलगडतेय. निसर्गाच्या अनेक खुणा दाखवत असताना ‘सख्या रे’ या संबोधनात ही ललना अभिसारिका नाहीये तर त्या रंगीत दिवसात मिळालेल्या आत्मिक आनंदाचं समाधान आहे आणि त्यातून आंतरिक लय रसिकांच्या हृदयात निर्माण होते. तसं पाहिलं तर गाण्याच्या कवी, गीतकाराकडे आपण फारसं लक्ष देत नाही. पण, रसिकांनी कवीच्या कल्पनेच्या, त्याच्या शब्द श्रीमंतीलाही दाद द्यायला हवी. ज्या माणसाने ‘देव माझा विठू सावळा’ लिहिले, ‘दत्त दिगंबर दैवत माझे’ या गीतातून ‘तीन शिरे कर सहा’ अशी प्रसन्नवदन दत्तमूर्ती भाविकांच्या हृदयात विराजमान करताना ‘सात्त्विक भाव उमलून मी पण सरते’ असा संदेश दिला, अशा कवी सुधांशू यांची ‘इथेच आणि या बांधावर’ ही अतिशय तरल रचना आहे. कवी सुधांशू (हणमंत नरहर जोशी) म्हटलं की, समोर येतं सांगली जिल्ह्यातील औदुंबर हे दत्तात्रयाचं तीर्थस्थान.
सदानंद सामंत या औदुंबरातील साहित्यप्रेमी मित्राच्या स्मृतिप्रीत्यर्थ सुधांशू व त्यांच्या मित्रांनी सदानंद मंडळाची १९३९ मध्ये स्थापना केली. साहित्यप्रेमी मित्रासाठी असं काही करणं अलीकडे तसं दुर्मीळच, त्यातून कोणत्याही देणगी वा सरकारी अनुदानाशिवाय मित्राच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी १४ जानेवारीला मकरसंक्रांतीच्या दिवशी औदुंबरसारख्या आडवळणाच्या गावी साहित्य संमेलन भरवणं केवढा मोठा घाट. हे महाकठीण काम सुधांशू अखेरपर्यंत करत आले होते हे विशेष.
मला सुधांशू गीत आणि गाण्यातून माहीत होते. त्यांना प्रत्यक्ष भेटण्याचा योग मात्र कधीच आला नाही. त्यांची भेट गांधींवरच्या कविता संकलनाच्या निमित्ताने - हे कोण ऋ षी चालले - या कवितेत झाली. सुधांशूंचा जन्म १९१७ चा हे लक्षात घेतलं तर असं लक्षात येतं की, सुधांशू स्वातंत्र्यपूर्व काळातल्या मोठ्या कालखंडाचे साक्षीदार होते. महात्मा गांधींचा त्यांच्यावर प्रभाव होता. मराठीतल्या अनेक कवींनी गांधींना वेगवेगळ्या रूपात पाहिलंय, ‘कृश देहावर उग्र तपाचे दिव्य तेज फाकले, हे कोण ऋषी चालले’ असं सुधांशू आपल्या गांधींवरच्या कवितेत जसं पाहिलं, जाणलं, तसंच्या तसं सांगतांत. ‘सत्य अहिंसेची जणू मूर्ती, कणाकणांतून भरली शांती’ ‘चंदन लाजे झिजे त्यापरि, सेवाव्रति रंगले’ गांधींना दिक्कालाचे बंधन नाही आणि पिढ्यापिढ्यांचे ते आशाधन आहे हा आशावादही साध्या शब्दात सुधांशू मांडतात.
सुधांशू मराठी कवितेच्या एका मोठ्या कालखंडातले कवी होते. कुसुमागजांच्या ऊर्जस्वल कवितेपासून मर्ढेकरांच्या नवकवितेपर्यंतचे अनेक प्रवाह, संप्रदाय मराठी कवितेत आले पण औदुंबराचा हा योगी आपल्या सात्त्विक, ऋ जू प्रकृतीपासून ढळला नाहीत. सात कवितासंग्रह, बारा गीतसंग्रह, दोन भक्तिगीतांचे संग्रह अशी जवळजवळ २२ पुस्तके प्रकाशित झालीत.
सुधांशू अवघ्या इंग्रजी तीन-चार इयत्ता शिकलेले. दत्तभक्ती त्यांच्या घरात परंपरेने चालत आलेली आणि दत्तावताराबद्दल त्यांना लहानपणापासूनच आकर्षण त्यामुळे गीतरूपाने दत्तोपासना करण्याचा त्यांना छंद लागला होता. पण याचं श्रेय ते जन्मदात्री माऊली आणि कृष्णामाईला जसे देतात. त्याचप्रमाणे औदुंबरचे दत्तयोगी नारायणनंदतीर्थ स्वामीमहाराज यांचीही प्रेरणा त्यामागे होती. गीतकार असले तरी त्यांच्या कवितांची दखल अनेक नामवंतांनी घेतली याचं कारण त्यातला हळुवारपणा आणि प्रांजळपणा. शब्दांचा अकारण सोस नाही, अलंकारांच्या सोसापायी कृत्रिमता नाही, फक्त सहजसौंदर्य.
सुधांशू बरेचसे हळवे आणि स्वप्नाळू होते आणि निसर्ग, कुटुंबीय, परमेश्वरचिंतन हे त्यांचे विषय होते. कृष्णाकाठचे संस्कार घेऊन अवतरलेली त्यांची कविता तिथल्या निसर्गसृष्टीत रंगून जाते, कृष्णेचा डोह, घरासमोरचा पुरातन वटवृक्ष, नदीकाठची शिवारे, मंद झुळकीच्या लाटांचा खेळ या सर्वात त्यांचं कवीमन हरखून गेलं होतं. कृष्णा आणि कृष्णाकाठचा परिसर हा त्यांच्यासाठी नंदनवनच नव्हता, ते म्हणतात ‘ही तर कविता कवि कुलगुरूची, प्रतिभेने ही फुलली, जीव कळी विश्वाची’. मंदिरातले टाळ-मृदंगाचे नाद, सभोवतालचा रम्य निसर्ग व परमेश्वर चिंतन यामध्ये सुधांशू पावित्र्याचं आणि मांगल्याचे गुणगान गाताय, असं त्यांच्या कविता वाचताना वाटत राहतं. ‘माझ्या घरी सांजवेळी, रोज येती देव कोटी आणि घरधनिणीची नित्य भरितात ओटी’ या शब्दात कवी आपल्या संस्कार, मांगल्य सूचित करतात. तेव्हा कवीचं अवघं जीवनच बोलकं होतं. साधेपणा हा सुधांशूच्या व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग आहे. शब्दातील शीतल चांदणे, लज्जेचे विभ्रम, पदराशी केलेले लटके चाळे मोहमयी असतात.‘आहे तशीच ये नको नेसू चंद्रकळा, नको माझ्यासाठी ओठी चंदनाचा गळा’. साधेपणा किती असावा. ‘चाल रोजच्या चालीत, मोकळेच बोल। तुझ्या साधेपणालाच, माझ्या मनी बोल’ असा साधेपणा, पण असं असूनही ‘भुलवितो मज शुद्ध प्रेमाचा उमाळा’ हे आपलं अंतरंग सांगायला कवी विसरत नाही’.
साधारणपणे गीतकार, भक्तिगीतकार यांना शिक्के मारून बंद करणं सोपं असतं. माणूस संवेदनशील असतो म्हणूनच कविता लिहीत असतो. रवींद्रनाथ टागोरांनी असं लिहून ठेवलंय की टंल्ल ्र२ ‘्रल्ल िु४३ ेील्ल ं१ी ू१४ी’. आजही आपल्या आजूबाजूला स्त्री, अबला आणि दलितांवर क्रूर अत्याचार होत आहे. वासनांनी पेटलेले माणसांमधले दानव निरागस स्त्रियांची अब्रू लुटताहेत, अत्याचार करताय आणि संपवूनही टाकताय. अशाच एका घटनेने विकल होऊन सुधांशू यांनी ‘रवींद्र सरोवरावर’ ही आत्मपरीक्षण करायला लावणारी कविता लिहिली.
राम, कृष्ण, शिवाजी अशा थोर विभूतींची नावे किंवा वारसा सांगायला आपण नालायक आहोत, कारण ते भारतीय संस्कृतीचे छावे होते. आजही आपल्या अवतीभोवती अत्याचार घडत आहेत. आम्ही काय करतो फक्त निषेधाचे गुºहाळ आणि मेणबत्ती मोर्चे. सुधांशू म्हणतात, भारतीय ललनांची अब्रू मातीमोल झालेली आहे, पण त्यापेक्षाही मातीमोल झाली आहे पुरुषांची इज्जत, कारण ज्यांनी उसळून उठायला हवं असं आमचं तारुण्य ‘बसले आहे इथे गरम बातम्यांची शेव चघळीत, निर्लज्जपणाने’. महापुरुषांचा वारसा सांगणाऱ्यांना ते म्हणतात ‘ते होते पुरुषोत्तम, त्यांची होती सिंहाची छाती, त्यांनी शिर घेतलं होतं तळहातावर, शील रक्षणासाठी’.
सुधांशूवर हीरक महोत्सवानिमित्त प्रकाशित ग्रंथात अनेक दिग्गज साहित्यिकांनी लिहिलेलं आहे. सुधांशूंच्या व्यक्तिमत्त्वातली सामाजिक जाण, मानवता याबाबत काही कविता बोलक्या आहेत. कवितेत काव्यमूल्यं, साहित्यिकमूल्यं असो नसो, सुधांशूंसारख्या सोज्ज्वळ, धार्मिक आणि सालस वृत्तीच्या कवीने समकालाची नोंद घेत, आपली संपूर्ण संवेदनशीलता पणाला लावत समाजाला जाब विचारावा हाच मोठा कवीधर्म वाटतो.
१९४० मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘कौमुदी’ या काव्यसंग्रहाद्वारे सुधांशू प्रथम रसिकांसमोर आले आणि त्यानंतर १९५० मध्ये ‘विजयिनी’ प्रसिद्ध झाला. या दोन्ही संग्रहांतल्या कविता साध्या, सरळ, यमकरचनेची बंधनं पाळणाºया होत्या. १९५८ मध्ये आलेल्या ‘जलवंती’ संग्रहातल्या ‘मला ती आवडते झोपडी’ किंवा ‘अशाच वेळी निळ्या जळावर’ सारख्या रचनांनी त्यांना गीतकार म्हणून मान्यता मिळायला लागली पण त्यांना खरी मान्यता मिळाली ती १९६० मध्ये प्रसिद्ध झालेल्या गीतसुगंध या भक्तिभावगीत संग्रहाने. यातलं ‘दत्तदिगंबर दैवत माझे’ हे गीत उपासनागीत म्हणून महाराष्ट्रात घराघरांत लोकप्रिय झालं.

सुधांशंूनी दत्तावतारावर जशी अनेक गीते लिहिली, त्याचप्रमाणे विठ्ठल, राम आदी देवतांवर त्यांनी केलेल्या रचना ईश्वरी संकेत स्पष्ट करणाºया, मूर्त स्वरूपाचे संदर्भ व बारकावे टिपणाºया आहेत. देव माझा विठू सावळा या गीताचा विचार केला तर अगदी साधेपणाने अमूर्ताला मूर्त करण्याची त्यांच्या शब्दांतली ताकद लक्षात येते. असं असलं तरी ‘रूद्राक्षांच्या नकोत माळा, नको त्रिकाळी स्नान, भुकेला भक्तीला भगवान’ हे भक्तीचं मर्म सांगायला सुधांशूमधला द्रष्टा विसरत नाही.

Web Title: Audub's poet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.