Assets tax on Thane Municipal corporation's DG app will get 2% concession in general tax on property taxes | ठाणे महापालिकेच्या डीजी अ‍ॅपद्वारे मालमत्ता कर भरल्यास मिळणार मालमत्ता कराच्या सामान्य करात दोन टक्के सवलत
ठाणे महापालिकेच्या डीजी अ‍ॅपद्वारे मालमत्ता कर भरल्यास मिळणार मालमत्ता कराच्या सामान्य करात दोन टक्के सवलत

ठळक मुद्देआजी माजी सैनिकांनाही मिळणार मालमत्ता करात सवलतपर्यावरण,वृक्षारोपणात सक्रीय सहभाग घेणाऱ्यांनाही मिळणार सवलत

ठाणे - ठाणे महापालिकेच्या देशातील पहिल्या डीजीसीटी अ‍ॅपचा जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात शुभारंभ झाला. परंतु या अ‍ॅप बाबत अपेक्षित अशी जनजागृती न केल्यानेच आता पर्यंत केवळ ६२०० नागरीकांनीच हे अ‍ॅप डाऊनलोड केले आहे. त्यामुळेच आता हे अ‍ॅप ठाणेकरांनी डाऊनलोड करावे आणि या अ‍ॅपद्वारेच मालमत्ताकराचा भरणा करावा यासाठी ठाणे महापालिकेने मालमत्ता कराच्या सामान्य करात २ टक्के सवलत देण्याचा अजब फंडा तयार केला आहे. तसेच पर्यावरण, वृक्षारोपण यामध्ये सक्रीय सहभाग घेणाऱ्या गृहनिर्माण संस्था, सदनिकाधारकांना वैयक्तीक मालमत्ता करातील सामान्य करात दोन टक्के सवलत देण्याचा प्रस्ताव पालिकेने पुढे आणला आहे. या संदर्भातील प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे.
                  ठाणे महापालिकेच्या माध्यमातून देशातील पहिल्या डीजी अ‍ॅपचा शुभारंभ २३ जानेवारी रोजी झाला. त्यानंतर आता पर्यंत हे अ‍ॅप २२ लाख ठाणेकरांपैकी केवळ ६ हजार २०० नागरीकांनी डाऊनलोड केले आहे. तसेच या अ‍ॅपच्या माध्यमातून पालिकेच्या मालमत्ता कर व इतर कर भरण्यासाठीची सुविधा सुरु होण्यास तीन महिन्यांचा अवधी लागणार आहे. परंतु, ठाणे महापालिका या अ‍ॅपच्या जनजागृतीमध्ये कमी पडल्याचे आजही दिसत आहे. तज्ञांच्या म्हणन्यानुसार सुरु झाल्यापासून आजच्या तारखेपर्यंत किमान ५० हजार नागरीकांनी हे अ‍ॅप डाऊनलोड करणे अपेक्षित होते. परंतु तसे काही झालेले नाही. त्यामुळेच आता ठाणे महापालिकेने यापूर्वी विविध योजना यशस्वी करण्यासाठी जो फंडा वापरला तोच फंडा आता देखील वापरण्याचा निर्णय घेतला आहे.
                  यापूर्वी ठाणे महापालिकेने रेनवॉटर वॉटर हार्वेस्टींग कार्यप्रणाली ज्या सोसायटी वापरतील त्यांना मालमत्ता करात ५ टक्के सवलत, घनकचरा व्यवस्थापन योग्य रितीने केले असेल तर ३ ते ५ टक्के सवलत, ज्या सोसायची घनकचऱ्यावर प्रक्रिया करतील त्यांना ७.५ टक्के सवलत, त्याचाच आधार घेत आता ठाणे महापालिकेने डिजीकार्ड यशस्वी करण्यासाठी याच तंत्राचा आधार घेतला आहे. त्यानुसार ठाणे महापालिकेच्या डीजीसीटी प्लॅटफॉर्मद्वारे मालमत्ता कर भरणाऱ्या  मालमत्ताधारकास मालमत्ता कराच्या सामान्य करात २ टक्के सवलत, तसेच पर्यावरण, वृक्षारोपण यामध्ये सक्रीय सहभाग घेणाऱ्या  गृहनिर्माण संस्था, सदनिकाधारकांना वैयक्तीक मालमत्ताकरातील सामान्य करातही २ टक्के सवलत देण्याचा प्रस्ताव महासभेच्या पटलावर ठेवण्यात आला आहे.
चौकट - आजी माजी सैनिक - आजी सैनिक पत्नी हे देखील ठाणे शहराचे नागरीक म्हणून ठाणे शहरास त्यांचा अभिमान आहे. त्यामुळे त्यांना देखील मालमत्ता कराच्या सामान्य करात १०० टक्के सवलत, तसेच संरक्षण दलातील शौर्य पदकधारक व माजी सैनिकांच्या विधवा यांना देखील एका मालमत्तांच्या मालमत्ता करात १०० टक्के सवलत, तसेच महापालिकेच्या या सर्व धोरणानुसार एखाद्या गृहनिर्माण संकुलाने या प्रकल्पांची अंमलबजावणी केल्यास त्यांना मालमत्ता करात सुमारे ३२.५ टक्के सवलत देण्यात येणार आहे. 


Web Title: Assets tax on Thane Municipal corporation's DG app will get 2% concession in general tax on property taxes
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.