केंद्राच्या महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यक्रम पत्रिकेत राजशिष्टाचाराची ऐशीतैशी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2018 04:25 PM2018-01-10T16:25:50+5:302018-01-10T16:59:45+5:30

गुरुवारी होणारा मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री यांच्या हस्तेचा भूमिपूजनाचा कार्यक्रम हा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा असला तरी तो मीरा-भाईंदर भाजपानेच ताब्यात घेतल्याचे चित्र आहे.

Bhoomi Poojan Ceremony program of Central Highway Authority hijacked by Mira-Bhayandar BJP | केंद्राच्या महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यक्रम पत्रिकेत राजशिष्टाचाराची ऐशीतैशी

केंद्राच्या महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यक्रम पत्रिकेत राजशिष्टाचाराची ऐशीतैशी

Next

मीरा रोड - गुरुवारी होणारा मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री यांच्या हस्तेचा भूमिपूजनाचा कार्यक्रम हा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा असला तरी तो मीरा-भाईंदर भाजपानेच ताब्यात घेतल्याचे चित्र आहे. पक्षाच्या नावाने निमंत्रण पत्रिका देतानाच प्राधिकरणाच्या शासकीय पत्रिकेत राजशिष्टाचाराची ऐशीतैशी करण्यात आली आहे.

ज्येष्ठ आमदार हितेंद्र ठाकूरसह स्थानिक आमदार प्रताप सरनाईक आदी शिवसेना, बविआ, राष्ट्रवादीसह भाजपाच्या आमदारांना देखील खालची जागा दाखवत एकमेव भाजपा आमदार नरेंद्र मेहतांना मात्र मंत्री, खासदारांच्या वरच्या रांगेत स्थान दिले आहे. वसई-विरारच्या महापौरांसोबत अनेक आमदारांना देखील डावलले आहे. मीरा-भार्इंदर महापालिका हद्दीतून जाणारा मुंबई-अहमदाबाद महामार्गावर एक ठिकाणी अंडरपास, एका ठिकाणी पादचारी पूल, घोडबंदर खिंडीचे रुंदीकरण तसेच वरसावे येथे खाडीवर नवीन पूल बांधण्याच्या कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. सदर सर्व कामं ही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने केली जाणार आहेत.

त्या अनुषंगाने भूमिपूजनाचा कार्यक्रम देखील प्राधिकरणानेच ठेवला असून, तो मीरा रोडच्या एस. के. स्टोन श्रीकांत जिचकर चौक येथे उद्या गुरुवारी ११ रोजी दुपारी १२ वाजता होणार आहे. तशी निमंत्रण पत्रिका प्राधिकरणाने काढली आहे. परंतु मीरा-भार्इंदर भाजपाने मात्र नेहमीप्रमाणेच पक्षाच्या निमंत्रण पत्रिकाच सोशल मीडियावर टाकल्या असून, सदर कार्यक्रम जणू प्राधिकरणाचा नसून भाजपाचा आहे, असेच चित्र उभे केले आहे. त्यातच एमएमआरडीच्या निधीतून होणारा जेसलपार्क - घोडबंदर मार्गाचा पहिला टप्पा, सुभाषचंद्र बोस मैदान ते मोर्वा असा काँक्रिट रस्ता , भाईंदर पूर्व व पश्चिम रेल्वे स्थानक सुशोभीकरण आदी कामांचे सुद्धा भूमिपूजन नमूद करण्यात आले आहे.

शासकीय कार्यक्रम पक्षाच्या नावे खपवतानाच दुसरीकडे प्राधिकरणाच्या निमंत्रण पत्रिकेत देखील राजशिष्टाचाराची ऐशीतैशी करण्यात आली आहे. प्राधिकरणाने तयार केलेल्या निमंत्रण पत्रिकेत चक्क मंत्री आणि खासदारांच्या ओळीत भाजपा आमदार नरेंद्र मेहता व महापौर डिंपल मेहता यांना स्थान देण्यात आलं आहे. तर त्या खालच्या रांगांमध्ये मात्र चक्क ज्येष्ठ आमदार हितेंद्र ठाकूर, स्थानिक आमदार प्रताप सरनाईक या सोबतच आमदार क्षितिज ठाकूर, निरंजन डावखरे, संजय केळकर, आशिष शेलार, रवींद्र फाटक, पास्कल धनारे, डॉ. भारती लव्हेकर, बाळाराम पाटील, सुभाष भोईर, अमित घोडा, विलास तरे, शांताराम मोरे आदी आमदारांना स्थान दिले आहे.
एकमेव आ. नरेंद्र मेहता यांनाच मंत्री, खासदारांमध्ये स्थान दिले आहे. वरसावे नवीन पुलाची हद्द ही वसई-विरार महापालिकेत देखील आहे. परंतु तेथील महापौर रुपेश जाधव यांना डावलले आहे. दहिसर - बोरिवलीचे आमदार मनीषा चौधरी व प्रकाश सुर्वे यांना सुद्धा स्थान दिलेले नाही.

वास्तविक प्राधिकरणाच्या वतीने महामार्गावर ज्या कामांचे भूमिपूजन होणार आहे तो सर्व भाग हा शिवसेना खासदार राजन विचारे व सेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या मतदारसंघातला आहे. तर भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांचा हा मतदारसंघच येत नाही. पण तरी देखील आ. मेहतांना वरची रांग तर ठाकूर, सरनाईक आदी सर्व आमदारांना खालच्या रांग पत्रिकेत दिल्याने आ. मेहतांच्या वजनाची चर्चा चांगलीच रंगली आहे. आ. मेहतांशी भ्रमणध्वनीवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध नसल्याचे सांगितले जात होते. शिवाजी पवार ( राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ) - गुजरात कार्यालयातून निमंत्रण पत्रिका आली असून, याबद्दल आपण अधिक काही बोलू शकत नाही.

प्रताप सरनाईक ( आमदार ) - पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे व मी सातत्याने वरसावे नवीन पुलासह विविधकामांसाठी सतत पाठपुरावा केला. सर्व कामं आमच्या मतदारसंघात आहेत. राजशिष्टाचाराचे मुद्दाम उल्लंघन केले गेले असून, या विरोधात हक्कभंगचा प्रस्ताव आणणार आहे.

अविनाश गुरव ( बविआ जिल्हाध्यक्ष ) - लोकनेते हितेंद्र ठाकूर हे ज्येष्ठ आमदार असून, आमच्या नेत्यांचा अवमान हा मुद्दाम केलाय. प्राधिकरणाने माफी मागावी. जेव्हा गरज होती तेव्हा आ. मेहता हे आमच्या नेत्यांचे उंबरठे झिजवत होते. आता बहुमताच्या मस्तीत ठाकूर यांनी केलले उपकार व मदत ते विसरले असावेत.

Web Title: Bhoomi Poojan Ceremony program of Central Highway Authority hijacked by Mira-Bhayandar BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.