डोंबिवली - राज्यातील गडकिल्ल्यांची माहिती तरुण पिढीला व्हावी, या उद्देशाने टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा भरवलेल्या किल्ले स्पर्धेत पश्चिमेतील जुनी डोंबिवली येथील अरुण निवास इमारतीत बांधण्यात आलेल्या तोरणा किल्ल्याने बाजी मारली.
टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे दरवर्षी किल्ले स्पर्धा भरवली जाते. यंदाच्या स्पर्धेत ४५ इमारतींमधील तरुणांनी सहभाग घेतला. सर्व स्पर्धकांनी मूळ किल्ल्याची हुबेहुब प्रतिकृती साकारण्याचा प्रयत्न केला. या स्पर्धेत द्वितीय क्रमांक किल्ले परांडा (बाळ गोपाळ मित्र मंडळ, मढवी शाळेजवळ, आयरे रोड), तृतीय क्रमांक किल्ले पुरंदर (अर्जुन नगर कॉम्प्लेक्स, शेलार नाका), तर किल्ले चंदेरी ( जुनी व्यायामशाळा, सत्यवान चौक, उमेश नगर) आणि किल्ले माहुली (विजयस्मृती, पेंडसेनगर) यांना उत्तेजनार्थ पारितोषिक जाहीर झाले. तर सारस्वत कॉलनी येथील विवेकानंद सोसायटी यांचा लोहगड आणि नामदेव पथ येथील पंढरीनाथ स्मृती इमारतीत साकारलेला किल्ले तोरणा यांनाही प्रोत्साहनपर पारितोषिक जाहीर झाल्याची माहिती मंडळाचे प्रसिद्धीप्रमुख संदीप वैद्य यांनी दिली.
दुर्गप्रेमी विलास वैद्य आणि ओंकार देशपांडे यांनी या सर्व किल्ल्यांचे परीक्षण केले. स्पर्धकांनी किल्ल्याचा पुरेसा अभ्यास केला आहे का, हे तपासण्यासाठी त्यांनी माहिती विचारली. दरम्यान, सर्व किल्ल्यांच्या परीक्षण करून रविवारी रात्री निकाल जाहीर करण्यात आले.
विद्यार्थी-तरुणांनी थोडा वेळ काढून किल्ला बनवण्यासाठी एकत्र यावे, या उद्देशाने टिळकनगर गणेशोत्सव मंडळातर्फे किल्ले स्पर्धा धेतली जाते, असे मंडळाचे प्रकल्प प्रमुख व दुर्गप्रेमी तन्मय गोखले यांनी सांगितले. दरवर्षी या स्पर्धेत सहभागी होणाºया स्पर्धकांची संख्या वाढत राहो, अशी आशा मंडळाचे कार्यवाह केदार पाध्ये यांनी व्यक्त केली.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.