राष्ट्रवादीतील नाराजांचे एक गाडी में सब खिलाडी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2019 12:36 AM2019-01-30T00:36:29+5:302019-01-30T00:36:49+5:30

आव्हाडांविरोधात पकली खिचडी; संजीव नाईकांना पुरविला मीठमसाला

All the players in a car hit by NCP | राष्ट्रवादीतील नाराजांचे एक गाडी में सब खिलाडी

राष्ट्रवादीतील नाराजांचे एक गाडी में सब खिलाडी

Next

ठाणे : राष्ट्रवादीमधील अंतर्गत कलह काही केल्या संपण्याचे नाव घेत नसून आमदार जितेंद्र आव्हाडांविरुद्ध नाराजांच्या फळीला नाईक कंपनीची साथ लाभून मीठमसाला पुरविल्याची चर्चा आहे. तर या नाराजांना पक्षाने आतापर्यंत सर्व महत्त्वाची पदे दिली, प्रतिष्ठा, सन्मान दिला. मग त्यांना आणखी काय हवे असा सवालही आव्हाड समर्थकांनी या निमित्ताने उपस्थित केला आहे. एकूणच राष्ट्रवादीमधील हा अंतर्गत कलह आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महागात पडणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

काही महिन्यांपासून राष्ट्रवादीचे कळवा-मुंब्य्राचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि त्यांचे खंदे समर्थक मानले जाणारे नजीब मुल्ला यांच्यात चांगलेच खटके उडू लागले आहेत. मुल्ला यांना हणमंत जगदाळे यांची साथ मिळाल्याने हा कलह टोकाला गेला आहे. ठाण्याची राष्ट्रवादी ही सध्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झाल्याचा मुद्दा यापूर्वीच उपस्थित केला होता. तसेच पक्ष संघटना वाढविण्याच्या दृष्टीने कोणतीच पावले उचलली गेली नसल्याचा आरोपही या नाराजांनी केला आहे. केवळ कळवा मुंब्य्रापुरता पक्ष शिल्लक राहिल्याचे त्यांचे म्हणणे आहे. आता त्यांच्या या मुद्यांना आव्हाड समर्थकांनी चांगलेच प्रतिउत्तर दिले आहे. पक्षाने या नाराजांना काही दिले नाही असे नाही, पक्ष संघटना मजबुत होत असतांना, सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आंदोलने होत असतांना हीच नाराज मंडळी कुठे होती असा सवाल आता केला जाऊ लागला आहे. पक्षाने त्यांना आतापर्यंत खूप काही दिले आहे.

याचे काही पुरावे सुद्धा या मंडळींनी समोर आणले आहेत. त्यानुसार सध्या लोकशाही आघाडीचे गटनेते असलेले हणमंत जगदाळे यांचा विचार केल्यास त्यांना २००८ ते २०१० या कालावधीत विरोधी पक्षनेतेपद दिले गेले आहे. तर २०१२ ते नोव्हेंबर २०१५ पर्यंत पुन्हा विरोधी पक्षनेते आणि गटनेते दिले. तर २०१७ ते २०२२ या कालावधीसाठी त्यांच्या गळ्यात पुन्हा लोकशाही आघाडीचे गटनेतेपदाची माळ घातली आहे. याशिवाय ओवळा माजिवडा मतदार संघासाठी उमेदवारीसुद्धा दिली होती.

तर नजीब मुल्ला यांचा विचार केल्यास सलग तीन वर्षे म्हणजे २०१० ते २०१२ या कालावधीत विरोधी पक्षनेते, गटनेते आणि स्थायी समिती सदस्य, तर २०१२ ते २०१७ सलग पाच वर्षे स्थायी समिती सदस्यपद दिले आहे. याशिवाय २०१७ ते २०२२ या कालावधीतही त्यांना पुन्हा स्थायी समिती सदस्यपद दिले आहे. याशिवाय आव्हाडांच्याच कृपेने त्यांनाशहर अध्यक्षपद मिळाले आहे. तर दोन वेळा महापौरपदासाठी उमेदवारी देण्यात आली. कोकण पदवीधर मतदार संघातून २०१८ साली त्यांना निवडणूक लढविण्याची संधी दिली. तर सध्या प्रदेश कार्यकारणीमध्ये सरचिटणीस व १३६ भिवंडी विधानसभा क्षेत्रामध्ये निरिक्षक म्हणूनही त्यांची नेमणूक केली आहे. या दोन नाराजांना पक्षाने नेहमीच झुकते माप दिले असतांना आणखी काय हवे असा सवाल आता पक्षातीलच काही मंडळी करू लागली आहे. त्यामुळे अंतर्गत कलहाचा हा तिढा आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

राष्ट्रवादीच्या नाराजांची गाडीत चर्चा
दुसरीकडे हे वादळ सुरु असतांनाच सोमवारी रात्री ठाण्यातील कॅडबरी येथे एका गाडीत हणमंत जगदाळे, नजीब मुल्ला, ओवळा - माजिवडा विधानसभा क्षेत्राचे निरिक्षक अशोक पराडकर यांच्यासह माजी खासदार संजीव नाईक यांच्यात गुफ्तगू झाल्याचे समोर आले आहे.
या बैठकीला नाईक अ‍ॅण्ड कंपनीने हजेरी लावल्याने नाराज मंडळी आता आणखी आक्रमक होण्यााची चिन्हे दिसत आहेत. या बैठकीत काय रणनिती ठरवली हे मात्र गुलदस्यात असले तरी येत्या काळात धमाका होणार अशी टिप्पणी त्यांनी केल्याने हा धमाका काय असणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
नाईक आणि आव्हाड यांच्यातील वितुष्ट यापूर्वीच जगजाहीर आहे. परंतु, आता आव्हाडांच्या विरोधात त्यांच्याच लाडोबाने बंड थोपटल्याने आणि त्यांच्याच गटात नाईक कंपनी सामील झाल्याने येत्या काळात राष्टÑवादीत मोठे फेरबदल होण्याची दाट आहे.

लोकसभा, विधानसभेला अंतर्गत कलह आगामी निवडणुकीत ठरणार घातक
एकीकडे पक्षाचे प्रमुख शरद पवार हे पक्ष संघटना मजबूत करून संपूर्ण ताकदीनिशी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी जीवाचे रान करत आहेत. असे असतांना ठाण्यात मात्र राष्टÑवादीमधील अंतर्गत कलहामुळे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्याचे पडसाद उमटण्याची चिन्हे असून ते चांगलेच महागात
जाणार आहे.

पक्ष संघटना वाढविण्यावर झाली चर्चा
आम्ही अशा पद्धतीने काही दिवसा आड बैठका घेत आहोत. पक्ष संघटना मजबुत करण्यासाठी आणि आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीची रणनिती ठरविण्यासाठीच सोमवारी ही बैठक घेतली होती. ती गुप्त बैठक नव्हती.
- हणमंत जगदाळे - गटनेते, लोकशाही आघाडी

Web Title: All the players in a car hit by NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.