तानसा, मोडकसागरनंतर भातसाही भरले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 04:55 AM2018-07-19T04:55:41+5:302018-07-19T04:55:53+5:30

ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ७६.९७ टक्के पाऊस झाला आहे.

After tansa, Modaksagar, Bhattsahi is filled | तानसा, मोडकसागरनंतर भातसाही भरले

तानसा, मोडकसागरनंतर भातसाही भरले

Next

ठाणे : ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ७६.९७ टक्के पाऊस झाला आहे. याचदरम्यान, धरण क्षेत्रातही पाऊस चांगला झाल्याने पुरेसा पाणीसाठा झाला असून, तानसा, मोडकसागरनंतर भातसा वाहू लागले आहे. समाधानकारक पावसामुळे मुंबईकरांपाठोपाठ ठाणेकरांचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे.
बुधवारीही पावसाचा लपंडाव सुरू होता. सकाळी ८ वाजेपर्यंत ठाणे जिल्ह्यात सरासरी ३१.०४ मिमी पाऊस झाला. यामध्ये सर्वाधिक ६० मिमी पाऊस शहापुरात नोंदविला आहे. त्याचपाठोपाठ मुरबाड ३७, ठाणे ३५, कल्याण ३१, अंबरनाथ २४.३० आणि उल्हासनगर-भिवंडीत प्रत्येकी १५ मिमी पाऊस पडला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत (१ जून ते १८ जुलैदरम्यान) एकूण ५३८.५१ मिमी, तर सरासरी ७६.९७ मिमी इतका नोंदवला आहे. ठाण्यात ८७.१२, कल्याण ८०.६६, मुरबाड ६३.४७, उल्हासनगर ८१.४४, अंबरनाथ ७६.३०, भिवंडीत ८६.४६, शहापुरात ६३.०५ मिमी पाऊस झाला.
जिल्ह्यातील धरण क्षेत्रात पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावल्याने पाणीसाठाही वाढला आहे. त्यामध्ये मोडकसागर आणि तानसा ही धरणे जुलै महिन्यातच भरली आहेत. यामध्ये मोडकसागर धरणाचे ५ आणि ६ क्र मांकांचे दरवाजे दोन दिवसांपूर्वीच उघडून त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे, तर तानसा धरणाचे दरवाजे मंगळवारी उघडून विसर्ग सुरू झाला आहे. भातसामध्ये ७८ टक्के साठा झाल्यावर दरवाजे उघडण्यात येणार आहेत. सध्या ते धरण ७२.६२ टक्के इतके भरले आहे.
>पाणीपुरवठा करणारे सर्व तलाव काठोकाठ
मुंबईला पाणीपुरवठा करणारे सर्व तलाव काठोकाठ भरले आहेत. यापैकी चार तलाव भरून वाहू लागले आहेत. त्यामुळे मुंबईचे पाण्याचे टेन्शन मिटले आहे. हा आनंद पालिका प्रशासनाने स्थायी समितीत बुधवारी पेढे वाटून व्यक्त केला. जुलैच्या पहिल्याच पंधरवड्यात तुळशी, विहार, मोडक सागर, तानसा तलाव भरून वाहू लागले. तर अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, भातसा हे शासनाच्या अखत्यारितील तलावही भरले आहेत. तलावात आजच्या दिवशी सुमारे ११ लाख दशलक्ष लिटर जलसाठा आहे. मुंबईला वर्षभर सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी तलावात १४ लाख ४७ हजार दशलक्ष लिटर साठा आवश्यक आहे.

Web Title: After tansa, Modaksagar, Bhattsahi is filled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Damधरण