तब्बल ५ शस्त्रक्रिया आणि २० डायलिसीसनंतर कामगाराचा वाचला पाय

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 06:41 PM2019-01-24T18:41:41+5:302019-01-24T18:42:14+5:30

सिमेंट मिक्सर ट्रक पायावरुन गेल्याने एका बांधकाम कामगाराच्या निकामी होणाऱ्या पायावर तब्बल ५ शस्त्रक्रिया व अपघातामुळे किडन्यांवर झालेल्या संसर्गाला रोखण्यासाठी २० डायलिसीस केल्यानंतर त्याचा पाय वाचविण्यात मीरारोडच्या खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांना यश आले

After five surgeries and 20 dialysis, the worker's legs are is safe | तब्बल ५ शस्त्रक्रिया आणि २० डायलिसीसनंतर कामगाराचा वाचला पाय

तब्बल ५ शस्त्रक्रिया आणि २० डायलिसीसनंतर कामगाराचा वाचला पाय

Next

भाईंदर - सिमेंट मिक्सर ट्रक पायावरुन गेल्याने एका बांधकाम कामगाराच्या निकामी होणाऱ्या पायावर तब्बल ५ शस्त्रक्रिया व अपघातामुळे किडन्यांवर झालेल्या संसर्गाला रोखण्यासाठी २० डायलिसीस केल्यानंतर त्याचा पाय वाचविण्यात मीरारोडच्या खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांना यश आले आहे. सध्या त्या कामगाराची प्रकृती ठिक असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. 

कोलकत्ता येथून कामासाठी आलेल्या ३८ वर्षीय रणजीत शील हा मीरारोड येथील एका इमारतीच्या साईटवर काम करीत होता. १ नोव्हेंबर २०१८ रोजी त्याच्या उजव्या पायावरून सिमेंट मिक्सर ट्रक गेल्याने त्याच्या पायाची हाडे मोडली होती. त्यावेळी त्याला परिसरातीलच एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याच्यावर फ्रॅक्चर फिक्सेशन व रक्तवाहिन्या दुरुस्तीचा उपचार करण्यात आला. पण त्याच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा न होता त्याच्या किडनी व यकृतामध्ये जंतू संसर्ग होऊन दोन्ही किडन्या निकामी होऊ लागल्या. त्याची प्रकृती गंभीर होऊ लागल्याने त्याला तेथीलच एका अद्यावत खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. त्यावेळी रुग्णालयाचे अस्थीव्यंग शल्यविशारद डॉ. निखिल अग्रवाल यांनी रणजीतची वैद्यकीय तपासणी केली असता त्यांना त्याची किडनी व यकृताला जंतुसंसर्ग होऊन ते निकामी होण्याच्या मार्गावर असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे रणजीतचा जीव वाचवायचा असेल तर त्याचा पाय कापून तेथून होणारा जंतुसंसर्ग थांबविणे गरजेचे असल्याचे मत डॉ. अग्रवाल यांनी  व्यक्त केले. परंतु, त्याच्या पायावर शस्त्रक्रिया करुन तो पुन्हा जैसे थे करण्याचे आव्हान स्वीकारुन डॉ. अग्रवाल यांनी त्याच्या नातेवाईकांसोबत चर्चा केली. त्याला होकार मिळाल्यानंतर डॉक्टरांच्या पथकाने रणजीतच्या वैद्यकीय अहवालाचा अभ्यास करून त्याचा पाय वाचविण्याची प्रक्रीया सुरु केली.

सुरुवातीला त्याची किडनी पुर्वपदावर आणण्यासाठी तब्बल २० वेळा त्याच्यावर डायलिसीस करीत त्याला ९ बाटल्या रक्त चढविण्यात आले. त्यासोबत आधुनिक वैद्यकीय उपचार करून त्यांची किडनी व यकृत वाचविण्यात डॉक्टरांना यश आले. दरम्यान त्याच्या इतर अवयवांमध्ये कोणताही संसर्ग न होता एक महिन्यात त्याची किडनी व यकृत पुर्वपदावर आली. यावेळी त्याचा पाय वाचविण्यासाठी देखील डॉक्टरांकडून उपचार केले जात होता. तब्बल ५ वेळा डॉक्टरांना शस्त्रक्रिया केल्यानंतर दोन महिन्यांच्या उपचारानंतर त्याचा पाय वाचविण्यात डॉक्टरांना यश आले. सध्या त्याची प्रकृती स्थिर असुन तो वॉकरच्या सहाय्याने चालण्याचा प्रयत्न करीत आहे. येत्या दोन महिन्यांत रणजीत व्यवस्थित चालू शकेल, असे डॉ. अग्रवाल यांनी सांगितले. अशा अपघातांमध्ये अनेकवेळा हाताला अथवा पायाला गंभीर दुखापत झाल्याने शरीरात जंतुसंसर्ग होऊ नये, यासाठी तो अवयव कापण्याचा निर्णय घेतला जातो. परंतु, सध्या आधुनिक उपचार पद्धती उपलब्ध असल्याने त्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करुन रुग्णाचा अवयव शाबूत ठेवता येत असल्याचे डॉ. अग्रवाल यांनी सांगितले. 

Web Title: After five surgeries and 20 dialysis, the worker's legs are is safe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.