तीन लाखांच्या खंडणीसाठी दहा वर्षांच्या मुलाचे ठाण्यातून अपहरण करणारे भिवंडीत जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 10:47 PM2019-01-18T22:47:05+5:302019-01-18T23:00:27+5:30

तीन लाखांची खंडणी उकळण्यासाठी एका मध्यमवर्गीय कुटूंबातील दहा वर्षीय मुलाचे अपहरण करणाऱ्या कल्पनाथ आणि सिकंदर चौहान या दोन्ही भावांना ठाणे पोलिसांनी गुरुवारी अटक केली आहे. त्यांच्या तावडीतून या मुलाचीही सुखरुप सुटका केल्याने आई वडीलांनी पोलिसांचे आभार मानले.

Accused arrested, who kidnapped a ten-year-old boy from Thane for the ransom of Rs 3 lakh | तीन लाखांच्या खंडणीसाठी दहा वर्षांच्या मुलाचे ठाण्यातून अपहरण करणारे भिवंडीत जेरबंद

मुलाची ठाणे पोलिसांनी केली सुटका

Next
ठळक मुद्देमुलाची ठाणे पोलिसांनी केली सुटका वागळे इस्टेट आणि श्रीनगर पोलिसांची कामगिरी आई वडीलांनी मानले पोलिसांचे आभार

ठाणे: तीन लाखांच्या खंडणीसाठी सिनेस्टाईल दहा वर्षांच्या मुलाचे अपहरण करणा-या कल्पनाथ चौहान (५३) आणि त्याचा साथीदार भाऊ सिकंदर चौहान (४८, रा. एकतानगर, नारपोली, भिवंडी) या दोघांनाही वागळे इस्टेट आणि श्रीनगर पोलिसांच्या पथकांनी मोठया कौशल्याने अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी दिली. त्याच्या तावडीतून खंडणीतील तीन लाखांची रोकडसह या मुलाचीही सुखरुप सुटका करण्यात आली आहे.
वागळे इस्टेट भागात राहणारे योगेंद्रकुमार आणि मनिता जैस्वार यांचा मुलगा क्रिश (वय १० वर्ष पाच महिने) याचे अपहरण झाल्याची तक्रार त्यांनी १३ जानेवारी २०१९ रोजी दाखल केली होती. या मुलाच्या सुटकेसाठी तीन लाख रुपयांची खंडणी देण्याची मागणी चिठ्ठी आणि फोनद्वारे केल्याची माहितीही वागळे इस्टेट परिमंडळाचे पोलीस उपायुक्त अंबुरे यांना १७ जानेवारी रोजी मिळाली. तीन लाखांच्या खंडणीची रक्कम जैस्वार यांच्या घराजवळ राहणारा टीव्ही दुरुस्त करणारा कल्पनाथ चौहान याच्यामार्फतीने दादर रेल्वे स्थानक येथे पाठवून द्यावी, असेही एका चिठ्ठीद्वारे सांगण्यात आले होते. पण, याबाबत पोलिसांसह कुठेही वाच्यता केल्यास परिणाम वाईट होतील, असेही संबंधित खंडणीसाठी फोन करणा-याने योगेंद्रकुमार जैस्वार यांना बजावले होते. ही माहिती मिळताच अंबुरे यांनी वागळे इस्टेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अफजल पठाण आणि श्रीनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुलभा पाटील यांच्या नेतृत्वाखाली चार वेगवेगळी पथके तयार केली. तीन लाखांची रक्कम नेतांना कल्पनाथ चौहान हा एकटा दादर रेल्वे स्थानक येथे येईल. त्याठिकाणी आल्यावर तो फोन करेल त्यानंतर एका कारमध्ये ही रक्कम चौहान कारमधील व्यक्तीच्या ताब्यात देईल, त्यानंतर कार पुण्याला गेल्यानंतर मुलाची सुटका केली जाईल, असेही अपहरण कर्त्यांनी जैस्वार यांना बजावले होते. सहायक पोलीस आयुक्त प्रकाश निलेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पठाण, पाटील आणि सुनिल पंधरकर पोलीस उपनिरीक्षक आर. एस. गोसावी, अनिकेत पोटे तसेच स्थानिक नागरिक हैदर खान, मोहम्मद सय्यद, इम्रान शेख, इस्तीयान शेख आणि सलमान यांच्यासह दहा ते १५ जणांच्या पथकाने साध्या वेशातून काही स्थानिक नागरिकांच्या मदतीने सापळा लावला. त्यानुसार जैस्वार यांच्या घराजवळ, इंदिरानगर नाका, वागळे इस्टेट आदी ठिकाणी पोलीस कर्मचा-यांना नेमण्यात आले. ठरल्याप्रमाणे योगेंद्रकुमार हे स्वत:कडील आणि काही कर्जाऊ रक्कम अशी तीन लाखांची रोकड घेऊन कल्पनाथ याच्याकडे दिली. त्यावेळी सापळयातील पोलिसांनी एकमेकांशी संपर्क साधून त्याच्यावर पाळत ठेवली. काहींनी रिक्षा, जीप आणि मोटारसायकलद्वारे त्याच्या नकळत त्याचा पाठलाग केला. त्याने दादरला जाण्याऐवजी रिक्षाने माजीवडा मार्गे भिवंडीतील अंजूरफाटा येथे पोहचला. जैस्वार यांना मात्र त्याने आपण मीरा रोडला पोहचल्याचे सांगितले. प्रत्यक्षात तो भिवंडीच्या अंजूरफाटा येथे असल्याने त्याच्यावर पोलिसांचा संशय बळावला. तो नारपोली, एकतानगर येथील एका घरात शिरल्यानंतर त्याच्या मागावर असलेल्या पोलिसांनी त्याला पकडले. त्याच्या तावडीतून क्रिशची सुखरुप सुटकाही केली आणि तीन लाखांची रोकडही हस्तगत करण्यात आली. यामध्ये कल्पनाथ हाच सूत्रधार असल्याचेही स्पष्ट झाले. या दोघांनाही गुरुवारी रात्री १०.३० वा. च्या सुमारास अटक करण्यात आली.

 

Web Title: Accused arrested, who kidnapped a ten-year-old boy from Thane for the ransom of Rs 3 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.