सव्वापाच कोटींचा ‘टीएमटी’त घोटाळा, दोषी ठेकेदार मात्र मोकाट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 01:53 AM2018-08-16T01:53:33+5:302018-08-16T01:53:57+5:30

ठाणे परिवहनसेवेचा उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसत नसला, तरी येथे होणारे घोटाळे मात्र नेहमीच चर्चेत राहिले आहेत. आता पाच कोटींच्या जाहिरात घोटाळ्यामुळे परिवहन सेवा पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

5.25 crores' TMT scam, guilty contractors only | सव्वापाच कोटींचा ‘टीएमटी’त घोटाळा, दोषी ठेकेदार मात्र मोकाट

सव्वापाच कोटींचा ‘टीएमटी’त घोटाळा, दोषी ठेकेदार मात्र मोकाट

ठाणे - ठाणे परिवहनसेवेचा उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसत नसला, तरी येथे होणारे घोटाळे मात्र नेहमीच चर्चेत राहिले आहेत. आता पाच कोटींच्या जाहिरात घोटाळ्यामुळे परिवहन सेवा पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. बसथांब्यांवरील जाहिरातींपोटी ठेकेदाराने सव्वाचार वर्षांत केवळ २१ लाख ७२ हजारांचा जाहिरात करभरणा महापालिकेच्या तिजोरीत केला आहे. ही रक्कम अपेक्षित कराच्या केवळ २.५ टक्के इतकी असून, या ठेकेदाराने परिवहनसेवेचे तब्बल सव्वापाच कोटी रुपये बुडवल्याचे निदर्शनास आले आहे. भरिस भर, या ठेकेदाराचा ठेका रद्द न करताच नव्या ठेकेदाराला बसथांब्यांवरील जाहिराती देण्यासाठी परिवहन प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत.
बसथांब्यांवरील जाहिरातींचा ठेका देण्यासंदर्भातील प्रस्ताव येत्या २० आॅगस्टच्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवले आहे. परिवहनसेवेमार्फत ४७० बसथांब्यांवर जाहिरात करण्याचे हक्क मे. सोल्युशन अ‍ॅडव्हर्टायझिंगला दिले होते. बीओटी तत्त्वावर हे बसथांबे बांधण्याबरोबरच कंपनीने टीएमटीला युरो थ्री कॅटेगरीमधील नऊ सेमी लोफ्लोअर बसेस विकत घेऊन देण्याची अट निविदेत होती. मात्र, सुरुवातीपासूनच हा ठेका वादाच्या भोवºयात सापडला आहे. बस आणि बसथांब्यांचा दर्जा, त्याठिकाणी अपेक्षित असलेल्या सोयीसुविधा देण्यात ठेकेदार अपयशी ठरला. त्यामुळे परिवहन समिती, स्थायी समितीच्या बैठकीत तसेच महासभेत ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्याची मागणी वारंवार झाली आहे. हा वाद थेट न्यायालयापर्यंत गेला होता. या ठेकेदारामार्फत टीएमटीच्या बसथांब्यांवर ज्या जाहिराती प्रदर्शित होतात, त्यापोटी जाहिरातकर पालिकेला अदा करण्याची अट मूळ निविदेत होती. मात्र, नियमानुसार करभरणा होत नसल्याची तक्रार आयुक्तांकडे आल्यानंतर जानेवारी आणि एप्रिल, २०१८ या दोन महिन्यांत पालिकेने बसथांब्यांवरील जाहिरातींचे सर्वेक्षण केले. त्यात एकूण ५५ बसथांब्यांवर जाहिराती प्रसिद्ध होत असल्याचे निष्पन्न झाले. मात्र, १० जून २०१३ ते ३१ डिसेंबर २०१७ या कालावधीत जाहिरातकरापोटी पालिकेच्या तिजोरीत केवळ २१ लाख ७२ हजार रु पयेच जमा झाल्याची माहिती पुढे आली आहे. त्यानंतर, या कंपनीच्या जाहिरातींची सखोल चौकशी केली असता ठेकेदाराने तब्बल पाच कोटी २० लाखांचा महसूल बुडवल्याचा साक्षात्कार परिवहनला झाला. करारानुसार या कंपनीकडे जाहिरात प्रदर्शनाचे आणखी सहा वर्षांचे अधिकार असतानाही करार रद्द करण्याच्या हालचाली सुरू आहेत.

ठेकेदाराने बुडवलेला महसूल जमा करण्यासाठी कारवाई करणार असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. मात्र, करारनामा अद्याप रद्द झालेला नसतानाही पालिकेने ४७० बसथांब्यांवरील जाहिरातींसाठी नव्याने ठेकेदार नेमण्याच्या हालचाली सुरू केल्यात. नवा ठेकेदार नेमल्यानंतर जुन्या ठेकेदाराने बुडवलेल्या सव्वा पाच कोटींचे काय, हा प्रश्न सध्यातरी अनुत्तरित आहे.

Web Title: 5.25 crores' TMT scam, guilty contractors only

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.