पंकज रोडेकर 
ठाणे : अभ्यास कर, असे जरी आईवडील ओरडले, तरी मुलांना तो आपला अपमान वाटतो. त्याचाच राग मनात धरून घर सोडणाºया, हरवलेल्या आणि अपहरण झालेल्या १५ मुलामुलींना ठाणे शहर पोलिसांच्या चाइल्ड प्रोटेक्शन युनिटने मागील १० दिवसांत पुन्हा स्वगृही पाठवले. या पथकाला एकाच दिवशी ९ मुलांना घरी पाठवण्यात यश आले. मुले घरी परतल्यानंतर त्यांच्या चेहºयांवर पुन्हा एकदा मुस्कान पाहण्यास मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले.
ठाणे शहर पोलीस (प्रशासन) सहायक पोलीस आयुक्त बाजीराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच चाइल्ड प्रोटेक्शन युनिटची धुरा हाती घेणाºया सहायक पोलीस निरीक्षक प्रीती चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक ९यशवंत सोनावणे आणि अमृता चवरे यांच्या पथकातील सहायक पोलीस उपनिरीक्षक ए.ए. शेख, पोलीस हवालदार प्रतिमा मनोरे,एन.डी.चव्हाण,पोलीस नाईक रोहिणी सावंत, कैलास जोशी,बी.बी. शिंगारे, प्रमोद पालांडे, पी.सी.पाटील यांनी अपहरण झालेल्या तसेच बालगृहात दाखल असलेल्या मुलामुलींचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यानुसार, मागील १० दिवसांत १५ मुलांना स्वगृही धाडले असून त्यामध्ये ६ मुली असून उर्वरित ९ मुले आहेत. ती १६ वर्षांखालील असून छोट्याछोट्या कारणांवरून पालक ओरडल्याने त्यांनी घरातून पळ काढल्याचे समोर आले. तसेच त्या मुलांना घरी सोडण्यापूर्वी त्यांचे समुपदेशन केले जाते, असे सांगितले.

दोन बहिणी परतल्या
भिवंडी,शांतीनगर येथील ८ ते १० वर्षीय दोन बहिणींना काकाकडे सुरतला जायचे होते.त्यामुळे त्या घराबाहेर खेळण्यासाठी जातो, असेसांगून त्यांनी कल्याण रेल्वे स्थानकात गाठले.त्या मुंबईकडे जाणाºया लोकलमध्ये बसल्या.दरम्यान,त्यांना रेल्वे पोलिसांनी पकडल्याने त्या मानखुर्द बालगृहात दाखल झाल्या होत्या.त्या युनिटमुळे तीन दिवसांतच स्वगृही परतल्या आहेत.

व्हिडीओ कॉलिंग ओळख : १५ दिवसांपूर्वीच उत्तर प्रदेशमधील डोंगरी आणि मानखुर्द बालसुधारगृहात भाऊ व बहीण दाखल झाले होते.त्यांनी दिलेल्या शाळेच्या नावावरून त्यांची ओळख पुढे आल्याने त्यांच्या पालकांशी व्हिडीओ कॉलिंगद्वारे त्यांची ओळख पटल्यावर त्यांना स्वगृही धाडले आहे.
तीन ते चारवर्षीय दोन मुले परतली : कळवा, भोलाईनगर येथील आई आपल्या ३ ते ४ वर्षीय मुलांना घेऊन ठाण्यात आली होती. त्यावेळी ती हरवली. सुदैवाने त्यांना रात्री दक्ष नागरिकांनी कोपरी पोलिसांच्या ताब्यात दिले. दुसºयाच दिवशी पालकांचा शोध घेऊन या युनिटने अवघ्या २४तासांत ती मुले घरी परतली.