निकाल येण्यास १३ ते १५ तास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 11:42 PM2019-05-20T23:42:11+5:302019-05-20T23:42:33+5:30

ठाणे, कल्याण, भिवंडी निवडणूक : व्हीव्हीपॅटच्या मोजणीमुळे कालावधी वाढणार

13 to 15 hours to get the results | निकाल येण्यास १३ ते १५ तास

निकाल येण्यास १३ ते १५ तास

ठाणे / डोंबिवली : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी होत असून त्याकरिता ठाणे, कल्याण व भिवंडी लोकसभा मतदारसंघातील निवडणूक यंत्रणाही सज्ज झाली आहे. या मतदारसंघांत मतमोजणीकरिता १३ ते १५ तास लागतील, असा निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांचा अंदाज आहे.


ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले की, पंचेचाळीस मिनिटांमध्ये एक राऊंड या गतीने ईव्हीएममधील मते तर एक तासात व्हीव्हीपॅटची मते या गतीने मतमोजणी होईल. ईव्हीएमची मते मोजण्यास प्रारंभी जरा जास्त काळ लागला तरी कालांतराने ३५ मिनिटांमध्ये एक राऊंड पूर्ण होऊ शकतो. एका विधानसभा मतदारसंघाकरिता १४ टेबल लावण्यात येणार आहेत. मीरा-भाईंदर व मुरबाड येथे ४५० मतदान केंद्रे आहेत तर काही ठिकाणी २८० मतदान केंद्रे आहेत. त्यानुसार तेथील मतमोजणीला कालावधी लागणार आहे. मुदलात ठाणे व भिवंडी येथील मतमोजणीकरिता साडेतेरा तास लागतील, असा अंदाज आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे राजन विचारे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे आनंद परांजपे यांच्यात तर भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजपचे कपिल पाटील विरुद्ध काँग्रेसचे सुरेश टावरे यांच्यात लढत आहे.


कल्याण लोकसभा मतदारसंघात ३१ फेऱ्यांपर्यंत मोजणी होणार असल्याने निकाल येण्यासाठी १५ तास लागणार आहेत. गुरुवारी सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. तर, साधारण रात्री ११ ते ११.३० च्या आसपास निकाल जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
२९ एप्रिलला झालेल्या मतदानाच्या दिवशी कल्याण लोकसभा मतदारसंघात ४५.२८ टक्के इतके मतदान झाले. या मतदारसंघात २८ उमेदवार निवडणूक रिंगणात असले तरी शिवसेनेचे डॉ. श्रीकांत शिंदे आणि राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील यांच्यातच खरी लढत पाहायला मिळाली. आता निकालाच्या दिवशी कोणाच्या पारड्यात विजयाचे दान पडते, कोण किती मताधिक्याने जिंकतो, तर मागील मताधिक्य कमी होते, अशा एक ना अनेक चर्चांना उधाण आले आहे.


निवडणूक आयोगाने मतमोजणीसाठी जय्यत तयारी केली आहे. त्यासाठी अधिकारी आणि कर्मचारी, असे ६०० जण या प्रक्रि येत सहभागी होणार आहेत. मतमोजणीच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ३०० पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे. त्यातील १२५ पोलीस कर्मचारी हे मतमोजणी केंद्राच्या आसपास तैनात केले जाणार आहेत. मतमोजणीची प्रक्रिया पूर्वेतील हभप सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडासंकुलाच्या आवारातील सुरेंद्र बाजपेयी बंदिस्त क्रीडागृहात सकाळी ८ वाजल्यापासून सुरू होणार आहे. कल्याण मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यामुळे ईव्हीएम मशीनमधील मते मोजण्यासाठी प्रत्येक विधानसभानिहाय १४ आणि पोस्टल मतांच्या मोजणीसाठी चार अशी एकूण ८८ टेबल लावली जाणार आहेत. प्रारंभी पोस्टल मतांची मोजणी होईल. त्यानंतर, ईव्हीएम मशीनमधील मते मोजली जातील. प्रत्येक टेबलावर मोजणीसाठी चार कर्मचारी असतील.

सर्वाधिक ३१ फेºया कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात असून कमीतकमी २० फेºया उल्हासनगर विधानसभा मतदारसंघासाठी राहणार आहेत. दरम्यान, क्रीडासंकुलाबाहेरील घरडा सर्कलकडे डोंबिवलीच्या दिशेने जाणारा रस्ता बुधवारी मध्यरात्री १२ वाजल्यापासूनच पूर्णपणे बंद केला जाणार आहे. निकालाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तो खुला केला जाईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी शिवाजी कादबाने यांनी दिली.

व्हीव्हीपॅटची तपासणी शेवटी
प्रारंभी पोस्टलनंतर ईव्हीएम आणि सर्वात शेवटी व्हीव्हीपॅटमधील मते तपासली जाणार आहेत. विधानसभानिहाय प्रत्येकी पाच मशीन अशा एकूण ३० मशीन तपासल्या जाणार असल्याचे कादबाने म्हणाले. यानंतरच, अंतिम निकाल जाहीर होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: 13 to 15 hours to get the results

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.