‘टायगर’साठी २४ तासांत १० लाख, मृत्यूशी झुंज सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2019 03:05 AM2019-02-08T03:05:12+5:302019-02-08T03:06:08+5:30

गटारापाशी सापडलेल्या टायगर नावाच्या नवजात बालकाच्या डोक्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली असली, तरी त्याची मृत्यूशी झुंज संपत नसल्याने, उल्हासनगरात चितेंचे वातावरण आहे.

10 lack in 24 hours for 'Tiger', start fighting death | ‘टायगर’साठी २४ तासांत १० लाख, मृत्यूशी झुंज सुरूच

‘टायगर’साठी २४ तासांत १० लाख, मृत्यूशी झुंज सुरूच

- सदानंद नाईक

उल्हासनगर : गटारापाशी सापडलेल्या टायगर नावाच्या नवजात बालकाच्या डोक्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली असली, तरी त्याची मृत्यूशी झुंज संपत नसल्याने, उल्हासनगरात चितेंचे वातावरण आहे. त्याच्यावरील उपचारासाठी मदतीचे आवाहन करताच वाडिया रुग्णालयाच्या खात्यात एका दिवसात १० लाखांचा निधी जमा झाल्याची माहिती ‘टायगर बचाओ’ मोहिमेचे शिवाजी रगडे यांनी दिली.
वडोलगावच्या नालीत ३० डिसेंबर रोजी नवजात बालक सापडले. या बाळावर मध्यवर्ती रुग्णालयाने उपचार सुरू केले. गटाराच्या पाण्याने त्याच्या रक्तात संसर्ग झाल्याचे उघड झाले. तो बरा होत नाही, तोच डोक्याला संसर्ग झाल्याचे उघड झाले. त्यामुळे रगडे यांनी पदरमोड करून त्याला खाजगी रुग्णालयात हलवण्याचा सल्ला पोलिसांना दिला. त्याकरिता, न्यायालयातून परवानगी मिळवली. खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मेंदूत पाणी झाल्याचे उघड झाल्याने टायगरला मुंबईतील वाडिया रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याच्या डोक्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली. मात्र, बुधवारी रात्री त्याला पुन्हा उलट्या झाल्याने, पुढील उपचारासाठी पैशांची गरज निर्माण झाली. रगडे यांनी रुग्णालयाकडे मदतीची विनंती केली. त्यांनी नियमानुसार खाजगी संस्था ‘केटा’ला मदतीचे आवाहन करण्यास सांगितले. ‘केटा’ने आवाहन करताच, एका दिवसात १० लाखांचा निधी जमा झाला. यातून पुढील उपचार होणार असून टायगर लवकर बरा होईल, अशी आशा रगडे दाम्पत्याने व्यक्त केली.

उल्हासनगरचा आयकॉन

सव्वा महिन्याच्या टायगरचे नाव शहरातील प्रत्येकाच्या तोंडी असून तो उल्हासनगरमध्ये संघर्षाचा, जिद्दीचा आयकॉन झाला आहे. टायगर हा प्रत्येकाच्या घरातील सदस्य झाला आहे. टायगर लवकरच ठणठणीत बरा होऊन शहरात परत यावा, अशी प्रार्थना जागोजागी करण्यात येत आहे.

Web Title: 10 lack in 24 hours for 'Tiger', start fighting death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.