युकी भांबरीची स्वप्नवत वाटचाल खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 04:13 AM2018-03-15T04:13:33+5:302018-03-15T04:13:33+5:30

भारताचा स्टार टेनिसपटू युकी भांबरी याची एटीपी इंडियन वेल्स टेनिस स्पर्धेतील शानदार वाटचाल अखेर तिसऱ्या फेरीत रोखली गेली.

Yuki Bhambri's dream journey breaks | युकी भांबरीची स्वप्नवत वाटचाल खंडित

युकी भांबरीची स्वप्नवत वाटचाल खंडित

googlenewsNext


इंडियन वेल्स (यूएस) : भारताचा स्टार टेनिसपटू युकी भांबरी याची एटीपी इंडियन वेल्स टेनिस स्पर्धेतील शानदार वाटचाल अखेर तिसऱ्या फेरीत रोखली गेली. जागतिक क्रमवारीत २१व्या स्थानी असलेल्या अमेरिकेच्या सॅम क्वेरी याला तीन सेटपर्यंत झुंजवल्यानंतरही युकीला स्पर्धेतील आपला गाशा गुंडाळावा लागला.
भारताचा अव्वल एकेरी टेनिसपटू असलेल्या युकीने स्पर्धेच्या दुसºया फेरीत खळबळजनक निकालाची नोंद करताना जागतिक क्रमवारीत १२व्या स्थानी असलेल्या लुकास पोउली याला नमवले होते. यामुळे तिसºया फेरीत सॅमपुढे कडवे आव्हान होते. मात्र, विम्बल्डनच्या उपांत्य फेरीपर्यंत मजल मारलेल्या सॅमने युकीला आणखी एक अनपेक्षित निकाल नोंदवण्यापासून रोखत ६-७, ६-४, ६-४ असे पराभूत केले. २ तास २२ मिनिटांपर्यंत रंगलेल्या या रोमांचक सामन्यात युकीने पहिला सेट जिंकून पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधले. परंतु, यानंतर त्याला आपल्या कामगिरीत सातत्य राखण्यात अपयश आले. त्याचवेळी, सॅमने आपला सर्व अनुभव पणास लावताना मोक्याच्या वेळी गुणांची कमाई करत युकीला चुका करण्यास भाग पाडून त्याचा अचूक फायदा घेत सॅमने सलग दोन सेट जिंकताना विजयी आगेकूच केली. (वृत्तसंस्था)
पोउली आणि सॅम यांच्याविरुद्ध खेळण्याचा अनुभव पूर्ण वेगळा होता. हे दोघेही वेगळ्याप्रकारचे प्रतिस्पर्धी आहेत. सॅमची सर्विस भेदक आहे आणि त्याचा खेळ यावर खूप प्रमाणात निर्भर आहे. आमच्या सामन्यात हाच एक फरक राहिला. तिसºया सेटच्या सुरुवातीला सर्विस गमावणे कठिण राहिले. यानंतर मी पुनरागमनाचा प्रयत्न केला, परंतु दमदार सर्विस करणाºया खेळाडूविरुद्ध हे कठिण होते. या स्पर्धेनंतर माझा आत्मविश्वास वाढला असून माझ्यामते मी कोणालाही नमवू शकतो. यासाठी मला संधी निर्माण कराव्या लागतील.
- युकी भांबरी
पहिला सेट जिंकल्यानंतर युकीकडून आणखी एका मोठ्या विजयाची अपेक्षा होती. मात्र अनुभवामध्ये तो कमी पडला. त्याचवेळी सॅमने केलेल्या पुनरागमनानंतर दडपणाखाली झालेल्या चुका युकीला महागात पडल्या.
जागतिक क्रमवारीत सध्या युकी ११०व्या स्थानी असून सोमदेव देववर्मननंतर इंडियन वेल्सच्या तिसºया फेरीत पोहचणारा तो केवळ दुसरा भारतीय ठरला. याआधी २०११ साली सोमदेवने या स्पर्धेच्या चौथ्या फेरीत धडक मारली होती. त्याचवेळी, ही स्पर्धा युकीसाठी फायदेशीर ठरली. त्याने दोन वेळचा दुहेरी ग्रँडस्लॅम विजेता निकोलस माहुत आणि पोउली यांना पराभूत करुन आपली छाप पाडली. या कामगिरीनंतर युकीला ६१ एटीपी गुणांचा फायदा होणार असून याजोरावर तो पुन्हा जागतिक क्रमवारीत अव्वल १०० स्थानांमध्ये येऊ शकतो.
सिलिचचे
आव्हान संपुष्टात
स्पर्धेत दुसरे मानांकन लाभलेल्या मारिन सिलिच याचे आव्हान तिसºया फेरीत संपुष्टात आले असून त्याला जर्मनीच्या फिलिप कोलश्राइबर याने नमवले. फिलिपने जबरदस्त खेळाचे प्रदर्शन करताना एकतर्फी विजयासह ६-४, ६-४ अशी बाजी मारत सिलिचला स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला. तसेच, जुआन मार्टिन डेल पोत्रो याने डेव्हिड फेररविरुद्ध आपला दबदबा कायम राखताना ६-४, ७-६ असा विजय मिळवला. कॅनडाच्या मिलोस राओनिच यानेही विजयी आगेकूच करताना पोर्तुगालच्या जोओ सोसा याचे आव्हान ७-५, ४-६, ६-२ असे संपुष्टात आणले.
व्हिनस, हालेप
यांची आगेकूच
जागतिक क्रमवारीतील अव्वल महिला खेळाडू सिमोना हालेप आणि दिग्गज
व्हिनस विलियम्स यांनी आपआपल्या सामन्यात बाजी मारताना इंडियन वेल्स स्पर्धेत विजयी घोडदौड कायम राखली.
हालेपने चीनच्या वाँग कियांग हिचे कडवे आव्हान ७-५, ६-१ असे परतावले. त्याचवेळी दिग्गज व्हिनसने अनास्तासिया सेवास्तोवा हिला ७-६, ६-४ असे पराभूत केले. याआधी व्हिनसने आपली लहान बहिण सेरेनाला पराभवाचा धक्का दिला होता.
त्याचवेळी, अन्य एका लढतीत रशियाच्या डारिया कासात्किना हिने स्पर्धेतील सनसनाटी विजय मिळवताना आॅस्टेÑलियन ओपन विजेत्या कॅरोलिन वोज्नियाकी हिला ६-४, ७-५ असा धक्का दिला. पुढील फेरीत डारियापुढे बलाढ्य अँजेलिक केर्बरचे तगडे आव्हान असेल.

Web Title: Yuki Bhambri's dream journey breaks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.