दिग्गज रॉजर फेडररची उपांत्य फेरीत धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 01:27 AM2018-03-17T01:27:14+5:302018-03-17T01:27:14+5:30

जागतिक क्रमवारीतील अव्वल टेनिसपटू आणि गतविजेत्या दिग्गज रॉजर फेडरर याने इंडियन वेल्स एटीपी स्पर्धेत दिमाखदार विजय मिळवताना उपांत्य फेरीत धडक मारली.

Veteran Roger Federer is in the semifinals | दिग्गज रॉजर फेडररची उपांत्य फेरीत धडक

दिग्गज रॉजर फेडररची उपांत्य फेरीत धडक

Next


इंडियन वेल्स (यूएस) : जागतिक क्रमवारीतील अव्वल टेनिसपटू आणि गतविजेत्या दिग्गज रॉजर फेडरर याने इंडियन वेल्स एटीपी स्पर्धेत दिमाखदार विजय मिळवताना उपांत्य फेरीत धडक मारली. फेडररने कोरियाच्या चुंग ह्योंग याचे कडवे आव्हान सरळ दोन सेटमध्ये परतावून बाजी मारली. अन्य एका सामन्यात क्रोएशियाच्या बोर्ना कोरिच याने शानदार विजय मिळवताना दक्षिण आफ्रिकेच्या केविन अँडरसन याचा पराभव केला.
विक्रमी सहाव्या इंडियन वेल्सचे जेतेपद पटकावण्याच्या प्रयत्नात असलेल्या दिग्गज फेडररने आपल्या लौकिकासुनार कामगिरी करताना ह्युंगला सरळ दोन सेटमध्ये ७-५, ६-१ असे नमविले. पहिल्या सेटमध्ये ह्युंगकडून कडवी झुंज मिळाल्यानंतर फेडररने तुफानी खेळ करत सहज बाजी मारताना आपला दर्जा दाखवून दिला. फेडररने ह्युंगविरुद्ध आपल्या सर्विसवर एकूण ७०% गुण मिळवले. त्याचवेळी फेडररने चार वेळा ह्युंगची सर्विस भेदली. एकूण एक तास २३ मिनिटांपर्यंत रंगलेल्या या सामन्यात फेडररने आपल्या अनुभवाच्या जोरावर ह्युंगवर सहज वर्चस्व राखले.
अन्य सामन्यात कोरिच याने उपांत्य फेरी गाठताना युवा केविन अँडरसनचा चुरशीच्या लढतीत पराभव केला. पहिला सेट मोठ्या फरकाने गमावल्यानंतर जबरदस्त पुनरागमन केलेल्या कोरिचने झुंजार खेळाचे प्रदर्शन करताना सलग दोन सेट जिंकले आणि अँडरसनचे कडवे आव्हान २-६, ६-४, ७-६ असे परतावले. (वृत्तसंस्था)
व्हिनसची आगेकूच
महिलांमध्ये दिग्गज व्हिनस विलियम्सने आपल्या लौकिकानुसार कामगिरी करताना उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. सात ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावलेल्या व्हिनसने एकतर्फी झालेल्या सामन्यात स्पेनच्या कार्ला सुआरेज नावारो हिचा ६-३, ६-२ असा धुव्वा उडवला.
विशेष म्हणजे या स्पर्धेत २००१ सालानंतर पहिल्यांदा व्हिनस अंतिम चार खेळाडूंमध्ये पोहचली आहे. त्यावेळी, दुखापतीमुळे व्हिनसने उपांत्य सामन्यातून माघार घेतली होती आणि अनेक वर्ष ती या स्पर्धेपासून दूर राहिली होती.
उपांत्य सामन्यात व्हिनसचा सामना रशियाच्या २० वर्षीय दारिया कासातकिनाविरुद्ध होईल. सध्या व्हिनसचा सुरु असलेला धडाका पाहता तिचा विजय निश्चित मानला जात आहे.
उपांत्य फेरी गाठत फेडररने जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थान आणखी मजबूत केले. गतमहिन्यात रोटरडम स्पर्धेत कारकिर्दीतील ९७ वे जेतेपद पटकावून फेडरर अव्वल स्थानी विराजमान झाला होता. विशेष म्हणजे अशी कामगिरी करणारा सर्वात बुजुर्ग खेळाडू म्हणून फेडररने विक्रम नोंदवला.

Web Title: Veteran Roger Federer is in the semifinals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.