यूएस ओपनमध्ये निशिकोरी, ओसाका उपांत्य फेरीत; पहिल्यांदाच ग्रँडस्लॅममध्ये दोन जपानी खेळाडू अव्वल चारमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2018 12:33 AM2018-09-07T00:33:13+5:302018-09-07T00:33:26+5:30

यूएस ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत जपानी खेळाडूंचा जलवा पाहण्यास मिळाला. पुरुष एकेरीमध्ये केइ निशिकोरी याने पाच सेटपर्यंत रंगलेल्या रोमांचक सामन्यात मरिन सिलिचचे कडवे आव्हान परतावून उपांत्य फेरी गाठली.

Nishikori in US Open, Osaka in semis For the first time in the Grand Slam, two Japanese players are in the top four | यूएस ओपनमध्ये निशिकोरी, ओसाका उपांत्य फेरीत; पहिल्यांदाच ग्रँडस्लॅममध्ये दोन जपानी खेळाडू अव्वल चारमध्ये

यूएस ओपनमध्ये निशिकोरी, ओसाका उपांत्य फेरीत; पहिल्यांदाच ग्रँडस्लॅममध्ये दोन जपानी खेळाडू अव्वल चारमध्ये

Next

न्यूयॉर्क : यूएस ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत जपानी खेळाडूंचा जलवा पाहण्यास मिळाला. पुरुष एकेरीमध्ये केइ निशिकोरी याने पाच सेटपर्यंत रंगलेल्या रोमांचक सामन्यात मरिन सिलिचचे कडवे आव्हान परतावून उपांत्य फेरी गाठली. उपांत्य सामन्यात निशिकोरीचा सामना दिग्गज खेळाडू सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचशी होईल. दुसरीकडे, महिलांमध्ये नाओमी ओसाकाने लेसिया सुरेंकोचा धुव्वा उडवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. विशेष म्हणजे गेल्या २२ वर्षांत कोणत्याही ग्रँडस्लॅम स्पर्धेची उपांत्य फेरी गाठणारी नाओमी पहिली जपानी महिला टेनिसपटू ठरली.
४ तास आणि ८ मिनिटांपर्यंत रंगलेल्या अत्यंत अटीतटीच्या लढतीत निशिकोरीने क्रोएशियाच्या सिलिचचे कडवे आव्हान २-६, ६-४, ७-६(७-५), ४-६, ६-४ असे परतावले. या शानदार विजयासह निशिकोरीने २०१४ साली झालेल्या अंतिम सामन्यात सिलिचकडून झालेल्या पराभवाचाही वचपा काढला. मनगटाच्या दुखापतीमुळे गेल्या वर्षी यूएस ओपनपासून दूर राहिलेल्या निशिकोरीआधी महिलांमध्ये नाओमीने उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला. विशेष म्हणजे पहिल्यांदाच एकाच ग्रँडस्लॅमच्या दोन्ही गटांमध्ये जपानी खेळाडूंनी उपांत्य फेरी गाठली आहे.
अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी निशिकोरीला १३ ग्रँडस्लॅम विजेत्या जोकोविचच्या तगड्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. जोकोविचने सरळ तीन सेटमध्ये विजय मिळवताना यंदा जायंट किलर ठरलेल्या जॉन मिलमैनचा ६-३, ६-४, ६-४ असा धुव्वा उडवला. मिलमैनने या सामन्याआधी दिग्गज रॉजर फेडररचे आव्हान संपुष्टात आणले होते. (वृत्तसंस्था)

२२ वर्षांतील पहिली जपानी खेळाडू
महिलांमध्ये जपानच्या नाओमी ओसाकाने विक्रमी विजय मिळवताना युक्रेनच्या लेसिया सुरेंको हिचा ६-१, ६-१ असा धुव्वा उडवला. २२ वर्षांनंतर ग्रँडस्लॅम उपांत्य फेरी गाठणारी ती पहिली जपानी महिला ठरली.
१९९६ साली विम्बल्डनच्या उपांत्य फेरीत जपानच्या किमिको डेटने प्रवेश केला होता. त्या वेळी नाओमीचा जन्मही झाला नव्हता. आता शनिवारी होणाऱ्या उपांत्य सामन्यात नाओमी अमेरिकेच्या मेडिसन कीजच्या आव्हानाचा सामना करेल. कीजने स्पेनच्या कार्ला सुआरेजचा ६-४, ६-३ असा पराभव करत विजयी आगेकूच केली.

Web Title: Nishikori in US Open, Osaka in semis For the first time in the Grand Slam, two Japanese players are in the top four

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.