प्रत्येक क्रीडा संघटनेने बीसीसीआय कार्यप्रणालीचा करावा अभ्यास- सोमदेव देववर्मन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2018 04:44 AM2018-12-15T04:44:05+5:302018-12-15T06:56:36+5:30

भारताच्या माजी टेनिसपटूने व्यक्त केले स्पष्ट मत

Every sports organization should practice the BCCI functioning - Somdev Devvarman | प्रत्येक क्रीडा संघटनेने बीसीसीआय कार्यप्रणालीचा करावा अभ्यास- सोमदेव देववर्मन

प्रत्येक क्रीडा संघटनेने बीसीसीआय कार्यप्रणालीचा करावा अभ्यास- सोमदेव देववर्मन

Next

- रोहित नाईक 

नवी मुंबई : ‘खेळाच्या प्रगतीसाठी प्रत्येक क्रीडा संघटनाने बीसीसीआयच्या कार्यप्रणालीचा अभ्यास करायला पाहिजे. जेव्हा भारतीय क्रीडाक्षेत्रात व्यवस्थापन नाही, असे म्हटले जाते, तेव्हा त्यातून क्रिकेटला बाजूला ठेवावे लागेल. कारण क्रिकेटला अचूक आणि भक्कम व्यवस्थापन आहे. त्यामुळेच आज भारतात क्रिकेट अव्वल आहे,’ असे स्पष्ट मत भारताचा माजी टेनिसपटू सोमदेव देववर्मन याने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.

नेरुळ येथील डॉ. डी. वाय. क्रीडा अकादमी येथे सुरू असलेल्या स्पोर्ट्स फॉर ऑल आंतर शालेय क्रीडा स्पर्धेला उपस्थिती दर्शविलेल्या सोमदेवने ‘लोकमत’शी संवाद साधला. त्याने म्हटले की, ‘क्रिकेट खेळामध्ये शालेय स्तरापासून अचूक व्यवस्थापन आहे. सचिन-धोनीसारखे दिग्गज याच व्यवस्थापनातून पुढे आले आहेत. त्यामुळे इतर खेळांनीही क्रिकेटचे व्यवस्थापन शिकणे गरजेचे आहे. शिवाय भारतात क्रिकेट संस्कृती खोलपर्यंत रुजलेली आहे. अशी संस्कृती प्रत्येक खेळाला रुजवता आली पाहिजे. हे शक्य झाले, तरच खऱ्या अर्थाने देशात क्रीडासंस्कृती निर्माण होईल.’

भारतीय टेनिसविषयी सोमदेव म्हणाला, ‘भारतीय टेनिसचा नवा स्टार कोण असेल, असा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून विचारला जातो, पण प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास, याचे उत्तर अजूनही सापडलेले नाही. ९०च्या दशकामध्ये लिएंडर पेस भारताचा चेहरा होता. मात्र, तो दुहेरी स्पर्धांमध्ये वळल्यानंतर भारताला केवळ सानिया मिर्झाच्या रूपाने एक चेहरा मिळाला, पण त्यानंतर पुन्हा हा प्रश्न उपस्थित झाला आणि तो अद्याप सुटलेला नाही.’

टेनिस खेळाचा प्रसार करण्यातही अपयश आल्याचे सांगताना सोमदेव म्हणाला की, ‘आपल्याकडे खेळाडूंची समस्या नसून, योग्य प्रक्रियेचा असलेला अभाव ही मुख्य समस्या आहे. आपल्याकडे नेहमीच विविध खेळांसोबत तुलना होते आणि हे थांबविले पाहिजे. प्रत्येक खेळ वेगळा आहे. टेनिससाठी आपल्याकडे अजूनही तज्ज्ञ प्रशिक्षकांची वानवा आहे. शिवाय तज्ज्ञ प्रशिक्षक घडविण्यातही आपण मागे असून, यासाठी आपल्याकडे कोणती प्रक्रियाही नाही.’

तसेच, ‘आपल्याकडे आयटीएफआय मान्यताप्राप्त अनेक प्रशिक्षक आहेत, पण त्या तुलनेत गुणवान खेळाडू मात्र घडलेले नाहीत. ही समस्या गेल्या २० वर्षांपासून आहे आणि अजूनही आपण ती सोडविण्यात अपयशी ठरत आहोत. त्यामुळेच आजचा खेळाडू हा स्वत:च्या, त्याच्या कुटुंबीयांच्या आणि वैयक्तिक प्रशिक्षकाच्या मेहनतीच्या जोरावर पुढे जात आहे, पण टेनिस खेळातील व्यवस्थापनाचे यामध्ये काहीच योगदान नाही,’ अशी खंतही सोमदेवने या वेळी व्यक्त केली.

१९९९ सालच्या सुमारास मी १४ व १६ वर्षांखालील गटात चमक दाखविली. त्यानंतर, मी देशाच्या सर्वोत्तम युवा खेळाडूंमध्ये स्थान मिळविले, पण तरीही मला पुढील मार्गदर्शनासाठी खूप झुंजावे लागले होते. आजही तीच परिस्थिती इतर युवा खेळाडूंच्या बाबतीत कायम आहे. त्यामुळेच हे चित्र बदलले, तरच भारतीय टेनिसची प्रगती होईल.
- सोमदेव देववर्मन

Web Title: Every sports organization should practice the BCCI functioning - Somdev Devvarman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.