Zee Talkies will soon get 'good name for Sairat' | झी टॉकीजवर लवकरच ‘सैराटच्या नावानं चांगभलं’

संपूर्ण महाराष्ट्राला याड लावणारा चित्रपट सैराटला येत्या २९ एप्रिलला २ वर्ष पूर्ण होणार आहेत. हा चित्रपट प्रदर्शित होऊन २ वर्ष उलटली तरी देखील सैराट आणि आर्ची परशावर प्रेक्षकांचं असणार प्रेम किंचितभर देखील कमी झालं नाही. सैराटची यशोगाथा तर सगळ्यांनी पाहिली पण एक यशस्वी चित्रपट बनण्यामागे पडद्यामागच्या कलाकारांचे किती योगदान आणि कष्ट असतात, त्या चित्रपटाची कथा नरेट करण्यापासून तो प्रदर्शित होण्यापर्यंतच्या प्रवासात कॅप्टन ऑफ द शिप असलेल्या दिग्दर्शकाची मेहनत लोकांना बघायला मिळत नाही. पण लवकरच झी टॉकीज पडद्यामागचा सैराट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन
येणार आहे.

मराठी चित्रपट प्रसारित करणारी एकमेव लोकप्रिय वाहिनी झी टॉकीज एका दशकापेक्षा जास्त प्रेक्षकांचे मनोरंजन करत आली आहे. या वाहिनीने फक्त सदाबहार आणि नवनवीन सिनेमेच प्रसारित केले नाहीत तर म्युझिक, कॉमेडी आणि मराठी नाटकांशी संबंधित लक्षवेधक कार्यक्रम सादर करून प्रेक्षकांना त्यांच्या टिव्ही स्क्रिनला खिळवून ठेवले आहे. सैराट या सुपरहिट चित्रपटाला २ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने झी टॉकीज त्यांच्या लाडक्या प्रेक्षांकासाठी, सैराटच्या नावानं चांगभलं' हा कार्यक्रम घेऊन येत आहे. २९ एप्रिल पासून ४ रविवार दुपारी १२ वाजता प्रेक्षक सैराट हा सिनेमा कसा बनला हे अनुभवू शकतात. नुकतंच या कार्यक्रमाची घोषणा झी टॉकीजच्या पत्रकार परिषदेत करण्यात अली. दिग्दर्शक नागराज मंजुळे, अभिनेता आकाश ठोसर,अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि झी टॉकीजचे बिझनेस हेड बवेश जानवलेकर यांच्या उपस्थितीत ही पत्रकार परिषद पार पडली.

सैराटच्या नावानं चांगभलं बद्दल बोलताना झी टॉकीजचे बिझनेस हेड बवेश जानवलेकर म्हणाले, झी टॉकीज नेहमीच महाराष्ट्रातील प्रेक्षकांचे मनोरंजन करत आली आहे. सैराटच्या यशाचे आपण सर्वच साक्षीदार आहोत. हा चित्रपट बनण्यामागे संपूर्ण टीमने किती मेहनत केली हे प्रेक्षकांसमोर आणण्याचा हा झी टॉकीजचा प्रयत्न आहे. २९ एप्रिल ते २० मे प्रत्येक रविवारी दुपारी १२ वाजता प्रेक्षक 'सैराटच्या नावानं चांगभलं' बघू शकतात. प्रेक्षकांनी जसं सैराटला डोक्यावर उचलून धरलं तसाच प्रतिसाद ते या कार्यक्रमाला देखील देतील अशी मी अशा बाळगतो. चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे म्हणाले, मी प्रत्येक चित्रपटाची मेकिंग शूट करून ठेवतो. चित्रपटाला २ वर्ष पूर्ण झाली असली तरी सैराटची मेकिंग पाहून आज ही आम्हाला ते दिवस आठवतात. रिंकूच बुलेट चालवणं, आकाशच ३ तास पाण्यात पोहणं हे सर्व शूट करण्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत प्रेक्षकांच्या समोर यावी अशी माझी इच्छा होती आणि झी टॉकीजने ती इच्छा पूर्ण केली.
Web Title: Zee Talkies will soon get 'good name for Sairat'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.