मला सासू-सुनेच्या मालिकांपासून दूरच राहायचं होतं- झेबी सिंग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 05:32 PM2018-08-18T17:32:44+5:302018-08-18T17:33:27+5:30

‘पापा बाय चान्स’या नव्या रोमँटिक-विनोदी मालिकेत झेबी सिंगने युवान या तरुण मुलाची भूमिका साकारली आहे. आधी मॉडेलिंग करणाऱ्या  झेबी सिंगने या भूमिकेद्वारे टीव्ही मालिकांमध्ये पदार्पण केले आहे.

Zebi Singh says,'I wanted to stay away from Daily soaps' | मला सासू-सुनेच्या मालिकांपासून दूरच राहायचं होतं- झेबी सिंग!

मला सासू-सुनेच्या मालिकांपासून दूरच राहायचं होतं- झेबी सिंग!

googlenewsNext

-रवींद्र मोरे 

स्टार भारतवरील ‘पापा बाय चान्स’या नव्या रोमँटिक-विनोदी मालिकेत झेबी सिंगने युवान या तरुण मुलाची भूमिका साकारली आहे. आधी मॉडेलिंग करणाऱ्या  झेबी सिंगने या भूमिकेद्वारे टीव्ही मालिकांमध्ये पदार्पण केले आहे. या नव्या अनुभवाविषयी त्याच्याशी मारलेल्या दिलखुलास गप्पांचा हा वृत्तांत...

* पापा बाय चान्समधील तुझ्या व्यक्तिरेखेविषयी काही सांग.
- ‘पापा बाय चान्स’ ही दिल्लीत राहणाऱ्या  युवान या २४ वर्षीय खुशालचेंडू तरुणाची कथा आहे. भरपूर श्रीमंत असल्यामुळे युवान हा आपल्या मजीर्नुसार जीवन जगत असतो. पण जगात तो दोनच गोष्टींना घाबरत असतो- एक म्हणजे दिलेले आश्वासन पाळणे आणि दुसरी म्हणजे लहान मुले. माझ्या व्यक्तिरेखेला विविध पैलू आहेत. पण नियतीच्या विचित्र खेळामुळे माझं जीवन ३६० अंशात फिरतं आणि मला एक-दोन नव्हे, तर चक्क तीन मुलांची जबाबदारी स्वीकारावी लागल्याने मी निव्वळ अपघाताने त्या मुलांचा बाबा (‘पापा बाय चान्स’) बनतो!

* तू ही भूमिका का स्वीकारलीस आणि आता तुला त्याविषयी काय वाटतं?
- ही हलक्याफुलक्या विषयावरील नर्म विनोदी मालिका प्रेक्षकांना नक्कीच पसंत पडेल आणि ती लोकप्रियही होईल, याविषयी मला खात्री होती आणि म्हणूनच मला या मालिकेत भूमिका साकारावयाची होती. मी या भूमिकेसाठी आॅडिशन देताना खूपच उत्सुक होतो. या मालिकेची रूपरेषा मला फार आवडली आणि युवानची व्यक्तिरेखा मला खूपच मजेशीर वाटली. मी स्वत: पंजाबी असून युवानही पंजाबीच आहे. मी आता या व्यक्तिरेखेच्या प्रेमात पडलो आहे. ही भूमिका केवळ माझ्यासाठी तयार केली आहे, असं मला वाटतं; कारण मला सासू-सुनांच्या घरेलू मालिकांपासून दूरच राहायचं होतं. त्यामुळे मला ही भूमिका देऊ करण्यात आली, तेव्हा ती मी तात्काळ स्वीकारली.

* या व्यक्तिरेखेच्या अंतरंगांत प्रवेश करणं किती सोपं/अवघड होतं?
- युवानच्या अंतरंगात प्रवेश करण्यास मला काही वेळ लागला नाही; कारण आम्ही दोघेही पंजाबी आहोत. त्यामुळे ही एक स्वाभाविक भूमिका होती. भूमिकेच्या काही बाबी मला शिकाव्या लागल्या आणि काही समजून घ्याव्या लागल्या, पण एकंदरीत माझ्यासाठी हा अनुभव तसा मजेदार होता.

* सेटवर दोन प्रसंगांच्या मधील वेळ तू कसा घालवितोस?
- या मधल्या वेळेत मी कधी व्यायाम करतो, तर कधी मौजमजा करतो. कधी कधी मी धावायला जातो, तर कधी शरीर ताणण्याचे व्यायाम करतो. तर कधी मी केवळ शांतपणे बसून राहतो नाहीतर मुलांबरोबर धमाल करतो.
 
* तुझे नवे प्रोजेक्ट कोणते आहेत?
- सध्या तरी मी केवळ पापा बाय चान्स मालिकेतील भूमिकेवरच माझं लक्ष केंद्रित केलं आहे. तरी अनुराग कश्यपच्या ‘मनमर्जियाँ’ या चित्रपटात मी अभिषेक बच्चन आणि तापसी पन्नू यांच्याबरोबर एकत्र भूमिका साकारली असून त्यात विकी कौशलचीही भूमिका आहे. ही मालिका मला मिळण्याअगोदरचा हा चित्रपट आहे. या मालिकेत भूमिका स्वीकारण्यापूर्वी मी धडाक्यात मॉडेलिंग करीत होतो. ते करताना मी अनेक फॅशन शोमध्ये मंचावर चाललो आहे. त्यात विल्स लाईफस्टाईलसारख्या प्रतिष्ठेच्या फॅशन शोचाही समावेश आहे. मी गोदरेज प्लॅटिनम प्रॉपर्टी, किरण खेर यांच्याबरोबर मारिओ रस्क तसंच अन्य काही ब्रॅण्डच्या जाहिरातींमध्येही काम केलं आहे. पण आता मात्र मी केवळ पापा बाय चान्स मालिकेवरच सारं लक्ष केंद्रित केलं असून त्याबद्दल मी आशावादी आहे. या मालिकेचा प्रोमो प्रसारित झाल्यापासून असंख्य लोकांनी माझी स्तुती केली असून त्यामुळेच भारतीय टीव्हीवर ही मालिका लोकप्रियतेचे नवे विक्रम स्थापन करील, याचा मला विश्वास वाटतो.

* या मालिकेत काम करतानाचा तसंच तुझ्या सहकलाकारांबरोबर तुझा अनुभव कसा आहे?
- हा फारच धमाल अनुभव आहे. पापा बाय चान्स ही माझी पहिलीच टीव्ही मालिका असून त्यात भूमिका मिळाल्याबद्दल मी देवाचे आभार मानतो कारण त्यामुळे मला खूप प्रसिध्दी मिळाली असून एक अभिनेता म्हणून माझा विकास होण्यातही तिने हातभार लावला आहे.

* या व्यक्तिरेखेतील तुझी आवडती गोष्ट कोणती?
- युवानचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन ही माझी आवडती गोष्ट आहे. तो जीवनाकडे आरामात आणि बिनधास्त नजरेने पाहतो, मात्र त्याला जवळ असलेल्यांची तो काळजीही घेतो. त्याची ही समतोल वृत्ती मला आवडते.

* तू आतापर्यंत साकारलेल्या भूमिकांमधील तुझी सर्वात आवडती भूमिका कोणती आणि का?
- ही माझी पहिलीच टीव्ही मालिका असून युवान ही माझी पहिलीच व्यक्तिरेखा आहे. मी यानंतर कितीही भूमिका रंगविल्या, तरी युवानच्या व्यक्तिरेखेला माज्या हृदयात खास स्थान असेल.

Web Title: Zebi Singh says,'I wanted to stay away from Daily soaps'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.